मुदत ठेवी हा जोखीम न घेऊ इच्छिणार्या गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहे. उच्च श्रेणीतील कॉर्पोरेट तसेच बँक मुदत ठेवींमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. तेव्हा, बँका तसेच कंपन्यांमधील मुदत ठेवी यांची आजच्या लेखातून माहिती करुन घेऊया.
बँक बुडाल्यास किंवा ‘रिझर्व्ह बँके’ने निर्बंध आणल्यास ‘डीआयसीजीसी’ (डिपॉझिट इन्शूरन्स क्रेडिट गॅरेंटी स्कीम) या योजनेतून प्रत्येक ग्राहकाला रुपये पाच लाखांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. बँक मुदत ठेव ही सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांद्वारे किंवा अन्य प्रकारच्या बँकांद्वारे एका निश्चित मुदतीत गुंतवणुकीचा आणि मूळ रकमेवर व्याज मिळविण्यासाठी ऑफर केलेले एक आर्थिक साधन आहे. मुदत ठेवी गुंतवणूकदरांना नियमित बचत खात्यांपेक्षा जास्त व्याज देतात. बँक मुदत ठेव ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. बँकांप्रमाणे बिगर बँकिंग, वित्तीय कंपन्या ‘एनबीएफसी’ आणि इतर कंपन्यादेखील मुदत ठेवी स्वीकारतात. कॉर्पोरेट मुदत ठेवीदेखील निश्चित दराने परतावा देतात आणि कार्यकाळ, गुंतवणूक आणि व्याजदरांच्या बाबतीत अधिक लवचिक असतात.
‘कंपनी कायदा, 2013’च्या ‘कलम 73’अंतर्गत कंपन्या नागरिकांकडून ठेवी स्वीकारण्यास किंवा त्यांचे नूतनीकरण करण्यास पुढील अटींच्या अधीन राहून योजना राबवू शकतात. खासगी कंपन्या, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस व सार्वजनिक कंपन्यांनी ठेवी स्वीकारण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव मंंजूर करणे बंधनकारक असते. अशा आणि इतर ठेवींची रक्कम कंपनीच्या पेडअॅप शेअर कॅपिटल, फ्रि रिझर्व्ह आणि सिक्युरिटीज प्रीमियम खात्याच्या 35 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. कंपनीने ठेवी स्वीकारण्यासाठी वर्षांतून किमान एकदा केडिट रेटिंग प्राप्त करणे गरजेचे असते. क्रेडिट रेटिंग रॅकिंग किमान गुंतवणूक ग्रेड रेटिंग किंवा मुदत ठेवींसाठी इतर निर्दिष्ट क्रेडिट रेटिंगपेक्षा कमी असणे आवश्यक असते. ठेवी स्वीकारणार्या कंपनीला आर्थिक वर्षामध्ये परिपक्व होणार्या ठेवींपैकी किमान काही टक्के रक्कम दरवर्षी 30 एप्रिलपूर्वी कोणत्याही शेड्युल बँकेमध्ये जमा करावी लागते. जमा केलेले पैसे फक्त ठेवींची परतफेड करण्यासाठी असतात.
काही कंपन्या बँकांनी देऊ केलेल्या व्याजदरापेक्षा बरेच जास्त व्याज देतात. अतिरिक्त व्याजाचे दोन टक्के मिळविण्यासाठी त्यांच्या योजनेत पैसे गुंतविणे योग्य आहे का? याचा विचार करावा. गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीच्या कामगिरीचे पुनरावलोकन करावे. मुदतपूर्वीवेळी रक्कम पुन्हा गुंतवायची असेल, तर कंपनीची कामगिरी तपासा. ज्या कंपन्यांत गुंतवणूक करायची आहे, त्या कंपन्यांचा ताळेबंद व्यवसाय, संस्थापक इतिहास, अर्थशास्त्रीय परिस्थिती आणि शेअरचा भाव यांचा मागोवा घेऊन त्यांची नियमित तपासणी करा.गुंतवणूक चांगले क्रेडिट रेटिंग असलेल्याकंपन्यांच्या मुदत ठेवींत करा. ‘एए’ किंवा उच्च रेटिंग असलेल्या कंपन्यांच्या कॉर्पोरेट ठेवींना प्राधान्य द्यावे. उच्च रेटिंग म्हणजे सुरक्षितता असे मानू नये. कंपनी मुदत ठेवी बँकांपेक्षा जास्त व्याजदर देतात. परंतु, त्या बँक ठेवींइतक्या सुरक्षित नसतात. कंपनी दिवाळखोरीत निघाल्यास तुमचे गुंतविलेले पैसे धोक्यात येऊ शकतात.
कंपन्या मुद्दलाची आणि व्याजाची परतफेड करण्याची हमी देत नसल्यामुळे कंपनीची मुदत ठेव असुरक्षित मानली जाते. ज्या कंपन्या भागधारकांना लाभांश देत नाहीत, ज्या कंपन्यांचा ताळेबंद तोटा दाखवतो, अशा कंपन्यांत गुंतवणूक करू नये. कंपनी ठेवींत गुंतवणूक करताना योग्य कालावधी निवडावा. दीर्घ कालावधीत कंपनीच्याकामगिरीची खात्री देता येत नाही. वेळोवेळी कंपनीचे क्रेडिट रेटिंग, कंपनीचा व्यवसाय, कालावधी, कंपनीचा नफा आणि प्रवर्तकांची प्रतिष्ठा याविषयी संपूर्ण अभ्यास केला, तर ठेवींबाबत योग्य निर्णय घेता येईल. सर्व रक्कम एकाच बँकेकडे/बिगर बँकिंग वित्तीयकंपन्या किंवा कॉर्पोरेटमध्ये न ठेवता, वेगवेगळ्या बँकांमध्ये किंवा परिवारातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे ठेवावीत. अशाने अकल्पित परिस्थितीत ठेवींचे पर्याय संरक्षण देऊ शकतात. एक ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक करावयाची असेल, तर कॉर्पोरेट मुदत ठेवीत गुंतवणूक करणे, हा चांगला पर्याय ठरू शकतो. कारण, यातून खात्रीशीर परतावा मिळतो व बॅँक मुदत ठेवी दरांपेक्षा जास्त दराने परतावा मिळतो.‘डीफॉल्ट’चा धोका कमी करण्यासाठी, ‘एएए’ रेटिंग असलेल्या कंपन्या, तसेच चांगले रेटिंग असलेल्या शेड्यूल्ड बँकांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करावी. ज्यांना मूळ रक्कम सुरक्षित ठेवून मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक उत्पन्न पर्याय निवडून नियमित उत्पन्न मिळवायचे आहे, त्यांना या मुदत ठेवी योग्य.
कंपनी मुदत ठेवींची वैशिष्ट्ये
रहिवासी आणि अनिवासी भारतीयही या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करू शकतात. साधारणपणे बँकांपेक्षा दोन ते तीन टक्के जास्त व्याज मिळते. ठेवींचा कालावधी सहा महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंत असतो. बँक मुदत ठेवींप्रमाणे विमा संरक्षण नाही. तसेच, असुरक्षित कर्ज म्हणून वर्गीकरण केल्यामुळे कंपनी बुडाली, तर मुदत ठेवीची रक्कम परत मिळणे मुश्किल होऊ शकते. योजनेतून मुदतपूर्ती पूर्वी ठरविलेल्या नियमांनुसार बाहेर पडता येते. जर जुनी करप्रणाली निवडली असेल,तर रु. दहा हजार (80 टीटीए) ज्येष्ठ नागरिकांसाठी रु. 50 हजार (80 टीटीबी) पर्यंतचा व्याज उत्पन्नावर करसवलत मिळू शकते. अनिवासी भारतीयांना मुदत ठेवींवरील व्याज पूर्ण करमुक्त आहे. अनिवासी भारतीयांना देशांतर्गत उत्पन्नावरील मुदत ठेवींवरील व्याज करमुक्त नाही. क्युम्युलेटिव्ह व नॉन-क्युम्युलेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या मुदत ठेवी असतात. ‘ए’ किंवा त्यापुढील क्रेडिट रेटिंग श्रेणी मिळालेल्या कंपनीतील मुदत ठेवी गुंतवणूक योग्य व सुरक्षित समजल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांना पाव टक्का किंवा अर्धा टक्का व्याज जास्त दिले जाते.
बँक मुदत ठेवी
रहिवासी आणि अनिवासी भारतीयदेखील बँकांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करू शकतात. बँक मुदत ठेवी कंपनी मुदत ठेवींपेक्षा जास्त सुरक्षित असल्यामुळे त्याच्या तुलनेत व्याज कमी देतात. गुंतवणुकीचा कालावधी सात दिवस ते दहा वर्षे असा असतो. मुदतपूर्ती पूर्वी पैसे परत मिळू शकतात. या ठेवींवर कर्जही मिळू शकते. पाच वर्षांच्या ‘टॅक्स सेेव्हिंग्ज’ मुदत ठेवींवर प्राप्तिकर कायदा ‘80 सी’ कलमांतर्गत जर जुनी करप्रणाली निवडली असेल, तर कर सवलत मिळू शकते. क्युमिलेटिव्ह व नॉन क्युमिलेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या मुदत ठेवी असतात. मुदतीपूर्वीच्या वेळी एकदम व्याज घेतल्यास चांगले व्याज मिळू शकते.