मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई आणि परिसरात गेले काही दिवस चतुरांचे थवेच्या थवे आकाशात विहार करताना दिसत आहेत. मलाबार हिलपासुन ते अगदी कुर्ल्याच्या झोपडपट्टीपर्यंत या चतुरांचा मुक्त वावर दिसत असुन यांना वॉन्डरिंग ग्लायडर असे म्हंटले जात आहे. वॉन्डरिंग ग्लायडर म्हणजेच भटक्या चतुराचे वैज्ञानिक नाव Pantala flavescens असे आहे.
दरवर्षी ईशान्य मान्सुन वारे वाहण्याच्या वाहण्यास सुरूवात झाल्यानंतर वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर चतुर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात यायला सुरूवात होते. वॉन्डरिंग ग्लायडर्स किंवा संशोधकांनी सध्या भटके चतुर असे असे नाव दिलेले हे किटक भारताच्या पुर्वोत्तर भागापासुन आपला प्रवास सुरू करून मजल दरमजल करीत भारताच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत येतात. एवढ्या लांबचा प्रवास नैसर्गिक आणि मानवनिर्मित अनेक धोक्यांचा अडथळा पार करत हे चतुर लाखोंच्या संख्येने पश्चिम किनारा जवळ करतात. या अडथळ्यांमध्ये अनेक चतुर मरत असले तरीही प्रचंड संख्या असल्यामुळे त्यावर फारसा परिणाम झालेला दिसुन येत नाही. चतुरांच्या या स्थलांतराचा काळाला संशोधक ‘ग्रेट मायग्रेशन’ संबोधतात. या स्थलांतराच्या काळात चतुर एका ठिकाणी साधारणतः आठवडाभर वास्तव्य करत असुन या काळात होणाऱ्या पीक कापणीमुळे यांना किटकांची आयती मोजवानी मिळते.
चतुराच्या काही प्रजातींचा विचार करता त्यांच्या अधिवासाची मुख्य ठिकाणे म्हणजे संथ पाणी. डबके, कातळ सड्यांवर पावसामुळे तयार झालेली तात्पुरते डबके या आणि अशा ठिकाणांवर ते आढळतात. गोड्या पाण्यात प्रजनन करणारे भटके चतुर प्रजातीतील मादी संथ पाणी असलेल्या स्त्रोतांमध्ये अंडी घालुन पुढील प्रवासासाठी निघून जाते. शक्यतो एकाच ठिकाणी चतुरांचे वास्तव्य दिर्घकाळ रहात नाही मात्र काही चतुर एखाद्या ठिकाणीच वास्तव्य करुन राहतात. अमुर ससाणे या पक्ष्यापासुन या भटक्या चतुरांना धोका असतो, व एकाच ठिकाणी वास्तव्यास राहिल्यास अमुर ससाण्याच्या थव्याला चुकवणे या चतुरांसमोरचे आवाहनच असते.
चतुरांच्या येण्यानंतर महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू होतो असे आजवरचे संशोधन दर्शवितो. चतुरांचे हे स्थलांतर बऱ्याचकाळापासुन सुरू असले तरी त्यावर फारसे संशोधन झालेले नव्हते. आता या स्थलांतराचा अभ्यास भारत, चीन, मालदीव आणि आफ्रिकेतील काही देश यांनी एकत्रितपणे केला आहे. चतुरांच्या स्थलांतरामागची नेमकी कारणे अजुनही स्पष्ट झालेली नाहीत, यावर आणखी संशोधनाची गरज व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वोत्तर भारत ते पूर्व आफ्रिका आणि पुन्हा पुढच्या पावसाळ्यात नवीन पिढीची रिटर्न जर्नी हे चक्र गेली अनेक वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.