गुरुकुलातूनी हाचि निरोप ब्रह्मचार्‍यांना!

    18-Oct-2023
Total Views |
Article on Gurukul Samavartana Sanskar

आपल्या वडिलांची आज्ञा आशीर्वादाने मानून हा बालकदेखील आचार्यांच्या गुरुकुलात मोठ्या तपश्चर्येने जीवन जगतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता हा आपल्या कुटुंबाकडे घराकडे निघतो. यालाच ‘समावर्तन संस्कार’ असे म्हणतात. म्हणजेच उत्तम प्रकारचे शिक्षण घेऊन पुनश्च पित्याच्या घराकडे येणे होय. वयाच्या आठ ते नऊ वर्षांपर्यंत बालकाचे एकूण ११ संस्कार पूर्ण झाले. आता पार पाडला जाणारा ‘समावर्तन संस्कार’ हा बारावा संस्कार!

आपली संस्कृती ही प्रेय व श्रेय या दोन्ही मार्गांचे प्रतिपादन करणारी आहे. प्रेय हा भौतिकतेचा मार्ग, तर श्रेय हा अध्यात्माचा मार्ग! समाजात वावरायचे तर भौतिक सुविधा हव्यातच. जीवनात नानाविध भोगवस्तू आस्वादायच्या आणि योग्य वेळ आल्यास हळूहळू त्यातून निवृत्त पण व्हायचे! भौतिकतेत अधिक गुरफटून न राहता अध्यात्ममार्गाचा अवलंब करावयाचा! वेदारंभ संस्कारात वडिलांनी आपल्या पुत्रास दिलेला उपदेश हा खडतर ब्रह्मचर्य साधनेकरिता अतिशय मौलिक स्वरूपाचा होता. कारण, आपल्या पुत्राला आचार्यांकडे सोपविताना मुलगा हा कुलवंत व शीलवंत बनावयास हवा. आपल्या कौटुंबिक संस्काराचे नाव जाता कामा नये. यादृष्टीने वडिलांनी दिलेला उपदेश त्याने अतिशय प्राणप्रणाने आचरला. गुरुकुलात शिकत असताना आचार्यांपुढे आपल्या कुटुंबाचे नाव जाता कामा नये व तो सर्वदृष्ट्या प्रगत ही व्हावा, ही या मागची भावना! आपला सुपुत्र हा अगदी बौद्धिक, आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात प्रगतिपथावर राहावा, यासाठी वडिलांची आंतरिक भावना त्या उपदेशातून व्यक्त झाली.

आपल्या वडिलांची आज्ञा आशीर्वादाने मानून हा बालकदेखील आचार्यांच्या गुरुकुलात मोठ्या तपश्चर्येने जीवन जगतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता हा आपल्या कुटुंबाकडे घराकडे निघतो. यालाच ‘समावर्तन संस्कार’ असे म्हणतात. म्हणजेच उत्तम प्रकारचे शिक्षण घेऊन पुनश्च पित्याच्या घराकडे येणे होय. वयाच्या आठ ते नऊ वर्षांपर्यंत बालकाचे एकूण ११ संस्कार पूर्ण झाले. आता पार पाडला जाणारा ‘समावर्तन संस्कार’ हा बारावा संस्कार!

जवळपास १४ वर्षांचा हा कालखंड म्हणजे कठोर तपश्चर्या! गाव व शहर, आपले आई-वडील, कुटुंबीय व नातेवाईक यांच्यापासून अगदीच दूर अंतरावरील निसर्गरम्य वातावरणाच्या परिसरात घेतलेले गुरुकुलीय शिक्षण! अपार साधनेने केलेला अभ्यास, तर व्रतस्थ राहून अखंडितपणे केलेले ब्रह्मचर्य पालन! गुरुकुलात आचार्यांच्या सान्निध्यात राहून प्राप्त केलेली विद्या! ब्रह्मचारी मित्रजनांच्या सहजीवनात पहाटे ४ ते रात्री ९ वा.पर्यंतची ही श्रमनिष्ठ दिनचर्या! व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यान-धारणा, संध्यावंदना, अग्निहोत्र इत्यादी क्रियाकलापांमुळे शरीर, मन व आत्म्याचा साधलेला विकास तर अष्टाध्यायी, धातूपाठ, वेद, उपांग, दर्शन, उपनिषद आदी ग्रंथांचे केलेले अध्ययन यामुळे हा ब्रह्मचारी सर्व विद्यांनी पारंगत झाला आहे. त्याचबरोबर या ब्रह्मचार्याने परा आणि अपरा विद्यांचादेखील अभ्यास केलेला आहे, अशा या तीव्र ज्ञानी व तेजोमय अशा ब्रह्मचार्‍याला स्नातक असे देखील म्हणतात. ज्याने ज्ञानयुक्त जलाने स्नान केली, तो स्नातक! पारस्कर गृह्यसूत्रात तीन प्रकारच्या स्नातकांचे वर्णन आले आहे-

त्रय: स्नातका: भवन्ति।
विद्यास्नातको व्रतस्नातको वद्याव्रतस्नातकश्चेति।

१) विद्याव्रत स्नातक - ज्याने फक्त सर्व प्रकारच्या विद्या प्राप्त केलेल्या आहेत, तो विद्यास्नातक होय.

२) व्रतस्नातक - ज्याने विद्यांचे उत्तम प्रकारे अध्ययन केले नाही. पण, ब्रह्मचर्यव्रताचे पालन मात्र कठोरपणे केले आहे, तो म्हणजे व्रतस्नातक होय.

३) विद्याव्रतस्नातक - ज्या ब्रह्मचार्याने सर्व प्रकारच्या विद्याही ग्रहण केल्या आहेत व व्रतांचेदेखील पालन उत्तम पद्धतीने करून आपले शिक्षण पूर्ण केले आहे, असा विद्याव्रतस्नातक होय.

या तिघांमध्ये विद्याव्रतस्नातक हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण, त्याने सर्व विद्यांचे अध्ययनदेखील उत्तम प्रकारे केले आहे आणि त्याचे आचरणदेखील शुद्ध व पवित्र असे ठेवले आहे. म्हणजेच विद्येसोबत व्रतांचेदेखील कटाक्षाने पालन केले आहे, असा तो विद्याव्रतस्नातक! ज्याच्या कथनी व करणीमध्ये समन्वय असतो, तो म्हणजेच विद्याव्रतस्नातक होय.

गुरुकुलांमध्ये राहून विद्यार्थ्याला ब्रह्मचर्याचे कठोरतेने पालन करायचे असते. ब्रह्मचर्य म्हणजेच आपल्या शिक्षणव्यवस्थेचा प्राण आहे. आजकालच्या लॉर्ड मेकाले प्रणित सहशिक्षण व्यवस्थेने ब्रह्मचर्य तत्वाची पूर्णपणे पायमल्लीच केली आहे. ब्रह्मचर्याचे महत्त्व कोणासही ठाऊक नाही. या महानतम शब्दाची आजच्या या व्यवस्थेने जणू काही थट्टा केली. जो ब्रह्मचारी आपल्या वीर्याचे रक्षण करतो व शारीरिकदृष्ट्या बलवान होतो, तो खर्‍या अर्थाने शक्तिशाली मानला जातो. ब्रह्मचरितत्त्वातच चारित्र्य रक्षण पण दडले आहे.

समावर्तन संस्कार प्रसंगी गुरुकुलात तीन प्रकारचे ब्रह्मचारी घडतात.

१) वसु ब्रह्मचारी - वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत जो ब्रह्मचर्याचे निष्ठेने पालन करतो व गृहस्थाश्रमाकडे वाटचाल करतो, तो म्हणजे वसू ब्रह्मचारी होय. हा ब्रह्मचारी किमान एका वेदाचे अध्ययन करून त्यात निष्णात होतो. वसुविषयी म्हटले आहे - ‘सर्वं वासयति इति वसु:।’ म्हणजे जो विद्या अध्ययन करून गृहस्थाश्रमात प्रवेश करतो. तिथे स्वतः चांगल्या प्रकारे निवसतो आणि इतर कुटुंबीयांनाही वसवितो, तो वसू होय.

२) रुद्र ब्रह्मचारी - वयाच्या ३६व्या वर्षांपर्यंत ब्रह्मचर्यपूर्वक विद्यांचा अभ्यास करून जो दोन वेद शिकतो, तो म्हणजे रुद्र ब्रह्मचारी होय. रुद्र म्हणजेच ‘इदं सर्वं रोदयति इति रुद्र।’ जो आपल्या प्राणांना व इंद्रियांना रडवितो. अर्थातच, त्यांना आपल्या वशीभूत करतो. जणूकाही हे सर्व प्राण व इंद्रिय रडतच आहेत, यास्तव हा ब्रह्मचारी रुद्र मानला जातो.

३) आदित्य ब्रह्मचारी - जो वयाच्या ४८व्या वर्षांपर्यंत चारही वेदांचे अतिशय कठोर साधनेतून अध्ययन करतो, तो म्हणजे आदित्य ब्रह्मचारी होय. आदित्य म्हणजेच सूर्य ब्रह्मचर्याचा तेजाने सूर्याप्रमाणे प्रकाशित होणारा व इतरांनाही प्रकाश देणारा असा तो ब्रह्मचारी म्हणजे आदित्य ब्रह्मचारी होय. ‘इदं सर्वं आददते।’ अर्थात जो सर्व प्रकारचे ज्ञान ग्रहण करतो, तो ब्रह्मचारी म्हणजेच आदित्य ब्रह्मचारी होय.

याहीपेक्षा एखाद्याला तीव्र वैराग्याने आयुष्यभर ब्रह्मचर्य राहायचे असेल, तर तो नैष्टिक ब्रह्मचारी मानला जातो. पण, त्याचे वैराग्य ब्रह्मचारी खूपच तुरळक पाहावयास मिळतात, अशा वरील सर्व तिन्ही प्रकारच्या स्नातकांना त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे निरोप दिला जातो. (क्रमशः)

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
९४२०३३०१७८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.