महाराष्ट्राचा सुपुत्र नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने नुकत्याच संपन्न झालेल्या १९व्या ‘आशियाई क्रीडा स्पर्धे’त दहा मीटर एअर रायफल्स प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानिमित्ताने रुद्रांक्षचा क्रीडाप्रवास...
रुद्रांक्ष पाटील यांचे गाव सोलापूर. पण, तो सध्या ठाण्यात राहताो. त्याची आई हेमांगिनी पाटील या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नवी मुंबई येथे, तर वडील बाळासाहेब पाटील हे पालघर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुळात रुद्रांक्षच्या घरात खेळासाठी पूरक वातावरण प्रारंभीपासून होते. कारण, त्याची आई पाच वेळा राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी झाली होती. त्याचबरोबर त्याचे वडीलही पॉवरलिफ्टर, धावपटू आणि कबड्डीपटू होते. त्यामुळे खेळाची आवड ही सुरुवातीला वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच रुद्रांक्षमध्ये निर्माण झाली. खेळामुळे मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होतो, त्यामुळेच लहानपणापासून सुट्टीच्या दिवसांमध्ये बरेच खेळ रुद्रांक्ष खेळत असे. त्यातीलच एक खेळ म्हणजे नेमबाजी. ज्यात आज रुद्रांक्षने चमकदार कामगिरी नोंदवली आहे. रुद्रांक्षचे प्राथमिक शिक्षण हे ठाण्यातील हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल येथे झाले. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण त्याने सलोचनादेवी सिंघानिया स्कूल येथून पूर्ण केले. तसेच सध्या तो कीर्ती महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे.
देशात एकीकडे सर्वांना क्रिकेटचे वेड असताना रुद्रांक्षने वेगळ्या वाटेने जात, नेमबाजी या खेळात कौतुकास्पद कामगिरी केली. रुद्रांक्ष म्हणतो की, “क्रिकेट हा खेळ सांघिक असल्यामुळे तिथे वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी वाव कमी होता. तसेच क्रिकेट खेळण्यात फार रसही नव्हता.“ त्यामुळे वडिलांनी आणि रुद्रांक्षने असा खेळ निवडायचे ठरवले, ज्यात वैयक्तिकरित्या स्वतःच्या क्षमतांचा विकास करत चांगली कामगिरी करता येईल. म्हणूनच रुद्रांक्षने नेमबाजी हा खेळ निवडला.
रुद्रांक्षच्या खेळाची सुरुवात ही इयत्ता सहावीत असताना म्हणजेच वयाच्या ११-१२व्या वर्षी झाली. त्यावेळी त्याने पहिल्यांदा नेमबाजी या स्पर्धेत जिल्हास्तरावर बक्षीस मिळवले. मात्र, खर्या अर्थाने वयाच्या १४व्या वर्षी रुद्रांक्षने नेमबाजी या खेळासाठी व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्या कठोर प्रशिक्षणातून तावून सुलाखून जात असतानाच रुद्रांक्षला आपल्यातील खेळाडूची खरी ओळख झाली.
गेल्या वर्षी रुद्रांक्षने कैरो येथे झालेल्या ‘जागतिक नेमबाजी स्पर्धे’त वैयक्तिक आणि सांघिक अशी दोन सुवर्णपदके पटकावली आणि जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान प्राप्त केले. त्यामुळे अभिनव ब्रिदांनंतर ‘वर्ल्ड चॅम्पियन’मध्ये सुवर्णपदक मिळवणारा रुद्रांक्ष हा दुसरा भारतीय ठरला. त्यामुळे २०२४ मध्ये फ्रान्स येथे होणार्या ‘ऑलिम्पिक स्पर्धे’त रुद्रांक्षचा कोटा निश्चित झालाय. त्यामुळे खेळाडू म्हणून आम्ही एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करत असतो. कारण, खेळाडूने फार पुढचा विचार करून चालत नाही. त्यामुळे 'next match, one match at the time' या उक्तीप्रमाणे अपेक्षांच्या कसोटीवर खरं उतरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत, अपेक्षित लक्ष्य गाठण्याची तयारी सुरू असल्याचे रुद्रांक्ष सांगतो.
“त्याचबरोबर खेळाडू हा मला एका योद्ध्यासारखा वाटतो. जो रक्त न सांडता दुसर्या देशांशी लढू शकतो आणि जिंकू शकतो. त्यामुळे येत्या काळात भारताला क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याची आमची जबाबदारी आम्ही पार पाडू,” असे रुद्रांक्ष सांगतो.
“यापूर्वी नेमबाजीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग कमी होता. पण, अभिनव ब्रिंदा यांच्यासारख्या खेळाडूंनी पदक जिंकल्यावर पालकांनी या खेळात रस दाखवला. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाला करिअर करण्याची संधी म्हणून खेळांकडे वळवले पाहिजे. तसेच ‘खेलो इंडिया’सारख्या योजनांच्या माध्यमातून सरकार खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पालकांनी तात्पुरतं आपल्या मुलाला खेळ शिकवून तेवढ्या पुरत मर्यादित न ठेवता, करिअर करण्याची संधी म्हणून त्याला क्रीडा क्षेत्राच्या रणांगणात उतरवायला हवं. पण, अपेक्षांच ओझ त्यांच्यावर लादू नये. तसेच मुंबईत आता हळूहळू ‘स्पोर्ट्स कल्चर’ रुजत असल्यामुळे ‘आशियाई क्रीडा स्पर्धे’त महाराष्ट्राने ३१ पदके मिळवली,” असे रुद्रांक्ष पाटील प्रकर्षाने अधोरेखित करतो.
रुद्रांक्ष पाटील जलतरणपटू मायकल फिलिप्स यांना आदर्श मानतो. तसेच नेमबाजीच्या क्षेत्रात अभिनव ब्रिंदा रुद्रांक्षचे आदर्श आहेत. तसेच नेमबाजीच्या क्षेत्रात स्नेहल कदम, अजित पाटील, नेहा चव्हाण, हाईजद रेंकिमीर, सुमा शिरूर आणि थॉमस फारनिक यांच्याकडून रुद्रांक्षने प्रशिक्षण घेतले आहे.
”खेळ आधी आत्मसमाधानासाठी खेळायला हवा. प्रत्येकाने करिअरच्या दृष्टीने याकडे नाही पाहिलं तरी चालेल. परंतु, वर्तमानाचा विचार करत भविष्याचं दडपण न घेता आपण क्रीडा क्षेत्रात काम करायला हवं. संघर्षाच्या काळात आपण ’टिकणार की जाणार’ हे दोन पर्याय आपल्यासमोर असताना आपण स्वतःच्या क्षमता विकसित करत गेलो, तर आपण आपोआप पुढे जाऊ. त्यासाठी Balance, Meditation, Patience या गोष्टीवर लक्ष द्यावं,’‘ असे रुद्रांक्ष सांगतो. तरी रुद्रांक्ष पाटीलला क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल कामगिरीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’कडून खूप सार्या शुभेच्छा!