रसिका शिंदे-पॉल
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असतेच. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या भूतनाथ रिटर्न्स या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा मराठमोळा अभिनेता पार्थ भालेराव याला अमिताभ बच्चन यांच्यासोबत मोठ्या पड्यावर काम करण्याची संधी मिळाली. भूतनाथ रिटर्न्स चित्रपटाच्या दरम्यानचा एक अमिताभ बचच्न यांचा पार्थ भालेरावने त्याच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘किल्ला’ या चित्रपटाला आणि त्याच्या अभिनयाला बच्चन यांनी दाद दिल्याचा किस्सा महाएमटीबीशी बोलताना सांगितला.
काय म्हणाला पार्थ?
“ ‘भूतनाथ रिटर्न्स’ नंतर अभिनयाचे बादशाह अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मला सांगितलं होतं की मुंबईत आलास की भेटायला ये. आणि मी मुंबई आल्यानंतर त्यांना कळवलं की आलो आहे, त्यांनी मला खरंच त्यांच्या जलसा बंगल्यावर भेटायला बोलावलं. दिलेल्या वेळेत मी आणि आई जलसा बंगल्यावर पोहोचलो. मग बच्चन सरांसोबत गप्पा सुरु झाल्या, त्यावेळी ते मला म्हणाले की तुझ्या 'किल्ला' चित्रपटाबद्दल मी ऐकलं आहे, मला तो चित्रपट पाहायचा आहे तर पुढच्यावेळेस मला सीडी घेऊन ये. मग मी सीडी त्यांना दिली आणि त्यानंतर जेव्हा पुन्हा माझी आणि त्यांची भेट झाली त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुझा किल्ला चित्रपट मी पाहिला. खुप सुंदर आहे आणि तु काम देखील उत्तम केलं आहेस. खरं तर त्यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाने माझा 'किल्ला' हा चित्रपच आहे हे लक्षात ठेवने आणि तो आवर्जून पाहणे ही माझ्यासाठी फार मोठी बाब आहे”.
२०१४ साली प्रदर्शित अविनाश अरुण दिग्दर्शित 'किल्ला' या चित्रपटाने प्रतिष्ठेच्या बर्लिन चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटासाठी देण्यात येणारे ‘क्रिस्टल बिअर’ पटकावले होते. तसेच, या महोत्सवाच्या ३७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मराठी चित्रपटाने अशी बाजी मारली होती. अमृता सुभाष, श्रीकांत यादव, पार्थ भालेराव, अर्चित देवधर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.