हमासची दहशत! पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांची हमासविरोधी टिपण्णी सरकारी माध्यमांनी काढली

16 Oct 2023 13:06:24

Hamas Terrorists

मुंबई :
इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने केलेल्या इस्त्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचा सगळीकडून निषेध होत आहे. यातच आता पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनीदेखील हमासने केलेल्या या हल्ल्यावर टीका केली आहे. परंतू, तेथील वृत्तसंस्थेने त्यांनी केलेली टिपण्णी काढून टाकली आहे.
 
पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने केलेल्या हल्ल्यावर टीका केली आहे. महमूद अब्बास यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांनी फोनवर संवाद साधला. यावेळी हमासने केलेल्या कृत्याला पॅलेस्टाईनचा पाठिंबा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ) पॅलेस्टिनी लोकांचा एकमेव प्रतिनिधी असून हमास पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही, असे ते आपल्या संभाषणात म्हणाले होते. तसेच त्यांनी हमासने इस्त्रायलवर केलेल्या युद्धाबद्दल निषेध व्यक्त केला. मात्र, यानंतर काही वेळातच WAFA या अधिकृत वृत्तसंस्थेने महमूद अब्बास यांनी हमासबद्दल केलेले वक्तव्य काढून टाकले आहेत.
 
"हमासची धोरणे आणि कृती पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करत नाहीत आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची धोरणे, कार्यक्रम आणि निर्णय हे पॅलेस्टिनी लोकांचे एकमेव कायदेशीर प्रतिनिधी आहेत यावर राष्ट्रपतींनी भर दिला," अशी माहिती WAFA ने प्रसारित केली होती. परंतू, त्यानंतर काही तासांतच पॅलेस्टिनी राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने हमासचा संदर्भ काढून टाकला. यावर वृत्तसंस्थेने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.



Powered By Sangraha 9.0