भोपाळ : भारतीय रेल्वेच्या 'वंदे भारत' एक्सप्रेस गाड्यांवर दगडफेकीच्या घटना अजूनही थांबलेल्या नाहीत. आता मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये 'वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन'वर दगडफेक झाली आहे. अज्ञात व्यक्तीने ही दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. दगडफेकीमुळे रेल्वेच्या खिडकीच्या काचा फुटल्या, याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काच फुटली तेव्हा ट्रेनमध्ये अनेक प्रवासी उपस्थित होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
चिंतामण स्टेशन आणि उज्जैन दरम्यान ही घटना घडली. दरम्यान या घटनेच्या एक दिवसापूर्वीही अशीच घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेसंदर्भात आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) ने अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवली आहे. ही 'वंदे भारत' एक्स्प्रेस गाडी पूर्वी इंदूर ते भोपाळ धावत होती, जी आता इंदूरहून नागपूरला हलवण्यात आली आहे. या घटनेच्या ६ दिवस आधी ट्रेनच्या मार्गात बदल झाल्याची माहिती देण्यात आली होती.
मात्र, सलग दोन दिवस दगडफेक सुरू आहे. गाडी क्रमांक २०९११ दि. ९ ऑक्टोबरपासून नागपूरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सकाळी ६.३० वाजता ही घटना घडली. कोच क्रमांक C६ आणि C७ यांना लक्ष्य करण्यात आले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आरपीएफवर निष्काळजीपणाचा आरोपही केला आहे. मात्र, आता सुरक्षेबाबत कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन आरपीएफने दिले आहे. दोन्ही दिवशी एकाच ठिकाणी दगडफेक करण्यात आली.
यापूर्वीही या ट्रेनला लक्ष्य करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ऑगस्ट २०२३ मध्ये, मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात ट्रेनमध्ये दगडफेक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले होते, ज्याचे नाव फिरोज खान होते. भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्स्प्रेसवर त्यांनी दगडफेक केली होती. जानेवारी २०२३ मध्ये, पंतप्रधान मोदींच्या उद्घाटनाच्या काही दिवसांनंतर, पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कुमारगंजजवळ अज्ञात लोकांनी ट्रेनवर दगडफेक केली.