भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे ऊर्जा केंद्र - भातखळकर

16 Oct 2023 14:45:40
bhatkhalkar

मुंबई :
“भारतीय संस्कृतीचा विचार हा मानवतेचा आहे, तसाच तो चांगल्या संस्काराचाही आहे. अशा संस्काराचे एक ऊर्जा केंद्र म्हणजे भवानी शक्तीपीठ आहे. जगात भेकडाच्या अहिंसेला कोणी किंमत देत नाही. जो आखाड्यात उतरून बलोपासना करतो, त्याच्याच अहिंसेला आणि नैतिकतेला जगामध्ये किंमत असते,” असे प्रतिपादन भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केले. मालाड पूर्वला दफ्तरी रोड परिसरातील भवानी आखाड्याचे उद्घाटन आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शक्तीपीठाचे प्रमुख राहुल जाधव, गुरुजी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. भातखळकर म्हणाले की, “बलाची उपसना करायला भारतीय संस्कृती सांगते म्हणजे भारतीय संस्कृती चूक असे आपल्याला शिकवले गेले. पण त्यांना भारतीय संस्कृती कळली नाही आणि भारतीय विचारही कधी कळला नाही. बल, शक्ती ही चांगल्या कामासाठी वापरली जाते. हाच शक्तीचा खरा अर्थ आहे. याच विचाराचे पुनरुज्जीवन भवानी आखाड्याच्या माध्यमातून होत आहे. बलाची उपासना, संस्कार, नैतिकता हाच भारतीय संस्कृतीचा मूळ विचार आहे. लक्ष्मी आणि सरस्वतीच्या दारात जेव्हा दुर्गा उभी असते, तेव्हाच लक्ष्मी आणि सरस्वती सुरक्षित असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही हाच विचार दिला आहे,” असे ते म्हणाले. यावेळी आमदार भातखळकर यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या या आखाड्यात खेळाडूंनी मल्लखांब, कुस्तीची प्रात्यक्षिके करून दाखवली. खेळाडू तसेच त्यांच्या प्रशिक्षकांचा सत्कार आ. भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0