शिक्षक टार्गेट, फ्रान्स अलर्ट

15 Oct 2023 21:45:01
France Mobilizes 7,000 Soldiers in Response to School Stabbing

इस्रायल आणि ‘हमास’मध्ये सुरू असलेल्या युद्धाने जग चिंतीत असताना, आता फ्रान्समध्ये एका शिक्षकाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर फ्रान्समध्ये उच्चस्तरीय अलर्ट जारी करण्यात आला असून, तब्बल सात हजारांहून अधिक सैनिक तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवारी फ्रान्सच्या ईशान्येकडील अरस शहरात एका शिक्षकावर २० वर्षीय तरुणाने चाकूने वार केले. यामध्ये शिक्षकाचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण जखमी झाले. यामध्ये सुरक्षारक्षक आणि सफाई कामगारांचा समावेश आहे.

सुदैवाने या हल्ल्यात कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही. डॉमिनिक बर्नार्ड असे या फ्रेंच शिक्षकाचे नाव होते. दरम्यान, पोलिसांनी संशयित हल्लेखोर मोहम्मद मोगुशकोव्ह याला अटक केली आहे. हत्या केल्यानंतर तो ‘अल्लाह-हो-अकबर’च्या घोषणा देत होता. शनिवारी पोलिसांनी मोगुशकोव्ह आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह दहा जणांना अटक केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या घटनेचा निषेध करत याला ‘इस्लामी दहशतवाद’ म्हटले आहे. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी शाळेलादेखील भेट दिली. “इस्लामिक दहशतवादाच्या क्रूरतेचा फटका शाळेला बसला आहे. हल्लेखोराला रोखण्याचे धैर्य दाखवून पीडित व्यक्तीने अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत,” असे यावेळी इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले.

राष्ट्रपती कार्यालय, एलिसी पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सेंटिनल सैन्याची तैनाती केली जाणार आहे. सेंटिनेल ही फ्रेंच सैन्याची एक तुकडी आहे, ज्यात सैनिक, पोलीस आणि जेंडरमेरी यांचा समावेश आहे. जानेवारी २०१५च्या घटनेनंतर ही तुकडी तयार करण्यात आली. याअंतर्गत दहशतवादाच्या दृष्टीने संवेदनशील भागात गरज पडल्यास या तुकडीला तैनात केले जाते. जेंडरमेरी हादेखील फ्रेंच सैन्याचा एक भाग आहे, जो नागरी लोकांमध्ये काम करतो. दरम्यान, मध्य-पूर्वेतील इस्रायल आणि ‘हमास’ युद्धाशीही या हत्येचा संबंध जोडला जात आहे.

गृहमंत्री गेराल्ड डार्मन यांनी सांगितले की, “मध्यपूर्वेत जे काही घडत आहे, त्याचा या घटनेशी काही संबंध असू शकतो.“ मॅक्रॉन यांच्या अध्यक्षतेखाली फ्रान्सच्या सुरक्षाविषयक बाबींवर सविस्तर बैठक झाली. यानंतर देशातील उच्चस्तरीय अलर्ट घोषित करण्यात आला. त्याचप्रमाणे फ्रान्समध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यावरही पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी लोक नियम मोडून पॅलेस्टाईन समर्थनार्थ मोर्चे काढत आहेत. पॅरिसमध्येही हजारो लोकांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

दरम्यान, फ्रान्सच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी यंत्रणेकडून आता या हत्या प्रकरणाचा तपास सुरू झाला असून मिळालेल्या माहितीनुसार, मोगुशकोव्ह हा रशियन होता आणि त्याचा जन्म उत्तर काकेशसच्या मुस्लीमबहुल इंगुशेटिया रिपब्लिकमध्ये झाला होता. फ्रेंच नॅशनल रजिस्टरमध्ये धोकादायक व्यक्ती म्हणून त्याचे नाव आधीच नोंदवले गेले होते.

फ्रान्समध्ये शिक्षकांवर हल्ले किंवा त्यांच्या हत्येची ही काही पहिली घटना नाही. ऑक्टोबर २०२० मध्येही एका अठरा १८ वर्षीय दहशतवाद्याने ४७ वर्षी शालेय शिक्षक सॅम्युएल पैटी यांची हत्या केली होती. या दहशतवाद्याने या शिक्षकाचे धड शरीरापासून वेगळे केले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर धडे देताना, या शिक्षकाने मोहम्मद पैगंबर यांचे कार्टून दाखवले होते. त्यामुळे या शिक्षकाची हत्या करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद फ्रान्ससोबत अन्य देशांतही उमटले होते. नोव्हेंबर २०१५ सालीही एका यहुदी शाळेतील शिक्षकाची हत्या करण्यात आली होती.

हत्या केल्यानंतर आरोपीने यहुदींविरोधात आणि ‘इस्लामिक स्टेट झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या होत्या. या अन् अशा अनेक घटनांनी फ्रान्समध्ये धार्मिक तेढ वाढत चालल्याचे दिसून येते. त्यातही शाळा हे अतिशय सोप्प टार्गेट आहे. त्यामुळे फ्रान्सने आता गाफील न राहता शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. फ्रान्सने आधी शरणार्थींना मानवतेच्या दृष्टिकोनातून आसरा दिला. परंतु, त्याचे चटके आता सामान्य फ्रान्स नागरिकांना सहन करावे लागत आहे. वारंवार होणार्‍या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्स सतर्क झाला आहे. त्यामुळचे शिक्षकाच्या हत्येनंतर अलर्ट घोषित करण्यासह सैन्याची तैनातीदेखील करण्यात आली आहे.

७०५८५८९७६७
Powered By Sangraha 9.0