क्रिकेटची आवड जोपसणार्या ऋषिकेश पुराणिक याने निराश होऊन क्रिकेटकडे पाठ फिरवली होती. परंतु, दोन वर्षांच्या बेक्रनंतर ऋषिकेशने कमबॅक करत थक्क करणारी कामगिरी केली. अशा या स्वतःची क्रिकेट अकादमी स्थापन करून कित्येक क्रिकेटपटूंना घडवणार्या ऋषिकेशविषयी....
ऋषिकेश हा डोंबिवलीकर. त्याची जडणघडण ही डोंबिवलीतच झाली. त्याने शालेय शिक्षण विद्यानिकेतन शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर डोंबिवलीतील मॉडेल महाविद्यालयातून अकरावी आणि बारावीचे शिक्षण वाणिज्य शाखेतून पूर्ण केले आहे. क्रिकेट खेळत असतानाच ऋषिकेशला लिखाणाची आवड निर्माण झाली. एकीकडे खेळाची असलेली आवड आणि दुसरीकडे लिखाणाची इच्छा ऋषिकेशला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे ऋषिकेशने या दोन्हींतून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. ‘स्पोर्ट्स जर्नलिझम’ करता येऊ शकतो, असा विचार ऋषिकेशच्या मनात होता. म्हणून त्याने लोअर परळ येथील व्हिजन अॅण्ड ली या महाविद्यालयात ‘मास कम्युनिकेशन’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.
तीन वर्षांच्या या अभ्यासक्रमात एक वर्षाचा अभ्यास हा लंडन येथे जाऊन करायचा होता. ऋषिकेशचा भाऊ ऋतुराज हा आधीपासूनच लंडनमध्ये स्थायिक होता. ऋषिकेशला ऋतुराजने पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात कर असा सल्ला दिला. ऋषिकेशनेही क्रिकेट खेळण्याचे लगेच मनावर घेतले. दोन वर्षांचा ब्रेक बाजूला सारून ऋषिकेश आता क्रिकेटचा सराव करू लागला होता. एका मागोमाग एक क्रिकेट स्पर्धा खेळण्याची संधी त्याला चालून येत होती. क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगल्या धावा तो करू लागला होता. त्यांचा हा खेळ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. क्रिकेटमध्ये करत असलेला धावांचा विक्रम ऋषिकेशचा आत्मविश्वास वाढवत होता. ऋषिकेशने लंडनमध्ये क्रिकेटमधील केलेले पुनरागमन त्यांच्या आयुष्यातील एक ‘टर्निंग पाईंट’ ठरला. लंडनमध्ये त्याला मिळालेल्या चांगल्या मार्गदर्शनानंतर ऋषिकेशने कधीही मागे वळून पाहिले नाही.
ऋषिकेशला क्रिकेटचे बाळकडू त्याच्या वडिलांकडूनच मिळाले आहे. त्याचे वडील सुशील हे व्यावसायिक असून, उत्तम क्रिकेट खेळतात. त्यांनीही अनेक स्पर्धांमध्ये आपल्या क्रिकेटची झलक दाखविली आहे. तेच गुण ऋषिकेशमध्ये ही आल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे ऋषिकेश आणि त्याचा भाऊ ऋतुराज दोघांनाही त्यांनी क्रिकेट अकादमीमध्ये भरती केले. क्रिकेटमधील मूलभूत ज्ञान ऋषिकेशने प्रशिक्षक वसंत तांडेल यांच्याकडून मिळविले. पण, क्रिकेट खेळताना मार्गदर्शन कमी पडत आहे, अशी हुरहुर त्यांच्या मनाला लागली होती. त्यातून त्याने क्रिकेटला रामराम ठोकला. त्याच दरम्यान शिक्षणाकरिता तो लंडन येथे गेला आणि ऋतुराजच्या सांगण्यावरून तो पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऋषिकेशला लंडनमध्येच नोकरी मिळाली. नोकरी करतानाही क्रिकेटमध्ये खंड पडू नये, याकरिता त्यांनी रात्रपाळीत काम करण्याची मुभा कंपनीकडे मागितली होती. ती परवानगी कंपनीने दिल्याने ‘कमवा आणि शिका’सह ऋषिकेश दररोज क्रिकेटचा सराव करू लागला. ऋषिकेशला कंपनीने दिलेला पाठिंबा खूप महत्त्वाचा होता. त्यामुळेच क्रिकेटच्या क्षेत्रात इथपर्यंत पोहोचू शकलो असल्याची प्रांजळ कबुली ऋषिकेशने दिली आहे.
ऋषिकेश २०१० मध्ये शिक्षणासाठी लंडनमध्ये गेला होता. तो २०१४ मध्ये भारतात पुन्हा परतला. भारतात आल्यावर त्याने वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावण्यास सुरुवात केली. ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटची एक सर्वोत्तम अकादमी काढायची, हे ऋषिकेशचे स्वप्न होते. पण, त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ लगेचच उभे करणे, हे ऋषिकेशसाठी ही कठीणच होते. त्यामुळे त्याने वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावत दुसरीकडे अकादमीचे रोपटे लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रयत्नाला यश आले-ते २०१७ मध्ये. ऋषिकेशने डोंबिवलीत दोन खेळाडूंना सोबत घेऊन ‘क्रिकेट एक्स्प्लेण्ड अकादमी’ची स्थापना केली. या अकादमीचा वेलू आता गगनावरी गेला असून, सद्यःस्थितीत ४० खेळाडू क्रिकेटचे धडे ऋषिकेशकडून गिरवत आहे. ऋषिकेशचे विद्यार्थीही आता क्रिकेटमध्ये आपला वेगळा असा ठसा उमटवित आहे. ऋषिकेशचा विद्यार्थी आयुष आंबेरकरची ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’च्या १६ वर्षांखालील ‘पय्याडे करंडक’साठी निवड झाली आहे.
तसेच वैभवी राजा, संजुयला नाईक हे राज्य पातळीवर आपल्या खेळांचा ठसा उमटवत आहे. त्याचे अनेक विद्यार्थी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहे. ऋषिकेश आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या खेळाडूंनाही माफत दरात वैयक्तिक मार्गदर्शन करीत असतो. ऋषिकेश ‘इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल’चे ‘लेव्हल वन’चा प्रशिक्षक आहे. क्रिकेट खेळता खेळता ऋषिकेश प्रशिक्षक झाला. आपल्याला जी संधी मिळाली नाही, ती इतर हरहुन्नरी खेळाडूंना मिळावी, यासाठी ऋषिकेशची धडपड वाखणण्याजोगी आहे. त्यातूनच ऋषिकेशच्या मार्गदर्शनाखाली उदयोन्मुख खेळाडू घडत आहेत. ही फार मोठी जमेची बाजू आहे. कोणतेही काम करताना झोकून देऊन आणि प्रामाणिकपणे करण्याचा सल्ला ऋषिकेशने इतर खेळाडूंना दिला आहे. त्यामुळे खेळाडू घडत आहेत, अशा या हरहुन्नर खेळाडू आणि प्रशिक्षकाला पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत‘कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.