नवी दिल्ली : पंजाब पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधून दोन जणांना अटक करून लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी मॉड्यूलला उध्वस्त केले आहे. यावेळी दोन संशयितांकडून दोन आयईडी, दोन हातबॉम्ब, एक पिस्तूल, दोन मॅगझिन, २४ काडतुसे, एक टायमर स्विच, आठ डिटोनेटर आणि चार बॅटरी जप्त करण्यात आल्या आहेत.
पंजाबचे पोलिस महासंचालक पी गौरव यादव म्हणाले की, 'राज्य स्पेशल ऑपरेशन्स सेल-अमृतसरने केंद्रीय यंत्रणांसह संयुक्त कारवाई करून एक मोठे यश नोंदवले आहे आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे आणि जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या दोन लोकांना अटक केली आहे. यादव म्हणाले की, दहशतवादी मॉड्यूलचे ऑपरेशन लष्कर-ए-तैयबाचा सक्रिय सदस्य फिरदौस अहमद भट हाताळत होता.
सध्या राज्यात सणांमुळे पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पोलिसांना आंतरराज्य नाकाबंदी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंजाब पोलिसांनी गेल्या १५ महिन्यांत दहशतवाद्यांकडून ३२ रायफल, २२२ रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, ९ टिफिन इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह उपकरणे जप्त केली आहेत. त्याचप्रमाणे गेल्या १५ महिन्यांत पंजाब पोलिसांनी १९७ दहशतवादी आणि कट्टरपंथीयांना अटक केली आहे. लष्कर ए तोयबाच्या मॉड्युलला उध्वस्त केल्यानंतर ही संख्या आता २०० वर पोहोचली आहे.