पालघर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षं व विश्वहिंदू परिषदेला ६० वर्षं पूर्ण होत आहेत. या दुग्धशर्करा योगाच्या निमित्ताने बजरंगदल आयोजित ‘शिवशौर्य यात्रे’चे पालघर जिल्ह्यातील मनोर येथे आगमन झाले. स्वागतासाठी नागरिकांनी रस्त्यावर दुतर्फा गर्दी केली होती.
महिलांनी रस्त्यावर रांगोळ्या घातल्या होत्या. व्यापार्यांनी उत्स्फूर्तपणे बाजारपेठ बंद ठेवून यात्रेत सामील झाले होते. अनेक ठिकाणी शिव प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. आसमंत दुमदुमू टाकण्यार्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा देत रथाचे भव्य स्वागत करण्यात आले. नंतर या यात्रेचे रुपांतर भव्य सभेत झाले.
या सभेत बोलताना मुख्य प्रवक्ते श्रीराज नायर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान आपल्या हृदयात असावे व घराघरात शिवाजी जन्माला यावे. ५०० वर्षे हिंदूंनी राम मंदिरासाठी केलेला संघर्ष व प्रत्यक्षात होत असलेली राम मंदिराची उभारणी, हे हिंदूंच्या एकतेचे उदाहरण आहे. दोन साधूंच्या हत्येमुळे पालघर जिल्ह्यावर लागलेला बदनामीचा कलंक पुसण्यासाठी हिंदूंनी एकत्र येऊन गोवंश हत्या थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारसेवक नारायण भोईर यांचा सत्कार करण्यात आला.
वसईत यात्रेचे जंगी स्वागत
छ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षं पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कोकण प्रांताकडून गोवा ते डहाणू या मार्गावर शिवशौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी महामार्गावरील खानिवडे टोल नाक्यात, या यात्रेचा प्रवेश झाला. खानिवडे गावात या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या उपस्थितीबरोबर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त होता. ही यात्रा विरार फाटामार्गे विरार शहर ते पुढे नालासोपारा आणि वसई अशी मार्गस्थ झाली. वसईतील नरवीर चिमाजी अप्पा यांच्या शौर्याची साक्ष म्हणून उभ्या असलेल्या ऐतिहासिक वसई किल्ल्यातील चिमाजी अप्पांच्या स्मारकात या यात्रेचा समारोप झाला.