सुबोध भावे हिंदी चित्रपटात दिसणार हटके भूमिकेत

    13-Oct-2023
Total Views |
 
subodh bhave
 
 
मुंबई : ‘बालगंधर्व’, ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘फुलराणी’ अशा मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे आगामी हिंदी चित्रपटात हटके भूमिका साकारणार आहे. ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ या चित्रपटात सुबोध वडिलांची भूमिका साकारत असून आपल्या परंपरा आणि आपल्या संस्कृतीवर अमाप प्रेम करणाऱ्या आणि रंगभूमीवर विशेष प्रेम असणाऱ्या एका रांगड्या वडिलांची भूमिका साकारत आहे.
 
रहस्यांनी भरलेला ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा उत्कंठावर्धक ट्रेलर सजनी शिंदे कशी आणि का बेपत्ता झाली आणि तिच्या बेपत्ता होण्यास कोण जबाबदार आहे याचा अंदाज लावण्यास भाग पाडतो. या वर्षातील सर्वात मोठा थरारपट म्हणून ओळखला जाणारा, हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख कलागुणांना वाव देताना दिसणार आहे
 
चित्रपटाची कथा एका तरुण भौतिकशास्त्र शिक्षिकेची आहे जी रहस्यमय परिस्थितीत गायब होते. एक अनुभवी आणि अत्यंत कुशल गुन्हे शाखेची अन्वेषक, बेला (निम्रत कौर) हरवलेल्या साजिनीला शोधण्यासाठी केस हाती घेते. बेला प्रयत्नांची पराकाष्टा करत असते. डोळ्यासमोर धुसर असं सर्व दिसत असतानाही ठोस असे तिच्या हाती काही लागत नाही आणि सत्य शोधण्यासाठी ती काळाशी झुंज देत असताना, अनपेक्षित वळणांची मालिका उलगडते.
 
या चित्रपटाचे दिग्दर्शन मिखिल मुसळे यांनी केले आहे. मिखील म्हणाले, “कथा एका सामाजिक थरारपटाच्या सेटअपमध्ये तयार करण्यात आली आहे आणि त्यात हिंदी आणि मराठी कलाकारांच्या प्रतिभावान समूहाचे उत्तम मिश्रण आहे. या सर्वांनी हे सुनिश्चित केले आहे की त्यांची उल्लेखनीय कामगिरी केंद्रस्थानी आहे. आम्हाला आशा आहे की चित्रपटाला खूप प्रेम मिळेल कारण त्यांनी सर्वोत्कृष्ट काम केले आहे." . या चित्रपटात राधिका मदन, निम्रत कौर, भाग्यश्री, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शशांक शिंदे आणि सुमीत व्यास यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. २७ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.