पालघर, वसईसह राज्याच्या उत्तरेत पिकांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव

13 Oct 2023 17:49:34




giant african land snail


मुंबई (विशेष प्रतिनिधी):
कोकण, उत्तर महाराष्ट्र, पालघर, वसई या भागांमध्ये शेती पिकांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळुन आले आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या गोगलगायी शेती पिकांचे नुकसान करत असुन शेतकरी हवालदिल झाला आहे.

पालघर आणि इतर भागात प्रादुर्भाव झालेल्या आकाराने बऱ्याच मोठ्या असणाऱ्या या गोगलगायी मुळच्या आफ्रिकन वंशाच्या असल्याचे संशोधक डॉ. हर्षदा कोळी यांनी मुंबई तरूण भारतशी बोलताना सांगितले आहे. ‘जायंट आफ्रिकन लँड स्नेल’ असे या गोगलगायीचे नाव असुन Achatina fulica असे तिचे वैज्ञानिक नाव आहे. अगदी लहान झुडूपांपासून ते मोठ्या झाडांच्या पानांवर या गोगलगायी आढळतात. या प्रजातीच्या गोगलगायींचे प्रजनन मोठ्या संख्येने होते त्यामुळे एकाचवेळी १००-१५० अंडी देण्याची या गोगलगायीची क्षमता असल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते. झाडांची किंवा पिकांची पाने खाल्ल्यामुळे यामध्ये पिकांचे मोठे नुकसान होत असुन शेतकरी यामुळे हवालदिल झाला आहे.

या गोगलगायींना वाढ होण्यासाठी आर्द्र हवामान पोषक असुन जमीन ओली असली किंवा पिकांना पाणी सोडल्यानंतर हे पोषक वातावरण मिळुन या गोगलगायींची संख्या झपाट्याने वाढते. त्याचबरोबर या गोगलगायींचा ठराविक प्रजनन काळ नसल्यामुळे वर्षभर त्यांचे प्रजनन सुरूच राहते. मोठ्या संख्येने प्रजनन करण्याची पद्धत आणि पोषक वातावरण यामुळे त्यांची वाढलेली संख्या पिकांचे नुकसान करत आहेत.

“'Giant African Land Snail' वैज्ञानिक भाषेत Achatina fulica ही गोगलगायी ची प्रजाती मूलतः भारतीय नसून आफ्रिकेतून आयात केलेल्या वस्तूंसोबत भारतात आल्याचे पुरावे आहेत. या प्रजाती ५-४२ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत जगू शकतात हे नुकत्याच झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले असुन या गोगलगायीना पिकांपासून लांब ठेवण्यासाठी तंबाखूचा वापर केला जाऊ शकतो.”

- डॉ. हर्षदा कोळी-साटम,
सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधक
महर्षी दयानंद कॉलेज, परेल, मुंबई


Powered By Sangraha 9.0