मुंबई (विशेष प्रतिनिधी): कर्नाटकमधील सिरसी जिल्ह्यातील बेलाकोपा गावात ‘घाटीयाना सॉग्युनेलेंटा’ या खेकड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे समीर कुमार पती तसेच ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे तेजस ठाकरे आणि स्वप्निल पवार या तीन संशोधकांनी या प्रजातीचा शोध लावला असुन झुटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे.
पश्चिम घाट क्षेत्रात संशोधनात्मक अभ्यास करताना २०२० साली हा खेकडा सर्वप्रथम यांना मिळाला होता. गेली तीन वर्ष यावर संशोधनात्मक काम सुरू असुन तो इतर प्रजातींपेक्षा वेगळा असल्याचे लक्षात आले आणि याविषयीचा शोधनिबंध झुटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी प्रकाशित करण्यात आला आहे.
का ठेवले 'घाटीयाना सॉग्युनेलेंटा' असे नाव?
ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी शोधलेल्या या खेकड्याच्या प्रजातीचे 'घाटीयाना सॉग्युनेलेंटा' से नाव आहे. ‘सॉग्युनेलेंटा’ या लॅटीन शब्दाचा अर्थ लाल किंवा रक्ताच्या रंगाचा असा होत असुन या खेकड्याच्या रंगामुळे त्याचे असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच, आरक्त रंग आणि नरांच्या जननेंद्रियांवरुन ही प्रजाती घाटीयाना पोटजातीतील इतर प्रजातींपेक्षा वेगळी ठरते.
नव्या प्रजातीची वैशिष्ट्ये...
• या कुळातील प्रजाती महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकच्या पश्चिम घाटातुन ज्ञात
• प्रामुख्याने झाडांच्या ढोलीत साठलेल्या पाण्यामध्ये आढळतात
• पावसाळ्यात सर्वाधिक सक्रिय असतात
• छोटे किटक, शेवाळ हे प्रमुख खाद्य
• या कुळातील नर, मादी सारख्याच रंगाचे
'सह्याद्रीयाना' या खेकड्यांच्या नव्या कुळाचा शोध २०१८ मध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी लावला आहे. 'घाटीयाना सॉग्युनेलेंटा' ही ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी शोधलेली खेकड्याची एकविसावी नवी प्रजात आहे. दिवसेंदिवस नव्याने शोधल्या जाणाऱ्या या प्रजातींमुळे पश्चिम घाटातील जैवसमृद्धीत भर पडत असुन त्याचे महत्त्व अधोरेखीत होत आहे.