नाशिक : “या जन्मी मनुष्य म्हणून जन्म मिळणे हे मागच्या जन्मीचेच पुण्य आहे. त्यातही या जन्मात भारतात हिंदू म्हणून जन्माला येणे हे त्याहून जास्त भाग्यच आहे. या कोवळ्या वयात आत्मभान, समाजभान असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी वेळोवेळी पालकांसह शाळेचेही मार्गदर्शन असतेच. आपल्या भोवती समाजात अनेक बर्या वाईट घटना घडत असतात. त्या घटनांची सत्य परिस्थिती दाखविण्याचे काम ‘संवाद आपल्या कन्यांशी’ या सभेमार्फत होत आहे, याचा विशेष आनंद आहे,” असे प्रतिपादन ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’चे सरकार्यवाह हेमंत देशपांडे यांनी केले. भोंसला मिलिटरी कॅम्पस, नाशिक येथील शिशुविहार व बालक मंदिर, विद्या प्रबोधिनी मराठी शाळा व विद्या प्रबोधिनी इंग्रजी शाळा येथे दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे बुधवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी ’संवाद आपल्या कन्यांशी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना हेमंत देशपांडे बोलत होते. या तिन्ही सभांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनीदेखील मार्गदर्शन करत उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधला.

हेमंत देशपांडे पुढे म्हणाले की, “समाजात घडत असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याकडे डोळसपणाने आपल्या सर्वांना पाहावे लागेल. आपले पाऊल कुठे चुकायला नको याची काळजी सर्व मुलींना घ्यावी लागेल. आत्मभान हे आपल्यासाठी असून समाजभान हे आपल्यासोबत असलेली आपली मैत्रीण कशी वागते तिच्या वागण्या-बोलण्यात काही चूक तर होत नाही ना याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. जे आपल्या आजूबाजूला घडतंय त्याबाबत स्वतः सक्षम बनलं पाहिजे. त्यासाठी आपल्या सर्वांचे विचार एकसमान होणे गरजेचे आहे. प्रत्येक मुलीच आयुष्य हे मोलाचं असून प्रत्येक मुलगी ही भविष्यातील सक्षम भारत आहेत. भारताला विश्वगुरू व्हायचे असल्यास कोणत्याही मुलीचे पाऊल चुकीचे पडता कामा नये.”
यावेळी योगिता साळवी यांनी, “राष्ट्रहित सर्वोपरी असे आपल्या सगळ्यांचे ध्येय आहे. देशाचे कल्याण आणि संरक्षण व्हावे त्यासाठी आपण आयुष्य व्यतीत करावे असे सगळ्यांनी ठरवले आहेच. देशाच्या सुरक्षेसाठी, कल्याणासाठी देशाची धर्म-संस्कृती संवर्धित करायला हवी,” असे सांगितले. या तिन्ही सभांमध्ये साळवी यांनी विद्यार्थ्यांपुढील आव्हाने, प्रलोभने, व्यक्तिमत्व विकास, आयुष्यातील ध्येय निश्चिती यश अपयश याबद्दल संवाद साधला.
यावेळी सभेत सहभागी विद्यार्थिनींनी देश आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी कायमच प्रयत्नशील राहू. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला, वाईट विचारांच्या आणि समाजविघातक शक्तीला बळी पडणार नाही, असा निर्धार केला.
यावेळी शिशु विहार बालक मंदिर मराठी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका नीता पाटील, विद्या प्रबोधिनी प्रशालेचे मुख्याध्यापक राजन चेट्टीवार, विद्या प्रबोधिनी प्रशाला (मराठी माध्यम) मुख्याध्यापिका शुभांगी वांगीकर, समन्वयक वैशाली वाकचौरे, सोनाली अकोलकर, शिक्षकवृंद प्रीती नेहते, वंदना राणे, स्वाती संभेराव, यामिनी पुराणिक, नम्रता कुलकर्णी, भाग्यश्री कोतकर आदी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रीती यावलकर, मिनल काळोखे यांनी केले.
‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’च्या सत्य घटनांचे कथन
युवावर्गाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नशेच्या विळख्यात गुंतवले जाते. त्यामुळे त्या युवक-युवतींसोबत त्यांचे कुटुंब, समाज आणि देशाचेही नुकसान होत आहे. या सगळ्यांमुळे देशापुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. श्रद्धा वालकर किंवा साक्षी यांच्यासारखा क्रूर मृत्यू कुणाच्याही नशिबी न येवो. ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’पासून समाजाला धोका आहे हे सांगणार्या अनेक सत्य घटना योगिता साळवी यांनी कथन केल्या.