परराष्ट्र मंत्र्यांनी घेतला ‘ऑपरेशन अजय’चा आढावा

12 Oct 2023 18:16:33
s jayshankar


नवी दिल्ली :
इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’च्या तयारीचा आढावा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी उच्चस्तरीय बैठक झाली. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने बुधवारी 'ऑपरेशन अजय' सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी त्यांच्या सोशल मीडिया 'एक्स'वर त्याची माहिती दिली आहे.

या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी इस्रायलमधील सद्यस्थिती, तेथील सरकारसोहत भारत सरकारचा संवाद – समन्वय आणि युद्धस्थितीतून भारतीयांना परत आणण्यासाठी भारताच्या धोरणाचा आढावा यावेळी घेतला. यावेळी परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांच्यासह अन्य उच्चाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, इस्रायलचे मध्यपश्चिम भारतातील महावाणिज्यदूत कोब्बी शोशानी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'ऑपरेशन अजय' सुरू केल्याबद्दल अभिनंदन केले, ज्या अंतर्गत भारत इस्रायलमध्ये सुमारे १८,००० भारतीयांना परत आणण्याची योजना आखत आहे. इस्रायलमधील भारतीय समुदायाने त्यांच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लावला असून त्यांच्या सुरक्षेसाठी इस्रायल कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

असे आहे ‘ऑपरेशन अजय’

इस्रायलमधून परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांच्या मायदेशी परतण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू करण्यात आले आहे. ही बचाव मोहिम नाही. या कारवाईत विशेष चार्टर्ड विमाने तैनात करण्यात आली असून गरज पडल्यास नौदलाची जहाजेही तैनात करता येतील. या मोहिमेत ज्या भारतीयांना यायचे आहे त्यांनाच परत आणले जाईल. इस्रायलमध्ये सध्या विद्यार्थी, व्यावसायिक आणि व्यावसायिकांसह सुमारे १८,००० भारतीय राहतात.
Powered By Sangraha 9.0