मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांची "दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेला" ‘बँको ब्ल्यू रिबन २०२३’ प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सर्वोत्तम वित्तीय कामगिरी व वित्तीय व्यवस्थापन लक्षात घेता महाराष्ट्रातील पगारदार कर्मचाऱ्यांच्या सहकारी बँक गटामध्ये ‘दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह' बँकेला हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या या बँकेचे सुमारे ७३,८८८ महानगरपालिका कर्मचारी सभासद आहेत. उत्कृष्ट वित्तीय नियोजन, व्यवस्थापन, तसेच कर्ज वसुलीसाठी केलेला सततचा पाठपुरावा, कर्ज मर्यादेतील वाढ यामुळे बँकेची पतसुधारणा (क्रेडीट ग्रोथ) झाली आहे.
दरम्यान, मागील १० वर्षांत बँकेने चौफेर प्रगती पाहता, या सर्वांगीण कामगिरीबद्दल ‘दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई’ ला बँकींग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा ‘बँको ब्ल्यू रिबन २०२३’ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. याचबरोबर दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड, मुंबई यांच्याद्वारे कुर्ला स्थित बंटारा भवन येथे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात पगारदार सहकारी बँक गटात ‘दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई’ या बँकेस द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
‘दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बँकेच्या वतीने बँकेच्या सर्वसाधारण कामकाज समिती अध्यक्षा वर्षा अ.माळी, संचालक विष्णू ग.घुमरे, कर्जव्यवहार समितीचे अध्यक्ष महावीर दा.बनगर , उपाध्यक्ष मुकेश व. घुमरे, संचालक जालंदर ल. चकोर व उप-महाव्यवस्थापक भगवान पाटील यांनी स्वीकारला. तसेच रुपे कार्डच्या सभासद बँकामधील कोणत्याही बँकेच्या ए.टी.एम. वरुन कार्डधारक पैसे काढू शकतात. बँकेने मोबाईल बँकींग सेवा सुरु केली आहे. तसेच या बँकेने एखाद्या खासगी बँकेसारखीच अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित विविध बँकींग सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत, असे बँकेचे महाव्यवस्थापक विनोद रावदका यांनी नमूद केले.