विसंगतीचे राजकारण सुसंगतीचे मुखवटे

08 Jan 2023 20:38:57
नितीश कुमार


जातनिहाय जनगणना जातिनिर्मूलन करणार आहेत की जातींचे पुनरूत्थान करणार आहेत? जातिभेद वाईट आहेत हे महात्मा जोतिराव फुले यांनी जीवनभर सांगितले. जातीभावनेतून आपण मुक्त झाल्याशिवाय आपली उन्नती शक्य नाही, हा विचार सर्व समाजधुरिणांनी मान्य केला.


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 7 जानेवारीपासून बिहार राज्यात जातीय जनगणना करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमासाठी बिहार सरकार 500 कोटी रुपये खर्च करणार असून हा जनगणनेचा कार्यक्रम नऊ महिने चालणार आहे. 14 कोटी लोकसंख्येचे जातनिहाय सर्वेक्षण करण्याचा हा उपक्रम आहे. दर दहा वर्षांनी देशाची जनगणना केली जाते. यापूर्वी 2011साली जणगणना झाली होती. 2021साली जनगणना अपेक्षित होती. परंतु, ती काही झालेली नाही. बिहारमध्ये जे होणार आहे त्याचा तांत्रिक शब्द आहे, ‘सोशियो-इकोनॉमिक कास्ट सेन्सस’ त्याचा मराठी अर्थ आहे, सामाजिक-आर्थिक जातनिहाय जनगणना.

ही जनगणना का आवश्यक आहे आणि त्याचे फायदे कोणते आहेत, हे नितीश कुमार यांच्या शब्दांतूनच पाहूया. ते म्हणतात, “जातींच्या जनगणनेमुळे त्यांच्या विकासाचा आधार निश्चित होईल.” नितीश कुमार यांची बिहारमध्ये ‘समाधान यात्रा’ चालू आहे. या समाधान यात्रेत जातीय जनगणनेविषयी ते म्हणाले, “ही जनगणना केवळ जातींची गणना असणार नसून राज्यातील प्रत्येक परिवाराविषयी पूर्ण माहिती संकलित केली जाईल. त्यामुळे देशाच्या विकासात आणि समाजाच्या उत्थानात त्याचा खूप फायदा होईल. जनगणना करणार्‍यांचे पूर्ण प्रशिक्षण करण्यात आलेले आहे. त्यांनी जी आवश्यक माहिती आहे ती गोळा करावी, याबद्दल त्यांना शिक्षितदेखील करण्यात आलेले आहे.”

जातनिहाय जनगणना इंग्रजांनी भारतात सुरू केली. पहिली जनगणना 1931साली झाली. जातींची संख्या मोजण्याचा 1931 ही जनगणना आधार झाला. मंडल आयोगाने याच आधारावर मागासवर्गीय जातींची संख्या 52 टक्क्यांच्या जवळपास ठरविली. ते अनेकांना मान्य नाही. अनेकजणांचे म्हणणे असे आहे की, देशात मागासवर्गीयांची संख्या 75 टक्क्यांच्या आसपास आहे. पं. जवाहरलाल नेहरू यांनी मागासवर्गीयांचा विचार करण्यासाठी कालेलकर आयोग नेमला. त्याच्या शिफारशी तशाच पडून राहिल्या. मोरारजी देसाई यांनी मंडल आयोग नेमला, त्याची अंमलबजावणी 1990साली व्ही. पी. सिंग यांनी केली. मागासवर्गीयांना शासकीय नोकर्‍यांत 27 टक्के आरक्षण देण्यात आले. त्यांनतर अर्जुनसिंग यांनी मागासवर्गीयांचे आरक्षण सर्व शिक्षण संस्थांना लागू केले.

इंग्रजांचा जातनिहाय जनगणना करझ्याचा हेतू मागासवर्गीयांचे मागासलेपण मिटविण्याचा, त्यांना शैक्षणिक संधी देण्याचा, त्यांची आर्थिक उन्नती करण्याचा नव्हता. समाजात राजकीय फूट पडावी, आपापसात कलह निर्माण व्हावेत, ही त्यांची नीती होती. ‘फोडा आणि झोडा’ या नीतीप्रमाणे ते राज्य करीत. 1931नंतर त्यांनी जातीय जनगणना केली नाही. 2011पर्यंत स्वतंत्र भारतातील शासनानेदेखील जातीय जनगणना केली नाही. 2011च्या जनगणनेचे आकडे घोषित केलेलेदेखील नाहीत.देशातील सर्वच राजकीय पक्ष जातनिहाय जनगणनेची मागणी करतात. गोपीनाथराव मुंडे यांनीदेखील लोकसभेत जातीय जनगणनेची मागणी केली होती. आताच्या बिहारच्या जातीय जनगणनेला बिहारमध्ये भाजपचा पाठिंबा आहे. कोणताही राजकीय पक्ष जेव्हा जेव्हा जातीसंबंधी विषय येतो तेव्हा तेव्हा तो जातींना अनुकूल भूमिका घेतो. मराठा, धनगर आरक्षण नको, असे कोणताही राजकीय पक्ष म्हणत नाही. जनाधार गमविण्याची त्याला भीती वाटते.

नितीश कुमार हे मुरब्बी राजकारणी आहेत. असा राजकारणी नेता महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना तो योग्य वेळ साधतो. नितीश कुमार यांनी 2024ची निवडणूक डोळ्यापुढे ठेवली आहे. भाजपविरोधी पक्षांची एकजूट करण्याचा विषय चालू आहे. या एकजुटीला एक चेहरा लागेल, नितीश कुमार हा चेहरा देण्याच्या शर्यतीत आहेत. पहिली गोष्ट त्यांनी केली, ती म्हणजे भाजपबरोबर काडीमोड घेतला. आणि तेजस्वी यादव यांच्याशी युती केली. भाजपशी लढायचे असेल, तर भाजपबरोबर सत्तेत बसता येत नाही. आता दुसरा प्रश्न आला तो म्हणजे बहुसंख्य मतदारांना मान्य होईल, अशी आपली प्रतिमा कशी तयार करायची. त्यासाठी जातीय जनगणेनेचा खूप उपयोग आहे, हे धूर्त नितीश कुमार यांच्या लक्षात आले. व्ही. पी. सिंग यांनीदेखील मंडल आयोग लागू करताना आपले पंतप्रधानपदाचे प्रतिस्पर्धी देवीलाल यांना शह देण्यासाठी 27 टक्के आरक्षणाची घोषणा करून टाकली.

 मागासवर्गीयांविषयी त्यांना आंतरिक जिव्हाळा होता, त्यांच्या उत्थानासाठी त्यांनी खूप संघर्ष केला होता, वगैरे काही नाही. सामाजिक उत्थानासाठी संघर्ष करणार्‍या महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, यांच्या पासंगालाही ते उतरणारे नव्हते. नितीश कुमार यांच्या मनातदेखील राजकीय गेम करण्याची योजना आहे, ती आपण जाणून घ्यायला पाहिजे.जातीय जनगणनेचे जसे फायदे आहेत तसे असंख्य तोटे आहेत. सामाजिक मागासलेपण आणि आर्थिक मागासलेपण निश्चित करण्यासाठी ही जनगणना होत आहे. समजा, या जनगणनेत काही जाती सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या अजिबात मागासलेल्या नाहीत, असे समोर आल्यास त्यांचे आरक्षण रद्द केले जाणार का? काही जातींची जनसंख्या घटत चालली आहे, असे जर लक्षात आले तर त्या जाती आपली संख्या वाढविण्यासाठी कुटुंबनियोजनाला बाजूला सारतील, हे नितीश कुमार यांना चालेल का?

या जनगणनेत अत्यंत मागास म्हणून काही जाती उजेडात आल्या तर 27 टक्क्यांतील आरक्षणातील काही टक्के त्यांच्यासाठी राखीव ठेवले जाईल का, दुसर्‍या भाषेत आरक्षणात आरक्षण केले जाईल का? असे केले असता आरक्षणाचा लाभ घेणार्‍या जाती स्वस्थ बसतील का? त्यांनी आंदोलन सुरू केले तर ते अन्य जातींविरूद्धचे आंदोलन होईल. सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण स्वातंत्र्यानंतर का कायम राहिले? त्याला जबाबदार कोण? याचा या जनगणेनेत शोध होणार आहे का?राजकारणी नेत्याला या प्रश्नांशी काही कर्तव्य नसते. आपण मागासवर्गीयांचे आणि त्यातही मागासवर्गातील मागासांचे हितकर्ते आहोत, अशी प्रतिमा त्यांना उत्पन्न करायची आहे. संपूर्ण देशाचा विचार करता ही प्रतिमा मते मिळविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे नितीश कुमार यांना वाटते. भारतीय जनता पक्षाचा जनाधार हा केवळ उच्च जाती नसून मागासवर्गीय, दलित, वनवासी, या सर्वांचा पाठिंबा भाजपला प्राप्त होतो. म्हणून भाजपला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी जातनिहाय जनगणनेचा घाट नितीश कुमार यांनी घातलेला आहे.

हे झाले राजकारण! त्याच्याही पलीकडे जाऊन जातिनिर्मूलनाचा विचार करावा लागतो. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे जातिनिर्मूलन या विषयावरील जगप्रसिद्ध भाषण आहे. हिंदू समाज जातीत विभागल्यामुळे त्याची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक अवनती कशी झाली, याचे जबरदस्त विवरण या भाषणात आहे. घटना समितीतील अखेरच्या भाषणात ते सांगून गेले की, जाती राष्ट्रविरोधी आहेत, त्या नष्ट झाल्या पाहिजेत. जातनिहाय जनगणना जातिनिर्मूलन करणार आहेत की जातींचे पुनरूत्थान करणार आहेत? जातिभेद वाईट आहेत हे महात्मा जोतिराव फुले यांनी जीवनभर सांगितले. जातीभावनेतून आपण मुक्त झाल्याशिवाय आपली उन्नती शक्य नाही, हा विचार सर्व समाजधुरिणांनी मान्य केला.

राजकारणी लोकांना तसे वाटत नाही. त्यांच्या डोळ्यांपुढे मतबँका असतात. ‘एक जात-एक बँक’ अशा तीन-चार बँका एकत्र केल्या की, मतांचे भांडवल प्रचंड होते. त्यामुळे जाती अस्मिता जागवा, जातीय अस्मितांचे राजकारण करा, महापुरूषांना आणि संतांना जातींचे नेते बनवा, हे पराक्रम करण्यात सगळे राजकीय नेते दंग असतात. हे सर्व पाहिलं की, आपण कमालीच्या विसंगतीपूर्ण समाजरचनेत जगत आहोत, हे जाणविल्याशिवाय राहत नाही. एका बाजूला संत परंपरा आहे जी जातीभेद मानीत नाही, दुसर्‍या बाजूला समाजसुधारकांची परंपरा आहे, जे जातिभेद नाकारून समाजाची रचना सार्वत्रिक बंधुतेच्या भावनेवर का निर्माण झाली पाहिजे याचे विवेचन करतात आणि तिसर्‍या बाजूला आमचे राजनेते आहेत, जे या दोन्ही परंपरा खाकेला मारून जातिवादी राजकारणाचा नंगानाच करीत राहतात. ते इतके हुशार आहेत की, आपला मुखवटा मात्र जातिनिर्मूलनाचाच राहील, जातीअंताचा राहील, सार्वत्रिक बंधुतेचा राहील, हे पाहण्यात ते कसलीही कसूर सोडत नाहीत. अशा विसंगतीपूर्ण समाज जीवनाचा एक दारूण परिणाम संभवतो. तो म्हणजे विसंगती हीच सुसंगती वाटून आपण सर्व दुहेरी मुखवटा धारण केलेले समाजघटक बनू.






Powered By Sangraha 9.0