छत्रपती शिवरायांची कालातीत युद्धनीती

07 Jan 2023 21:52:34
Chhatrapati Shivarai's war strategy


छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र, श्रीशैलम, हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राज्यकारभार, आधुनिक भारतासाठी धडे (Shivaji Maharaj State Craft, Lessons For Modern India)' हा परिसंवाद दि. २४-२५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादामध्ये २५ वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञांनी भाग घेतला. त्यानिमित्ताने आजच्या लेखात छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती, युद्धाचे डावपेच आणि गनिमीकावा याविषयी जाणून घेऊया...


छत्रपती शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन, महसूल संकलन आणि कर प्रणाली, त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा, स्त्रियांचा आदर आणि त्यांचे कल्याण, त्यांची लष्करी रणनीती, डावपेच, सशस्त्र दल, आयुध व्यवस्थापन आणि नौदल अशा वेगवेगळ्या विषयांवर हा परिसंवाद संपन्न झाला.त्यावेळेचे शत्रू होते मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, देशाच्या आतले देशद्रोही आणि आजचे देशाचे शत्रू आहेत चीन, पाकिस्तान, बांगलादेश, दहशतवादी, माओवादी आणि त्यांचे आतले देशद्रोही हस्तक!


मुघल आणि औरंगजेबाचे सैन्य


अनेक वर्षे राज्य केल्यामुळे मुघल सैन्य हे हळूहळू आळशी, लालची, अत्याचार करणारे बनू लागले. त्यांच्या फौजांमध्ये भाडोत्री सैनिकांची संख्या वाढली.वेगवेगळी विचारसरणी. त्यात एकमेकांशीही सैनिकांचे संबंध फारसे चांगले नव्हते. रक्षण करण्याकरिता फार जास्त सैन्य वापरले जात होते. त्यामुळे आक्रमक कारवाईकरिता ५०-६० हजार सैन्य उपलब्ध व्हायचे.मुघल सैन्य एक हालते शहर होते. कुटुंबाचे कबिले, बाजारबुणगे, बिनलढाऊ सैनिक, रसद पुरवणारे असे सगळेच या सैन्याचा भाग होते. घोड्यांची रसद = सहा कि.ग्रॅम, सैनिकांची रसद = दोन कि.ग्रॅम. प्रति दिवस असायची. यामुळे बाजारबुणग्यांची संख्या सैनिकांच्या पाचपट जास्त होती.

तोफखान्याकरिता सैन्याला हत्ती, घोडे, उंट लागायचे. नद्या आणि नाले पार करणे कठीण असायचे. सैन्याचा चालण्याचा वेग दिवसाला ३० किमी इतकाहोता. आठवड्याला दोन विश्रांतीचे दिवस असायचे. लढाईचे दिवस आणि वेळ ज्योतिषशास्त्रावर अवलंबून असायचे.जिंकलेल्या भूमीवर अधिपत्य ठेवणे फार कठीण होते, ज्यासाठी सैन्याची गरज पडायची. हुकूम/पत्रव्यवहार घोडेस्वारांच्या मदतीने व्हायचा. जखमी सैनिकांच्या उपचाराकरिता हकिमांची कमी असायची.

युद्धाचे डावपेच


सैन्याच्या रचनेत पहिली फळी तोफखाना, दुसरी फळी एक डिव्हिजन, तिसरी फळी मुख्य सैन्य होती, घोडेस्वारांचा सैन्यावर बाजूने हल्ला (अढढअउघ ऋठजच ऋङअछघड) व्हायचा, मग हातघाईची झटापट होऊन सैन्याची पळापळ व्हायची. किल्ले लबाडी करून, धूर्तपणे जिंकले जायचे. तसे झाले नाही, तर चारही बाजूने वेढा घालून, तोफांनी तटबंदीवर खिंडार पाडून हल्ला केला जायचा. पुरंदरचा किल्ला जिंकायला मुघलांना तब्बल चार महिने लागले. मात्र,तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला एका रात्रीत अचानक कड्याच्या बाजूने हल्ला करून जिंकला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य


छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची सुरुवात तीन-चार हजार सैनिकांनी झाली. राज्यभिषेकाच्या वेळी ४५ हजार बारगीर, ६० हजार शिलेदार, एकूण १०५ हजार घोडदळ होते, पायदळ ६० हजार होते. पायदल चपळ, काटक आणि अतिशय जलदगतीने हालचाल करणारे होते. महाराजांचे अंगरक्षक दोन हजार अतिकुशल, शूर मावळे होते. सैन्यात वेगावर मर्यादा येतील असे काही नव्हते. बाजारबुणग्यांना थारा नव्हता. त्यामुळे शिवाजी महाराजांचे सैन्य लांब लांब मजल सहज मारीत असे. अचानक हालचाली करू शकत. युद्धाच्या वेळी नांगर सोडून प्रत्येक नागरिकाच्या हाती शस्त्र असायचे. सर्व सैनिक, गुप्तहेर कामसुद्धा करायचे. तलवारी आणि भाले ही त्याकाळी मुख्य शस्त्रे होती.

तोफखान्यामुळे सैनिकांची हालचाल करण्याचा वेग हा कमी व्हायचा. तोफखान्याचा वापर फक्त किल्ल्यावरती आणि नौदलाच्या बोटींवरती केला जात होता.किल्ल्यांचे मुख्य काम आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे होते. शत्रूंच्या किल्ल्यांवर लक्ष ठेवण्याकरिता किल्ले, महत्त्वाच्या ठिकाणी बांधले गेले होते. किल्ल्यांकरिता तटबंदी, मनोरे, वॉच टॉवर, खंदक, एक रस्ता, बालेकिल्ला असायचा. शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचा वापर आक्रमक गनिमी काव्याकरिता केला.

शिवाजी महाराज आणि गनिमी कावा


शिवरायांच्या मावळ्यांनी मुघलांवर वेगवेगळ्या दिशेने हल्ले, अचानक हल्ले चढवले. कधी समोरून, कधी मागून... शत्रूंच्या कमजोर भागांवर, शत्रूं बेसावध असताना, शत्रूच्या रसद पुरवणार्‍या रस्त्यांवर हल्ले करण्यात आले. छोट्या टोळ्या, आजूबाजूला असलेल्या भागावरच आपला गुजारा करणार्‍या नागरिकांची मदत गनिमी काव्यसाठी घेतली जायची.गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक/ जाधव होते. महाराजांचे गुप्तहेर खाते अति उच्च दर्जाचे होते, ज्यामुळे अनेक युद्धांमध्ये विजय मिळाला. शाहिस्तेखानावर हल्ला, सुरतवर हल्ला- नेमक्या गुप्तहेर माहितीमुळे शक्य झाला. महाराज स्वतः गुप्तहेर खात्यावरती आपली नजर ठेवून असायचे.

राज्याभिषेकाच्या वेळेला नौदलामध्ये १०० जहाजे होती. शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये अनेक किल्ले बांधले. त्यामुळे सुरक्षा कमालीची सुधारली. गलबतांवर २५ ते ३० नौसैनिक, गुराबावर १५० ते ३०० नौसैनिक तैनात असायचे. या जहाजांनी गनिमी कावा वापरून, सागरी सुरक्षा सुधारली, समुद्रामध्येसुद्धा स्वराज्य निर्माण केले .


छत्रपती शिवाजी महाराज :एक सामरिक तज्ज्ञ


एका वेळेस फक्त एकाच शत्रूशी लढाई, इतर शत्रूंशी समेट... कधी शत्रूंपासून रक्षण, कधी हल्ले, सामरिक खोलीकरिता आदिलशाहीवर हल्ले, मुघलांना सह्याद्री पर्वतरांगात यायला भाग पाडणे, अशी शिवाजी महाराजांची सामरिक युद्धनीती होती. वेगवेगळ्या ठिकाणचे सैन्य नेमके हल्ल्यांच्या वेळेला एका ठिकाणी आणायचे, किल्ल्यांचा वापर एक सुरक्षित स्थान म्हणून करायचा, अशी त्यांची नीती होती. म्हणूनच पोर्तुगीज, ब्रिटिश इतिहासकारांनी छत्रपतींची तुलना सिझर, अलेक्झांडर,हनीबल या जागतिक महायोद्ध्यांशी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे एक लष्करी प्रतिभावंत होते, ज्यांनी युद्ध लढण्याची भारतीय पद्धत विकसित केली आणि शत्रूंना भारतीय शस्त्रांनी पराभूत केले.

एक दुर्ग महत्त्वाचा तो म्हणजे नरदुर्ग


अनेक थोर पुरुषांची प्रेरणा ‘शिवाजी’ या मंत्रात आहे. या मंत्राची प्रेरणा आजही तितकीच गरजेची आहे. आज देशासमोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत. इतिहास हा गतकाळाचा साक्षीदार, भावी काळाचा वाटाड्या असतो, असे म्हणतात. जे राष्ट्र इतिहासापासून शिकत नाही, ते कधीही महासत्ता बनू शकत नाही. राजांच्या असंख्य गुणांपैकी किती गुण हे देशाच्या लोकप्रकृतीमध्ये उतरले, हे महत्त्वाचे आहे. नरदुर्ग म्हणजे किल्ल्यासारखी बुलंद, मजबूत, शूर, निष्ठावान, पराक्रमी माणसे महाराजांनी घडवली.

लढाईमध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक सैनिक आणि त्याचे शौर्य. लढाई सैनिकांमुळे जिंकली जाते. प्रत्येकच लढाईमध्ये सैनिक कसे लढतात, यावर जय आणि पराजयाचा फैसला होतो. शिवाजी महाराजांनी धोकादायक परिस्थितीमध्ये सर्वांत पुढे लढाई करून सैनिकांचे नेतृत्व केले आणि त्यामुळेच मराठ्यांनी त्यावेळेला महापराक्रम गाजवला. शिवाजी महाराजांची पुढून नेतृत्व करायची परंपरा आजसुद्धा भारतीय सैन्य चालवत आहे, ज्यामुळे चीन आणि पाकिस्तानला आपण धडा शिकवतो. परंतु, त्याची किंमत आपल्याला आपल्या अधिकार्‍यांचे रक्त सांडून मोजावी लागते.
 

छत्रपती शिवरायांचे इतिहासात स्थान


कर्तृत्ववान आणि धोरणी राजा, रणनीतीचे नैपुण्य, दुरदृष्टी, शक्ती आणि युक्तीचा वापर, सर्वसामान्यांचा कैवारी, शिस्तप्रिय, कार्यकुशल शासनकर्ता, अतिकुशल युद्ध नेतृत्व, जाणता राजा ज्याने सर्वसामान्यांची हृदये जिंकली, असामान्य बुद्धिमत्ता आणि युद्धकौशल्याने तत्कालीन परिस्थितीला साजेशी युद्धयंत्रणा तयार केली, अत्याचाराने दबलेल्या हिंदूंच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली, असे हे छत्रपती शिवराय एक युगपुरुषच होते.

शिवाजी महाराजांच्या आधी मराठा सरदार मुघलांकरिता भाडोत्री सैनिकांचे काम करायचे किंवा त्यांच्याकरिता कर वसुली करायचे. परंतु, शिवाजी महाराजांनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले की, मराठा स्वतःचे, जनतेचे आणि जमिनीचे मुघलांपासून रक्षण करून स्वतःचे स्वराज्य निर्माण करण्यास सक्षम होते. काही इतिहासकारांनी त्यांना फक्त महाराष्ट्राचे हिरो बनवून ठेवले आहे. पण, शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्र नाही, तर पूर्ण देशाचे हिरो आहेत.हिंदुस्थानच्या इतिहासातून शिवराय, महाराष्ट्र आणि मराठे वगळल्यास केवळ पराजयच आणि पराजयच दिसतो. मराठा आणि मराठा धर्माने १७वे आणि १८वे शतक आपल्या पराक्रमाने गाजविले.

शिवाजी महाराजांची युद्धपद्धती, राज्यपद्धती आधुनिक भारताला आजसुद्धा योग्य मार्गावर जाण्यामध्ये मदत करू शकते. ‘शिवाजी स्फूर्ती केंद्रा’ने आयोजित केलेल्या परिसंवादामुळे शिवाजी महाराजांना देशाच्या इतिहासामधले यांचे योग्य स्थान मिळण्यामध्ये नक्कीच मदत मिळेल. १०० टक्के शिवाजी होणे शक्य नसेल, तर ४०-५० टक्के, २०-३० तरी शिवाजी बना. तसे झाले तरच आपण जागतिक महाशक्ती बनू शकतो.





Powered By Sangraha 9.0