केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील योजनांचा आढावा

06 Jan 2023 17:35:24

अजय मिश्रा

सातारा : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांचा सविस्तर आढावा फलटण दौऱ्यात घेतला. या दौऱ्यादरम्यान फलटण येथील प्रांताधिकारी कार्यालयातील दरबार हॉल येथे जिल्हास्तरीय अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत मिश्रा यांनी हा आढावा घेतला.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
समाजातील वंचित व दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे ही सरकारची भूमिका असल्याचे सांगून मिश्रा यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. या योजना जिल्ह्यात चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अशाच प्रकारे या योजना वंचित व दुर्बल घटकांपर्यंत पोहचवा, असेही ते यावेळी म्हणाले.
दौऱ्याच्या सुरुवातीस मिश्रा यांनी निंभोरे येथे पालखी महामार्गाची पाहणी केली. तसेच फलटण शहरात विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी लाभार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व योजनांचा लाभ चांगल्या प्रकारे मिळत असल्याचेही सांगितले.
Powered By Sangraha 9.0