मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गुरुवार, दि. ५ जानेवारी रोजी आपल्याला व्हाट्सअँपच्या माध्यमातून मेसेज करून संदीप सिंह नामक व्यक्तीने आपल्याला कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती तिवाना यांनी दिली आहे. ही धमकी खलिस्तानी आतांकवाद्यांकडून आल्याचे त्यांनी म्हटले असून या प्रकरणी बांगर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तिवाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणारी व्यक्ती खलिस्तानी आतंकवादी असुम यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांना अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आलेल्या आहेत. तिवाना यांना पाठवलेल्या संदेशात 'तू भाजप सोड अन्यथा तुला आणि तुझ्या परिवाराला जीवे मारण्यात येईल' असे नमूद करण्यात आले आहे.
तसेच तिवाना यांनी यावेळी खलिस्तानी आणि लष्कर ए खालसा या संघटनांना आव्हान दिले असून माझ्यासह माझ्या देशाला आणि आमच्या सैन्याला हात लावण्यापूर्वी चीनला जाऊन त्यांची स्थिती विचारा असे म्हटले आहे.