'जय जय महाराष्ट्र माझा' गीत बनलं 'महाराष्ट्र राज्यगीत'
31 Jan 2023 15:28:29
मुंबई : 'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रचे राज्यगीत म्हणून घोषीत झाले आहे. हे गीत राज्यगीत झाल्याची घोषणा सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून लागू केले जाणार आहे. दि.३१ जानेवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेपासून गेली ६२ वर्षे मराठी मनावर अधिराज्य करणारे एक स्फूर्तिदायक आणि ऊर्जा देणारे गीत म्हणजे 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’! कविवर्य राजा बढे लिखित, ख्यातनाम श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेल्या या महाराष्ट्र गौरव गीताला आता अधिकृत राज्यगीताचा दर्जा प्राप्त होणार आहे, ही खरंच आनंदाची आणि स्वागतार्ह बाब आहे.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्यावेळी मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या समारंभात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे महाराष्ट्र गीत पहिल्यांदा सादर केले आणि त्यानंतर ६२ वर्षानंतर आजही त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. अधिकृत राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर सर्व शासकीय कार्यक्रमांत हे गीत वाजविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ राज्यगीताने तर समारोप राष्ट्रगीताने होणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला स्वतःचे असे एक राज्यगीत असावे असा निर्णय झाला आहे. त्यानुसार सध्या देशातील निवडक ११ राज्यांनी स्वतःचे राज्यगीत तयार केले आहे. त्यात आता महाराष्ट्राची भर पडणार आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे.