‘सर्जिकल’चे पुरावे मागणार्‍या काँग्रेसवरच ‘स्ट्राईक’

30 Jan 2023 19:59:51
surgical strikes

बालाकोट परिसरातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून ते तळ उद्ध्वस्त करण्याची कामगिरी भारतीय लष्कराने केली. या कामगिरीचे कौतुक करण्याऐवजी काँग्रेससह विरोधकांनी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे द्या अशी मागणी केली ही मागणी आता काँग्रेसवर बुमरँग सारखी उलटली आहे.

"पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर भीषण हल्ला केल्यानंतर या हल्ल्यामागील सूत्रधार असलेल्या पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी भारताने बालाकोट परिसरातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून ते तळ उद्ध्वस्त केले होते. केंद्र सरकारच्या या कृतीचे समस्त देशवासीयांनी स्वागत केले होते. पण आपल्याच देशातील काही नतद्रष्टांचा भारताने केलेल्या या हवाई हल्ल्यांवर विश्वास नाही. काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी सोमवार, दि. २३ जानेवारी या दिवशी, ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे द्यावेत,” अशी मागणी केली होती.

आपली ही मागणी काँग्रेसकडून उचलून धरली जाईल, असे दिग्विजयसिंह यांना वाटले असावे. “काँग्रेसचे नेते रशीद अल्वी यांनी त्यांची री ओढली होती. पण ते वगळता त्यांच्यामागेअन्य कोणीही उभे राहिले नाही. राहुल गांधी यांच्यासकट काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिग्विजयसिंह यांची पाठराखण करण्यास नकार दिला. एवढेच नव्हे, तर हे काही काँग्रेसचे मत नाही, ते दिग्विजयसिंह यांचे वैयक्तिक मत असू शकते, अशी पुस्तीही राहुल गांधी यांनी जोडली. दिग्विजयसिंह यांच्याप्रमाणे मोदी यांना विरोध करणार्‍या काही नेत्यांचेही असेच मत आहे. पण जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स नेते आणि फारूक अब्दुल्ला यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी मात्र, ‘सर्जिकल स्ट्राईक’बद्दल आपण कधी शंका घेतली नाही आणि भविष्यातही घेणार नाही,” असे स्पष्टपणे म्हटले आहे.

“खरे म्हणजे जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे ‘३७०’ आणि ‘३५ अ’ हे कलम रद्द केल्यानंतर अब्दुल्ला पिता-पुत्र आणि अन्य काश्मिरी नेत्यांनी थयथयाट केला होता. हे कलम रद्द केल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अशी धमकीही या नेत्यांनी दिली होती. काश्मीरला विशेष अधिकार देणारी कलमे पुन्हा लागू करेतोपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धारही या काश्मिरी नेत्यांनी केला, असे असतानाही ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवार, दि. २७ जानेवारी या दिवशी, आपल्या ‘नॅशनल कॉन्फरन्स’ पक्षाने ‘सर्जिकल स्ट्राईक’बाबत कधीही शंका उपस्थित केल्या नाहीत,” असे स्पष्ट केले.

दिग्विजयसिंह यांनी जो मुद्दा उपस्थित केला ती त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे, असेही ओमर अब्दुल्ला म्हणाले. दिग्विजयसिंह यांना आपल्यामागे काँग्रेसचे वरिष्ठ नेते उभे राहतील, असे वाटले होते. पण कोणीही त्यांच्या मागे उभे राहिले नाही. ओमर अब्दुल्ला यांनीही या ‘सर्जिकल स्ट्राईक’बद्दल शंका घेतली नाही. पण भाजपद्वेष्ट्या दिग्विजयसिंह यांच्या मनात तशी शंका आली. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांना खडसावले हे बरे झाले!

३००० बंजारा तांड्यांमध्ये धर्मांतराचे रॅकेट !

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे २५ ते ३० जानेवारी या कालावधीत बंजारा समाजकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कुंभ मेळ्याचेउद्घाटन बंजारा समाजातील संत बाबूसिंगजी महाराज यांनी केले. आपल्या भाषणात बाबूसिंगजी महाराज यांनी, बंजारा समाजाच्या तीन हजार तांड्यांमध्ये धर्मांतराचे प्रकार घडत असल्याची माहिती दिली. या समाजातील अनेक लोक ख्रिश्चन झाले असले तरी आपण आणि अन्य संतमंडळी त्या लोकांना पुन्हा हिंदू समाजात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

बंजारा समाजाचा असा कुंभमेळा प्रथमच आयोजित करण्यात आला होता. या कुंभमेळ्यामध्ये अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख शरदराव ढोले, महामंडलेश्वरगुरू शारदानंद महाराज, संत गोपालचैतन्य महाराज, संत सुरेश महाराज, महंत संग्रामसिंह महाराज यांच्यासह अनेक संतमहंत सहभागी झाले होते.आपल्या भाषणात बाबूसिंगजी महाराज म्हणाले की, “आठ राज्यांमध्ये पसरलेल्या बंजारा समाजाच्या ११ हजार तांड्यांपैकी तीन हजार तांड्यातील काही लोक धर्मांतरित झाले आहेत. ख्रिश्चन मिशनर्‍यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांचे धर्मांतर केले आहे. ज्यांचे धर्मांतर झाले आहे त्यांना पुन्हा हिंदू समाजात परत आणले जाईल. हिंदू गोर बंजारा आणि लाबाना नायकडा समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख शरदराव ढोले यांनी आपल्या भाषणात, बंजारा समाजाचे धर्मांतररोखण्यासाठी शेकडो संत या कुंभमेळ्यासाठी येथे आले आहेत. भारताची संपत्ती पाहून परकीय आक्रमकांनी भारतावर आक्रमण केले. इस्लामी आक्रमक अत्यंत क्रूर होते. त्यांनी लक्षावधी हिंदूंचे तलवारीच्या जोरावर धर्मांतर केले, तर ख्रिस्ती मिशनर्‍यांनी विश्वासघात, द्वेष आणि सेवेचा वापर करून धर्मांतर केले. या ख्रिस्ती धर्मांतरातून स्वतंत्र राज्य आणि स्वतंत्र देशाची मागणी पुढे आली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ईशान्य राज्यातील सातपैकी चार राज्यात ख्रिश्चन मोठ्या संख्येने आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. बंजारा कुंभमुळे मोठ्या प्रमाणात हिंदू समाजात जागृती निर्माण होऊन धर्मांतर करण्याचे ख्रिस्ती मिशनर्‍यांचेप्रयत्न हाणून पाडले जातील, असा विश्वास या कुंभमेळ्याच्यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

... तर प्रत्येक शहर करबाला होईल : मुस्लीम आमदाराचे वक्तव्य
“बिहारमधील जनता दल (संयुक्त) आमदार गुलाम रसूल बलयानी केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यामुळेसंतापाची लाट उसळली आहे. झारखंडमधील हजारीबाग येथील करबला मैदानावरील सभेत बोलताना कोणीही प्रेषिताबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास मुस्लीम समाज सर्व शहरांचे करबालामध्ये रूपांतर करतील,” असे जदयुच्या या आमदाराने धमकाविले आहे. “आपण काही चुकीचे बोललो असेही या आमदारास वाटत नाही. मी जे काही बोललो त्यावर ठाम असल्याचे या आमदाराने त्यानंतरही सांगितले. आपण आता करबला मैदानावर आहोत. तुम्ही जर प्रेषिताचा अनादर केला तर आम्ही प्रत्येक शहराचे करबाला करू,” असे या आमदाराने धमकाविले आहे.


“करबालांचे युद्ध सातव्या शतकात आजच्या इराकमध्येझाले होते. इस्लामची ध्वजा उंच राखण्यासाठी झालेल्या त्या लढाईत प्रेषित महंमद यांचा नातू हुसेन, त्याचे ७२ अनुयायी आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनी बलिदान दिले होते. त्या करबाला युद्धाचे स्मरण या आमदाराने मुस्लिमेतरांना करून दिले. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी जी कथित टिप्पणी केली होती त्याकडे त्या आमदाराच्या बोलण्याचा रोख होता. नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी एकाही धर्मनिरपेक्ष नेत्याने केली नाही, याकडेही त्या आमदाराने लक्ष वेधले. मुस्लीम तरुणांना दहशतवादी ठरवून त्यांची हत्या केली जाऊ नये, म्हणून मुस्लीम सुरक्षा कायदा करावा,” अशी मागणीही त्यांनी केली आहे. दहशतवादी ठरवून आमच्या मुलांना १८ ते २० वर्षे तुरुंगात डांबण्यात येते, याकडेही या आमदाराने लक्ष वेधले.

“जदयुच्या त्या आमदाराचा केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी निषेध केला आहे. नितीश कुमार हे धृतराष्ट्रासारखे सत्तेला चिकटून बसले आहेत. बिहारमधील सामाजिक तणाव वाढविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत,” असेही ते म्हणाले. यासंदर्भात जदयू नेते मृत्युंजय तिवारी यांनी याप्रकरणी पक्ष चौकशी करेल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करेल, असे म्हटले आहे, तर अशा वक्तव्यास कोणताही धर्म व समाज पाठिंबा देणार नाही, असे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. नितीशकुमार यांच्या पक्षाचा आमदार समाजासमाजात तेढ निर्माण करणारी भाषा कशी वापरत आहे त्याची कल्पना या घटनेवरून यावी!


AIR SHOW

बंगळुरु ‘एअरो इंडिया शो’ : १० किमी परिसरात मांसाहारी पदार्थांवर बंदी
“कर्नाटकची राजधानी बंगळुरु शहरात येत्या १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान ‘एअरो इंडिया शो’चे आयोजन करण्यात आले आहे. बंगळुरु येथील ‘येलहांका हवाई दल केंद्रा’वर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम लक्षात घेऊन या ‘हवाई दल केंद्रा’च्या दहा किमी परिसरात मांस, मांसाहारी पदार्थ विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बंगळुरु महापालिकेने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. या ‘एअर शो’च्या दरम्यान ‘येलहांका हवाई दल केंद्रा’च्या परिसरातील सर्व हॉटेल आणि मांसविक्री करणार्‍यांना मांस विक्री आणि मांसाहारी पदार्थांची विक्री न करण्याचे आदेश दिले आहेत. ३० जानेवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत हा आदेश अमलात असेल,” असे महापालिकेने संबंधितांना कळविले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पालिका कायदा आणि ‘एअरक्राफ्ट’ कायद्यानुसर, कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

१३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणारा हा १४ वा ‘एअर शो’ आहे. मांसाहारी पदार्थ किंवा मांस फेकूनदिल्यानंतर गिधाडे, घारी यांच्यासह अनेक पक्षी त्याकडे आकृष्ट होतात. ‘एअर शो’च्या वेळी असे पक्षीमध्ये आल्यास विमानांना अपघात होण्याची शक्यता असते हे गृहीत धरून मांस आणि मांसाहारी पदार्थ विक्रीवर त्या ‘हवाई दल केंद्रा’च्या दहा किमी परिसरात बंदी घालण्यात आली आहे. हा ‘एअर शो’ संरक्षण मंत्रालय, संरक्षण उत्पादन विभाग यांनी आयोजित केला असून, त्या दरम्यान भारतीय हवाई दलाकडून चित्तथरारक प्रात्यक्षिकेही केली जाणार आहेत. या ‘एअर शो’मध्येजागतिक नेते, मोठे गुंतवणूकदार आदी सहभागी होणार आहेत.






Powered By Sangraha 9.0