डोंबिवली : “राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी ३०० वर्षांपूर्वी लिहिलेले ‘मनाचे श्लोक’ आजच्या कॉर्पोरेट जगतालाही लागू होतात,” असे प्रतिपादन ‘कॉर्पोरेट कीर्तनकार’ म्हणून प्रसिद्ध असलेले समीर लिमये यांनी केले. डोंबिवली टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित मकरोत्सव-२०२३ मधील द्वितीय पुष्पात मनाच्या श्लोकांवर आधारीत कीर्तनात त्यांनी आपले विचार मांडले.
डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिराच्या पटांगणावर आयोजित मकरोत्सवामध्ये बोलताना लिमये म्हणाले, “आजच्या कॉर्पोरेट ट्रेनिंग्समध्ये सांगितले जाणारे टाईम मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्किल्स, राईटिंग स्किल्स, लिसनिंग स्किल्स, लिडरशीप क्वालिटी, व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट, टिम बिल्डिंग इत्यादी अनेक विषय हे परदेशातील विचारवंतांनी सांगितले, असे सांगितले जाते. परंतु, ३०० वर्षांपूर्वी राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांमध्ये या आणि अशा अनेक बाबी ज्या कॉर्पोरेट जगताला लागू होतील, अशा गोष्टींवर भाष्य करणारे आणि आजच्या काळातही ते तंतोतंत लागू पडेल असे मार्गदर्शन ‘मनाचे श्लोक’ मध्ये आहे.”
या कार्यक्रमात समीर लिमये व धनश्री नानिवडेकर यांनी संकलित व संकल्पित केलेल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या ‘मनाचे श्लोक’ या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक सुवर्णपदक विजेती सोनाली बोराडे, ‘समर्थायन’शी निगडित व ज्येष्ठ सनदी लेखापाल विनोद करंदीकर, उमा कुलकर्णी, टिळकनगर मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे, संदिप वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.
‘मनाचे श्लोक’ व ‘दासबोध’चा आपल्याला विसर
दुर्दैवाने पाश्चिमात्त्य संस्कृती आणि विचारांच्या वाढत्या प्रभावामध्ये आपल्याच महाराष्ट्रातील श्री समर्थ रामदास स्वामींनी कालातीत लिहून ठेवलेल्या ‘मनाचे श्लोक’ व ‘दासबोध’ या साहित्याचा आपल्याला विसर पडत चालला आहे. म्हणूनच समर्थांच्या या प्रभावी, उपयुक्त आणि सोप्या भाषेतील साहित्याचा प्रचार व प्रसार या ध्येयाने ‘समर्थायन’ या संस्थेची स्थापना केल्याचे समीर लिमये यांनी यावेळी सांगितले.