अलीकडील एका वृत्तानुसार, भारत -पाकिस्तान दरम्यानच्या सीमेवर ड्रोन दिसण्याच्या घटनांमध्ये तिप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०२१ मध्ये सीमेवर १०४ ड्रोन आढळले होते, तर २०२२ मध्ये ३११ ड्रोन्स आढळून आले आहेत. २०२२ मध्ये शस्त्रास्त्रे, अमलीपदार्थ यांची तस्करी करण्यासाठी ७७ ड्रोन्सचा वापर करण्यात आला होता.
पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात असल्याचे सर्वविदित आहेच. पण, अलीकड्या काळात त्यामध्ये बरीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया अधिक तीव्र करण्यासाठी त्या देशाकडून सातत्याने ड्रोनचा वापर केला जात आहे. पाकिस्तानची ‘आयएसआय’ आणि त्या देशात असलेल्या दहशतवादी संघटना यांच्याद्वारे शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर होत आहे. पाकिस्तानसमवेत असलेल्या ३ हजार, ३२३ किलोमीटर लांबीच्या सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी सीमा सुरक्षा दलावर आहे.
अलीकडील एका वृत्तानुसार, भारत -पाकिस्तान दरम्यानच्या सीमेवर ड्रोन दिसण्याच्या घटनांमध्ये तिप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०२१ मध्ये सीमेवर १०४ ड्रोन आढळले होते, तर २०२२ मध्ये ३११ ड्रोन्स आढळून आले आहेत. २०२२ मध्ये शस्त्रास्त्रे, अमलीपदार्थ यांची तस्करी करण्यासाठी ७७ ड्रोन्सचा वापर करण्यात आला होता. सीमा सुरक्षा दलाने अशा प्रकारची २२ ड्रोन्स पाडली होती आणि शस्त्रे, अमलीपदार्थ ताब्यात घेतले होते. सीमेपलीकडून येत असलेल्या ड्रोन्सचा विचार करता ३६९ ड्रोन्स पंजाबमध्ये, ७५ ड्रोन्स जम्मूमध्ये, ४० राजस्थानमध्ये आणि आठ गुजरातच्या सीमा भागात आढळले होते. पंजाबमध्ये १६४ ड्रोन्स अमृतसरवर, ८४ फिरोझपूरवर, ९६ गुरदासपूरवर आणि २५ अबोहर भागात आढळले होते.सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करू पाहणार्या ड्रोन्सचा पुरता बंदोबस्त करण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने संबंधितांना दिल्या आहेत. भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानची ‘आयएसआय’ तेथील दहशतवाद्यांच्या मदतीने भारतविरोधी कारवाया करण्यात कशी गुंतली आहे, याची थोडीशी कल्पना यावरून यावी.
कोरोना महामारीसंदर्भात चीन पारदर्शी नाही
कोरोना महामारीचा प्रारंभ चीनपासून झाला आणि अजूनही त्या देशास या महामारीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे दिसत नाही. चीनमधील कोरोना महामारीसंदर्भात समाजमाध्यमांवर जी माहिती प्रसिद्ध होत आहे, ती पाहता त्या देशात अत्यंत भयावह परिस्थिती आहे. पण, चीनचे सरकार याबाबतची सत्य माहिती जगापासून दडवून ठेवत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे चीनमध्ये असंख्य लोक मृत्युमुखी पडत आहेत, रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. कोरोना रुग्ण मरण पावल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे, अशा सचित्र बातम्या ‘व्हायरल’ होत असल्या तरी चीनचे सरकार मात्र त्यास दुजोरा देण्यास तयार नाही. ब्रिटनमधील प्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ जोनाथन लाथन यांनीही असेच मत व्यक्त केले आहे.
आपल्या देशातील कोरोना महामारीच्या स्थितीबद्दल चीन मोकळेपणाने काही माहिती देत नाही; तसेच चीनकडे पारदर्शकतेचा अभाव असल्याचे या शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे. चीनने आपल्या देशातील वादग्रस्त ‘झिरो कोविड पॉलिसी’ शिथिल केल्यानंतर त्या देशात कोरोना महामारीचा पुन्हा उद्रेक झाला. पण, यासंदर्भात जी अधिकृत माहिती चीनकडून देण्यात येत आहे, त्यावर विश्वास बसणे कठीण आहे. चीनमध्ये ‘कोविड’ चाचण्या अत्यल्प प्रमाणात घेतल्या जात असल्याने नेमकी वस्तुस्थिती दडवून ठेवली जात असल्याचे अनेकांचे मत आहे.
चीनकडे पारदर्शकतेचा अभाव आहे. तशीच स्थिती अन्य काही देशांचीही आहे. ‘कोविड’संदर्भात योग्य आणि काटेकोर माहिती आणि आकडेवारी उपलब्ध झाल्यास त्या महामारीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने योग्य पावले टाकणे शक्य होईल, असे या ब्रिटिश शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे. चीनमधील ही परिस्थिती पाहता, त्या देशाचे ‘कोविड’वरील नियंत्रण सुटले असल्याचे दिसून येत आहे, असेही जोनाथन लाथन यांचे म्हणणे आहे. कोरोना महामारीचा जगभर संसर्ग होण्यास कारणीभूत ठरलेल्या चीनला एवढे सर्व होऊनही अजून शहाणपण येत नाही, याला काय म्हणायचे!
भगवान अय्यपा यांचा अवमान केल्याबद्दल तेलंगणमध्ये निदर्शने
“‘भारत नास्तिक समाजम्’ नावाच्या संघटनेचा अध्यक्ष असलेल्या बैरी नरेश नावाच्या व्यक्तीने असंख्य हिंदूंचे दैवत असलेल्या भगवान अय्यपा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्यावरून तेलंगणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या २९ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेचे तेलंगणमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. कोदंगल भागात एका जाहीर सभेत या नरेश बैरी याने अय्यपा, भगवान विष्णू, शिव या देवतांबद्दल अवमानकारक भाष्य केले. ही बातमी सर्वत्र पसरताच त्याची तीव्र प्रतिक्रिया ३० डिसेंबर रोजी तेलंगण राज्यात उमटली. बैरी नरेश याने हिंदू देवदेवतांचा अवमान केल्याबद्दल हैदराबादमधील विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बैरी नरेश यास त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणीही संतप्त जनतेने केली आहे. “हिंदू देवदेवतांचा अवमान करण्याची आजकाल ‘फॅशन’ झाली आहे. हिंदू समाजाच्या भावना दुखविण्याचा हेतूनेच असे वक्तव्य करण्यात आले,” असे यासंदर्भात पोलिसांत करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
बैरी नरेश याने याआधीही हिंदू समाजाच्या प्रथांवरून हिंदू समाजावर समाजमाध्यमांमधून टीका केली होती. तेलंगणमधील के. चंद्रशेखर राव यांचे सरकार हिंदूविरोधी शक्तींना पाठीशी घालत आहे, त्यांना प्रोत्साहन देत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये हजारोंच्या संख्येने हिंदू भाविक भगवान अय्यपा यांच्या दर्शनासाठी जात असतात. त्याच दरम्यान हिंदू देवदेवतांचा अवमान करण्याचे धाडस एखादी व्यक्ती कसे काय करू शकते, असा प्रश्न भाजप प्रवक्ते एन. वी. सुभाष यांनी तेलंगण सरकारला विचारला आहे.
के. चंद्रशेखर राव स्वतःला ‘खरे हिंदू’ म्हणवतात आणि ‘आपले हिंदुत्व हेच खरे’ असल्याचे ते सांगत असतात. मग हिंदू देवदेवतांचा अवमान करणार्यांविरुद्ध त्यांच्या सरकारने अद्याप कारवाई का केली नाही, असा प्रश्न तेलंगण भाजपचे अध्यक्ष बंडी संजय यांनी सरकारला विचारला आहे. “विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानेही हिंदूंच्या भावना दुखविणार्या बैरी नरेश याच्यावर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी केली आहे.हिंदू देवदेवतांचा अवमान करण्याचे प्रकार हिंदू समाज यापुढे सहन करणार नाही, हे या घटनेच्या निमित्ताने हिंदू विरोधकांच्या लक्षात आणून देण्यात आले आहे.
‘पीएफआय’चे तीन अतिरेकी पसार!
बंदी घालण्यात आलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित तीन कथित अतिरेकी राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे घालण्यापूर्वीच पसार झाल्याचे आढळून आले आहे. केरळ पोलीस दलामध्ये ‘पीएफआय’चे हस्तक असल्यानेच या अतिरेक्यांना पळून जाणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने केरळमध्ये ५६ ठिकाणी छापे टाकले होते. पण, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक पोहोचण्याआधीच हे तीन कथित अतिरेकी तेथून पसार झाल्याचे आढळून आले. या तीन जणांना स्थानिक पोलिसांनी माहिती पुरविल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेला संशय आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा छापे घालणार असल्याची माहिती बाहेर कशी काय फुटली, याचा आता शोध घेतला जात आहे.
‘पीएफआय’च्या संदर्भात ठोस माहिती हाती लागल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेने केरळमध्ये ५६ ठिकाणी छापे टाकले होते. पण, त्या संघटनेशी संबंधित तीन अतिरेक्यांना आधीच ही माहिती समजल्याने ते पसार झाले. दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने ‘पीएफआय’च्या नेते आणि कार्यकर्त्यांची घरे व कार्यालयांवर छापे टाकताना स्थानिक पोलिसांची मदत घेतली नव्हती. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मदतीने हे छापे टाकण्यात आले होते. पण, यावेळी स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना देण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस महासंचालकांकडे संशयित वाटणार्या ८७३ पोलिसांची सूची दिली आहे. आता या प्रकरणी केरळ पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.