बिबट्यांसाठी मोठा अधिवास असणारे नाशिक ‘बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्त संचार’ अशा बातम्यांमुळे नेहमीच चर्चेतअसते. बिबट्यांची संख्या वाढत असून त्याच्या सुरक्षेचा तसेच मानवाच्या संरक्षणाचा प्रश्न अधिकच तीव्र होताना दिसत आहे. या पाश्वर्र्भूमीवर ‘मानव-वन्यजीव संघर्ष’विराम होण्यासाठी पश्चिम वनविभाग व ‘वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ’जाणता वाघोबा’ उपक्रम राबवला जात आहे. बिबट्या आपला शत्रू नसून त्याच्याच अधिवासाजवळ मानव वसाहती जात असल्याने ’बिबट्यांसह जीवन’ संकल्पना येत्या काळात राबवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत स्वागतार्ह वाटतो. नाशिकमधील गोदावरी, दारणा, वालदेवी, नद्यांच्या काठालगतचया गावांमध्ये अनेकदा शिरकाव होता. देवळाली, बेलत गवाण, सिन्नरसह नाशिक शहरातही रहिवाशी भागांमध्ये बिबट्याचा शिरकाव नित्याचाच झाला. या प्राण्यांची जनमानसांमधील भीती कमी व्हावी, गैरसमज दूर व्हावे, बिबट्याची जीवशास्त्रीय माहिती व्हावी या उद्देशाने वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. बिबट्या आढळल्यास करावायच्या उपाययोजनांबाबत सर्वसामन्य नागरिकांना जागृत करण्यासाठी नुकताच पश्चिम वनविभागाने ’जाणता वाघोबा’ अभियानास प्रारंभ केला आहे. हे योग्यच आहे. याअंतर्गत विल्होळी, आंबेबहुला गावांमधील स्थानिक मुलांना ‘बिबट्या दूत’ म्हणून नेमून गावपातळीवर बिबट्याची माहिती देण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिकमध्ये वन विभागात ‘बिबट्यासोबत माध्यमांचे सहजीवन‘ या विषयावरील माध्यम प्रतिनिधींसाठी एक कार्यक्रम नुकताच झाला. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी अक्षय मांडवकर यांनी यामध्ये माहितीपूर्ण आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. बिबट्याला ’खलनायक’ न ठरवता प्रसारमाध्यमांनी बिबट्यांच्या वार्तांकनात आवश्यक असणार्या गोष्टी, घ्यायची खबरदारी यावरही मांडवकर यांनी अभ्यासपूर्ण आणि विस्तृत मार्गदर्शन केले. बिबट्यांबाबतच्या वार्तांकनात भडक, आक्रमक आणि नकारात्मक मथळे, छायाचित्रे यामुळे सर्वसामान्य जनतेची मानसिकता भयप्रद किंवा बिबट्या शत्रू असल्याची होती, असे मांडवकर सांगत. एकूणच मानव-वन्यजीव संघर्ष टाळून ‘वन्यजीवांसह सहजीवन’ संकल्पनेला ‘जाणता वाघोबा’ आणि मांडवकर यांच्या कार्यक्रमाने चालनाच मिळणार आहे.
गिधाड संवर्धनाला ‘गरुडपंख’
‘सृष्टीतील सफाई कामगार’ अशी ओळख असलेल्या गिधाडांची संख्या गेल्या दोन ते तीन दशकांत कमालीची घटली. त्यामुळे पर्यावरणाचा मोठा धोका निर्माण झाला. जनावरांना वेदनाशामके म्हणून ‘डायक्लोफिनॅक’ औषधी (इंजेक्शन) दिली जात असे आणि ती जनावरे मृत झाल्यानंतर गिधाडांनी अशा जनावरांचे मांस खाल्ल्याने त्यांची संख्या झपाट्याने घटत गेली. त्यानंतर या औषधाच्या वापरावर बंदी घातली गेली. मात्र, तोपर्यंत गिधाडांची संख्या लक्षणीय घटली. सृष्टीचे सफाई कामगार नष्ट होत गेले. त्यानंतर गिधाड संवर्धनासाठी पर्यावरणवादी आणि पक्षीप्रेमींनी गिधाडे वाचण्यासाठी मोठी चळवळ उभी केली. या पार्श्वभूमीवर नाशिकजवळील अंजनेरी येथे राज्यात गिधाड कृत्रिम प्रजनन केंद्र दृष्टिपथात दिसत आहे. वास्तविक यापूर्वीपासूनच येथे गिधाडांचे कृत्रिम प्रजनन केले जाते. केंद्र सरकारने यासाठी जलद पाऊले उचलली आहेत. हरियाणातील पिंजोरनंतर अंजनेरीत गिधाड प्रजनन केंद्र सुरू झाल्यास या पक्ष्यांच्या संवर्धनास ‘गरुडपंख’ लाभणार आहेत. हे अत्यंत स्वागतार्ह आणि स्तुत्य पाऊल ठरणार आहे. नाशिकजवळील हर्सूल येथे अगोदरच ’गिधाड रेस्तराँ’चा प्रयोग यशस्वीपणे सुरू आहेच. जिल्ह्यातील हर्सूल, पेठमधील काही भाग, खोरिपाडा, वाघेरा घाटात गिधाडांची संख्या लक्षणीय आहे. पांढर्या पाठीचे व लांब चोचीचे गिधाड प्रजातीचा अधिवास आढळून येतो. वाघेरा घाटात तर हिमालयीन प्रजाती ‘ग्रिफॉन’चे दर्शन घडल्याची नोंद पक्षीप्रेमींनी केली आहे. आता अंजेनेरी येथे गिधाड कृत्रिम प्रजनन केंद्रामुळे या भागात येत्या काही वर्षात ही नामषेश होण्याच्या मार्गावर असलेली प्रजाती वाढण्यास मदतच मिळणार आहे. वनविभागातील अधिकार्यांनी या केंद्रासाठी अंजनेरी भेट देऊन नुकतीच चाचपणी केली. प्राथमिक आराखडाही तयार केला जात असून, प्रजनन केंद्रात पूर्ण वाढ झालेली गिधाडांची पिल्ले सोडली जाणार आहेत. पिल्लांना सुरक्षित ठिकाणांचा अभ्यासही चमूकडून केला जात आहे. ‘पथदर्शी’ प्रकल्पासाठी वन्यजीवांचा अभ्यास असणार्या स्वयंसेवकांची क्षेत्रीय भेटीसाठी निवड केली जात आहे. अंजनेरी शिवारातील वनकक्ष क्र. 513 मधील जमिनीचा केंद्रासाठी विचार सुरू आहे. ही जागा प्रजनन केंद्रासाठी अत्यंत योग्य, सुरक्षित आहे. हे वनक्षेत्र मुख्य रस्त्यापासून केवळ दोन किमी आत असून, गिधाडांच्या संवर्धनासाठी हा उपक्रम ‘गरुड’ झेप घेणारा ठरणार आहे.