लोकसंस्कृती-लोककलांचे साक्षेपी संशोधक डॉ. प्रभाकर मांडे

    28-Jan-2023
Total Views |
 
Dr. Prabhakar Mande
 
लोकसाहित्य, लोककला आणि लोकजीवन यांचा मानववंशशास्त्रासह विविध अन्य शास्त्र शाखांच्यासह मूलगामी संशोधन करणार्‍या मान्यवर संशोधकांमध्ये लोकसंस्कृतीचे साक्षेपी अभ्यासक-संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या ‘पद्मश्री’ पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचा कार्यपरिचय करुन देणारा हा लेख...
 
'गावगाड्याबाहेर’ हा मांडेसरांचा मानवववंश शास्त्र आणि समाजशास्त्र यांचा सुंदर समन्वय घडविणारा अभ्यापूर्ण ग्रंथ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या अभ्यासासाठीच शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च अशा ‘डिलिट’ पदवीने मांडेसरांना सन्मानित केले. ’गावगाड्याबाहेर’ या ग्रंथातूनच एकप्रकारे पुढच्या काळात लोकप्रिय ठरलेल्या ’लोक रंगभूमी’, ’लोक गायकांची परंपरा’, ’लोक रंग कला’ यांसारख्या मांडेसरांच्या महत्त्वाच्या ग्रंथांच्या निर्मितीची बीजे रोवली गेली. कारण, ‘गावगाड्याबाहेर’ या ग्रंथात मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र या अंगाने विशिष्ट समाजांचा साक्षेपी अभ्यास करण्यात आला आहे.
 
या अभ्यासामागे मांडेसरांची भूमिका होती. या पुस्तकात हिंदू तसेच मुस्लीम धर्मातील भटक्या-विमुक्त जाती जमातींचा आणि त्यांच्या संस्कृतींचा परिचय करून देण्यात आलेला आहे. ब्रिटिशांनी लादलेल्या गुन्हेगार जमातीच्या कायद्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेल्या अनेक समाजगटांच्या पुनरुत्थानासाठी चाललेल्या प्रयत्नांची दखल घ्यावी, या अभ्यासातून ’गावगाड्या बाहेर’ची निर्मिती झाली आहे. मांग, मांग-गारुडी, जातपुराण लावणारे डक्कलवार, रायरंद, गोपाळ, कोल्हाटी, ज्योतिषांची एक भटकी जमात मेंढगी, कैकाडी, वैदू आणि याशिवाय पारधी, श्रमणारे वडार, भटके कारागीर शिकलगार, बहुरंगी स्मशान जोगी, नंदीबैलवाले तिरमाळी, जोगी गोसाव्यांच्या भटक्या जाती अशा अनेक भटक्या जाती-जमातींना ब्रिटिशांच्या गुन्हेगार जमातीच्या कायद्याचा जाच सहन करावा लागला. या सार्‍या जमातींचा सामाजिक-सांस्कृतिक अंगाने केलेला अभ्यास मांडेसरांनी आपल्या ग्रंथात मांडला आहे. यातील अनेक जाती-जमाती फिरस्त्या आहेत आणि त्या पुरोहितपण, आध्यात्मिक उद्बोधन, समाज प्रबोधन आणि रंजन करणार्‍या आहेत.
 
गावगाड्याचे हे सूत्र पकडूनच पुढे मांडेसरांनी ’लोकरंगभूमी’ या अद्वितीय ग्रंथात, लोकपरंपरा आणि लोकसंस्कृती जपणार्‍या लोककला आणि लोककलावंतांचा वेध घेतला आहे. बोहाडा, पंचमी, आखाडी चैती... यांसारखी ग्रामोत्सवातील नाट्ये, गोंधळ-जागरण-भराड यांसारखी विधी नाट्ये, चित्रकथी-कळसूत्री बाहुलेकार वासुदेव जोशी, बाळसंतोष, पिंगळा यांसारखे अनेक भक्तिप्रधान गाणी गाणारे लोकगायक या सर्वांचा अंतर्भाव ’लोक रंगभूमी’ या ग्रंथात मांडेसरांनी केला आहे. ’लोकरंगभूमी’ हा ग्रंथ विशिष्ट लोककला आणि त्यामागची लोकसंस्कृती, यांना शास्त्रपूत करण्याचा आणि सैद्धांतिक बैठक देण्याचा एक मोठा प्रयत्न आहे. डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे, हे मांडेसरांचे जणू थोरले भाऊ. ढेरेसरांनी या सर्व लोकगायकांना ’लोकसंस्कृतीचे उपासक’ असे नामाभिधान दिले. मांडेसरांनी या लोककलांच्या घटितांचा वेध घेतला. विधीनाट्ये, या विधीनाट्यांची गुणवैशिष्ट्ये ही विधीनाट्ये सादर होताना केलेली अभिमंत्रित भूमी, देवतावतरण, देवता संसार, देवतालीला, संकीर्तन देवता, प्रत्यक्ष दर्शन, देवता निर्गमन... अशा विधी नाट्याच्या सर्व संकेतांचे दर्शन ’लोकरंगभूमी’ या ग्रंथात मांडेसरांनी घडविले आहे. तसेच, कलगीतुरा, लावणी, तमाशा आदी लोककलाप्रकारांचाही वेध मांडेसरांनी या ग्रंथात घेतला. अगदी खानदेशच्या तखतरावाच्या तमाशाही शोध यात आहे. तेव्हा ’लोकरंगभूमी’ हा त्यांचा ग्रंथ एकूणच प्रयोगात्मक कलांच्या अभ्यासाच्या क्षेत्रात दीपस्तंभ मानता यावा असा ग्रंथ आहे.
 
’लोकरंगभूमी’नंतर ’लोकगायकांची परंपरा’ या ग्रंथात मांडेसरांनी ब्रिटिशांनी त्यांच्या काळात आपल्या सर्वच लोक परंपरांबद्दल जी तुच्छतेची भावना निर्माण केली, त्याबद्दल आपली परखड निरीक्षणे नोंदविली आहेत. ब्रिटिशांनी लोकपरंपरेतील या लोकगायकांना ‘भारतातील भिक्षेकरी’ असे संबोधन दिले होते. डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे आणि डॉ. प्रभाकर मांडे यांनी या लोकगायकांना ’लोकसंस्कृतीचे उपासक’ अथवा ’लोक-पुरोहित’ असे म्हटले आहे. विधीनाट्य, नाट्यात्मक विधी आणि नाटकी विधी असे वर्गीकरण डॉ. प्रभाकर मांडे यांनी केले आहे. अनेक लोककला परंपरांमध्ये विशिष्ट विधी हीच आधारशीला असते. विधीशिवाय हे प्रकार संभवत नाहीत. काही परंपरांमध्ये नाटकी विधींचा अंतर्भाव होतो. लोककलेतील विशुद्धता, स्वाभाविकता सहजस्फूर्तता, अंगभूत कौशल्य जे पिढ्यान्पिढ्यांच्या संस्कारांतून अनुवंशिकरित्या आलेले आहे, याचा विचार, तसेच उपयोजित कौशल्याचा विचार, विशुद्धतेबरोबरच कृतकतेचा विचारही मांडेसरांनी ’लोकरंगभूमी’ आणि ’लोकगायकांची परंपरा’ या ग्रंथांमधून मांडला आहे. ज्या ठिकाणी विधीनाट्य होते ती भूमी अभिमंत्रित केलेली असते, ते पूजास्थळही असते आणि कल्पित रंगभूमीही असते. लोकपुरोहित हे विशिष्ट देवदेवतांचे भगतही असतात आणि गायकही असतात. त्यांच्याकडे गायक म्हणून अंगभूत कौशल्य असते, असे विविध सिद्धांत मांडेसरांनी आपल्या ग्रंथात मांडले आहेत. लोकगायकांची परंपरा स्पष्ट करताना मांडेसर म्हणतात- ‘’लोकगायक श्रोता, प्रेक्षकांसमोर जाणिवेने आपले गायन-वादन-नर्तनाचे सादरीकरण करीत असतात. लोकगायकांना प्रेक्षकांचे भान असते. गायन करणे ही त्यांची वंशपरंपरेने चालत जाणारी वृत्ती आहे, म्हणूनच त्यांना परंपरेने ‘लोकगाणं’ किंवा ‘लोकगायक’ असे म्हटले आहे. ते परंपरेने चालत आलेल्या रचना गातात. या परंपरांचे स्वरूप प्रवाही असते. त्यामुळे या परंपरा नित्यनूतनही असतात आणि पारंपरिकही असतात.”
 
लोकगायक कलावंतांची प्राचीन परंपरा, लोकधर्म आणि लोकगायकांच्या विधी नाट्यातील संचाराचे स्वरूप, लोकगायक वासुदेव आणि त्यांची मौखिक परंपरा, लोकगायक गोंधळी आणि त्यांचे मौखिक वाङ्मय, वाघ्या-मुरळी या लोकगायकांच्या गायन सादरीकरणाची परंपरा, नाथ जोगी आणि भराडी-पोतराज, तसेच खानदेशातील वही गायन चित्रकथेची परंपरा, डक्कलवारांचे पुराण, रंजन-प्रबोधन करणारी भेदिक कवने जपणार्‍या या लोकगायकांची परंपरा.... अशा लोकगायकांच्या वाङ्मय, प्रयोग आणि सांस्कृतिक इतिहासाचे अभिलेखनच मांडेसरांनी ’लोकगायकांची परंपरा’ या ग्रंथात केले आहे.
 
शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्यावरील एक मौलिक ग्रंथ मांडेसरांनी अलीकडेच लिहिला आहे. या ग्रंथात शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य यांचे स्वरूप-भेद त्यांनी स्पष्ट केले आहेत. लोकनृत्य हे स्वाभाविक अंगभूत असे असते, शास्त्रीय नृत्याला आपली अशी स्वतंत्र शैली असते आणि ही शैली विशिष्ट व्याकरणासहित सादर होते, असे त्यांनी या ग्रंथात स्पष्ट केले आहे. हिंदुस्थानला लोकसंस्कृती, लोकजीवन आणि लोककला यांची दीर्घ परंपरा आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात जीवनाच्या सर्व क्षेत्रांचे सपाटीकरण झाले आहे. या सपाटीकरणामुळे स्वयंस्फूर्तता आणि या स्वयंस्फूर्ततेतील चैतन्य अस्तंगत होत चालले आहे. स्वाभाविक संस्कृती दिवसेंदिवस अस्तंगत होत चालली असून विविधतेऐवजी एकसुरीपणा आला आहे. मुक्त अर्थव्यवस्था बाजारीकरण यामुळे लोककलांकडेही एक ‘क्रयवस्तू’ म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे लोकसंस्कृती आणि लोककलांच्या क्षेत्रात देशी सांस्कृतिक उत्थान गरजेचे आहे, अशी भूमिका मांडेसरांनी सातत्याने मांडली आहे. केवळ महाराष्ट्रातील लोककलाच नव्हे, तर संपूर्ण भारतातील लोककला आणि लोकरंगभूमी यांच्या योगदानासंबंधी त्यांनी सातत्याने चिंतनशील लेखन केले आहे. ’लोक रंग कला’ या ग्रंथातदेखील त्याचा आढळ झालेला आहे.
 
’लोकधाटी’ हे अनियतकालिक ’लोकसाहित्य संशोधन मंडळा’तर्फे प्रकाशित करण्यात येत असे. मांडेसरांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील लोकसाहित्याच्या अभ्यासकांसाठी सुरू झालेले ’लोकसाहित्य संशोधन मंडळ’ आणि त्याच्या अंतर्गत पार पडलेल्या विविध लोकसाहित्य परिषदा हे मांडेसरांचे महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृतीला मोठे योगदान आहे. मंडळातर्फे प्रकाशित होणार्‍या ’लोकधाटी’च्या अंकात ’लोक रंग कले’च्या अंतर्गत ’विच्छा माझी पुरी करा’, ’खंडोबाचं लगीन’, ’अजब न्याय वर्तुळाचा’, ’महानिर्वाण’, ’लोककथा- 78’, ’हयवदन’, ’घाशीराम कोतवाल’... अशा लोकशैलीवर आधारित नाटकांवर अभ्यासपूर्ण चिंतन डॉ. लक्ष्मण देशपांडे, प्रकाश खांडगे, डॉ. तारा भवाळकर, डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे, डॉ. मधुकर वाकोडे आदी मान्यवरांनी केले होते. त्याचे संपादन मांडेसरांनी केले होते.
 
एकूणच लोकजीवन-लोकसंस्कृती-लोककला-लोकसाहित्य हा मांडेसरांचा श्वास आणि ध्यास राहिला आहे.
 
-डॉ. प्रकाश खांडगे
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.