२६ जानेवारी आणि रा.स्व. संघ (भाग-२)

24 Jan 2023 20:28:30
hedgewar
वर्षानुवर्षे ब्रिटिशांना अर्जविनंत्या केल्यानंतर आणि ‘साम्राज्यांतर्गत स्वराज्य’ या कल्पनेवर स्थिरावल्यावर काँग्रेसने १९२९ साली झालेल्या लाहोर अधिवेशनात ’पूर्ण स्वराज’चे ध्येय आपल्यासमोर ठेवले. दि. २६ जानेवारी, १९३० हा दिवस देशभरात ’पूर्ण स्वराज दिवस’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन काँग्रेसने केले. काँग्रेसने अखेर ’स्वातंत्र्य’ हे ध्येय स्वीकारल्याचे आनंद तेच ध्येय आधीपासून स्वीकारलेल्या सर्व देशभक्तांना झाले. रा. स्व. संघाचे निर्माते डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे त्यांपैकीच एक!


२६ जानेवारीशी संघाचा जुना संबंध

डॉ. हेडगेवार हे जन्मजात देशभक्त होते. ते त्यांच्या जाणत्या वयापासूनच देशाच्या पूर्ण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. क्रांतिकार्य, हिंदू सभा आणि काँग्रेस अशा विविध माध्यमांतून देशकार्य करत असताना हिंदूंच्या संघटनेतून राष्ट्रनिर्माण करण्याच्या हेतूने त्यांनी १९२५ साली रा. स्व. संघाची स्थापना केली होती. पूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय आता काँग्रेसने स्वीकारल्याचे पाहून त्यांना स्वाभाविकपणे आनंद झाला. संघाच्या स्वयंसेवकांनी कोणत्याही देशकार्यात आपल्या संघटनेचे पृथक अस्तित्व न ठेवता समाजघटक म्हणून स्वाभाविकपणे भाग घ्यावा, हा डॉक्टरांचा आग्रह होता. त्या विचारामुळेच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात संघाला संघश: उतरविले नाही. पण, काँग्रेसच्या या निर्णयाचा त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी आपणच घालून दिलेल्या नियमाला अपवाद केला.

दि. २१ जानेवारी, १९३० ला डॉक्टरांनी संघाला उद्देशून पुढील पत्रक काढले - “यंदाच्या काँग्रेसने ’स्वातंत्र्य’ हेच आपले ध्येय हे निश्चित केले असून रविवार, दि. २६ जानेवारी, १९३० हा दिवस सर्व हिंदुस्थानवर स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला जावा, असे काँग्रेसच्या ‘वर्किंग कमिटी’ने जाहीर केले आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय सभा ही आपल्या स्वातंत्र्य ध्येयाप्रत येऊन पोहोचली हे पाहून आपल्याला अत्यानंद होणे साहजिक आहे व हे ध्येय आपल्यासमोर ठेवून कार्य करणार्‍या कोणत्याही संस्थेशी सहकार्य करणे, हे आपले कर्तव्यच आहे. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व शाखांनी रविवार, दि. २६ जानेवारी, १९३० या दिवशी सायंकाळी ६ वाजता आपापले संघस्थानी आपापल्या शाखेच्या सर्व स्वयंसेवकांची सभा भरवून राष्ट्रीय ध्वजाचे म्हणजे भगव्या झेंड्याचे वंदन करावे.


व्याख्यान रूपाने सर्वांना स्वातंत्र्य म्हणजे काय व तेच ध्येय आपल्यासमोर ठेवणे, हे प्रत्येक हिंदवासीयाचे कसे कर्तव्य आहे, हे विशद करून सांगावे व काँग्रेसने स्वातंत्र्याच्या ध्येयाचा पुरस्कार केल्याबद्दल तिचे अभिनंदन करून समारंभ आटपावा.” (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, - Patrak by Dr. Hedgewar to the swayamsevak - २१ Jan १९३०). पद्धतशीर काम करणारे डॉक्टर पत्रकाच्या शेवटी समारंभाचा रिपोर्ट ताबडतोब लिहून आमच्याकडे पाठवावा, असे लिहायला विसरले नाहीत. याचाच परिणाम म्हणून त्या काळात संघाने विविध ठिकाणी केलेल्या समारंभांच्या तपशिलाची रजिस्टर्स आजही उपलब्ध आहेत. त्या काळात संघाचे बहुतांश काम नागपूर, वर्धा, चांदा (वर्तमान चंद्रपूर) आणि भंडारा या मराठी मध्य प्रांतात होते. अमरावती, बुलढाणा, अकोला आणि यवतमाळ या वर्‍हाडातील जिल्ह्यात ते नगण्य होते, हे लक्षात घेतले पाहिजे.

डॉक्टरांच्या आदेशावरून दि. २६ जानेवारी, १९३० ला संघाच्या ठिकठिकाणच्या शाखांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले व काँग्रेसच्या अभिनंदनाचे ठराव संमत करण्यात आले. रविवार, दि. २६ जानेवारी, १९३० ला सकाळी ६ ते ७.३० या वेळात नागपूर संघस्थानावर स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. अधिवक्ता विश्वनाथराव केळकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात नारायणराव वैद्य यांचे मुख्य भाषण झाले. उपस्थितांमध्ये डॉ. हेडगेवारांच्या व्यतिरिक्त डॉ. ल. वा. परांजपे, नवाथे, भंडारा संघचालक अधिवक्ता देव, साकोली संघचालक अधिवक्ता फाटक, सावनेर संघचालक आंबोकर व अन्य स्वयंसेवक उपस्थित होते.

चांद्याचा कार्यक्रम


वानगीदाखल चांदा येथे झालेल्या समारंभाचा तपशील पाहू (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, registers\Register ३ DSC_००४४,DSC_००४५).दि. २९ जानेवारी, १९३० ला डॉ. हेडगेवारांना लिहिलेल्या पत्रात चांदा संघाचे कार्यवाह रामचंद्र राजेश्वर उपाख्य तात्याजी देशमुख पुढील वृत्तांत कळवितात, येथील शाखेने स्वयंप्रेरणेने दि. २६ जानेवारी, १९३० रोजी कार्यक्रम ठरविला होता. त्यानंतर आपले पत्र आले. त्याप्रमाणे पुढील कार्यक्रम करून स्वातंत्र्यदिन पाळण्यात आला.



१) तालुका काँग्रेस सेक्रेटरीच्या विनंतीवरून सकाळी ८.४५ वाजता संघाची मिरवणूक संघस्थानापासून गांधी चौकात लष्करी शिस्तीने गेली व तेथे तिरंगा ध्वजारोहण झाल्यावर स्वयंसेवकांनी लष्करी सलामी दिली. मिरवणूक परत संघस्थानी येऊन तेथे भगव्या झेंड्याला लष्करी प्रणाम करण्यात आला. नंतर सकाळचे कार्य संपले.



२) काँग्रेसतर्फे सायंकाळी निघणार्‍या मिरवणुकीत भाग घेण्याविषयी व ठरावाच्या वेळी काँग्रेसबरोबर हजर राहण्याविषयी संघाला विनंती करण्यात आली होती. परंतु, संघस्थानावर संघाचा कार्यक्रम आगाऊच ठरल्यामुळे संघ काँग्रेसच्या कार्यक्रमात भाग घेऊ शकत नाही, असे संघाच्या कार्यवाहाने तालुका काँग्रेस सेक्रेटरींना कळविले.



३) सायंकाळी ४.३० वाजता संघाने विकत घेतलेल्या स्वतःच्या जागेवर स्वातंत्र्यदिनानिमित्त ठरविलेल्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. केशवराव बोडके यांच्या हस्ते शस्त्र कलाकौशल्य, लाठीकाठी व मिलिटरी ड्रिलही दाखविण्यात आली. नंतर चालकांच्या आज्ञेवरून पुढील ठराव रा. देशमुख वकील (कार्यवाह) यांनी मांडल्यावर मुद्देसूद वाक्यात भाषण झाले. त्या ठरावावर भागवत वकिलांनी लहानसे, पण सुंदर भाषण करून त्याला अनुमोदन दिले. दोघाही वक्त्यांनी शिस्त, व्यवस्था व निष्ठा तरुणांच्या मनात पूर्णपणे बाणून त्याप्रमाणे ते कार्य करण्यास सक्षम झाले, तरच स्वातंत्र्याचा पुकार करण्याचे स्वारस्य आहे, असे सांगितले व संघ ही तयारी पूर्वीपासूनच करीत आहे. ठराव मांडताना रा. देशमुखांनी काँग्रेसही विनंती, अर्ज, साम्राज्यातील स्वराज्यापासून आज स्वातंत्र्याच्या ध्येयाला येऊन कशी पोहोचली, याचा इतिहास सांगितला.



काँग्रेसमध्ये स्वातंत्र्य कल्पनेचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा संघाचे ध्येय ‘स्वातंत्र्य’ हे ठरले होते. त्या काँग्रेसच्या ठरावात संघाला नवीन नवलविशेष असे काहीच वाटत नाही. पण, ती राष्ट्रीय संस्था या संघाच्या ध्येयाप्रत येऊन पोहोचली म्हणून सहाजिकच संघाला आनंद वाटून सहानुभूतीपूर्वक तो राष्ट्रीय सभेचे अभिनंदन करीत आहे, अशा आशयाचे भाषण होऊन अध्यक्षांनी समारोपाचे भाषण केले. ६ वाजता संघाची प्रार्थना झाल्यावर समारंभ आटोपण्यात आला. हा सर्व कार्यक्रम चालकांच्या अध्यक्षतेखाली झाला. ११० स्वयंसेवक हजर होते. ठराव पुढीलप्रमाणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राष्ट्रीय सभा संघाच्या स्वातंत्र्य ध्येयाप्रत येऊन पोहोचली, याबद्दल राष्ट्रीय सभेचे हार्दिक अभिनंदन करतो व संघाचे ध्येयाला व शिस्तीला बंधन येईल, अशा रीतीने शक्य असेल, तर स्वातंत्र्याच्या मार्गात राष्ट्रीय सभेची सहकार्य करण्याची इच्छा ठेवितो. वर उल्लेख करण्यात आलेले ’भागवत वकील’ म्हणजे अधिवक्ता नारायण पांडुरंग उपाख्य नानासाहेब भागवत अर्थात वर्तमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आजोबा!

ठिकठिकाणी झालेल्या काही कार्यक्रमांचा गोषवारा

संघ अभिलेखागारातील कागदपत्रांनुसार, ठिकठिकाणी झालेल्या काही कार्यक्रमांचा गोषवारा पुढीलप्रमाणे (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, registers\Register 3 DSC_0043 to DSC_0047)


26 january program schedule


२६ जानेवारीच्या दिवसाशी, मग तो स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा होत असे तेव्हा असो अथवा १९५० नंतर प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा होऊ लागला तेव्हा असो, संघाचे फार जुने नाते असल्याचे स्पष्ट आहे.



(समाप्त)


डॉ. श्रीरंग गोडबोले




Powered By Sangraha 9.0