स्मरण एका अभिमानास्पद संघ संचलनाचे!

24 Jan 2023 21:18:47
rss in 1963 republic day parade
प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होण्यासाठी दि. २६ जानेवारी, १९६३ रोजी तीन हजार स्वयंसेवक कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिले. संघाचे पथक संचलनात शेवटी होते. या पथकाचा क्रमांक आल्यावर संघाच्या घोषाच्या तालावर स्वयंसेवकांचे शानदार संचलन सुरू झाले. तेथे उपस्थित लष्करी अधिकार्‍यांनी आणि जनतेने संघाच्या अत्यंत शिस्तबद्ध पथकाचे कौतुक केले.
'हिंदी-चिनी भाई भाई’ अशा घोषणा देत चीनचे गोडवे गात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चाऊ एन लाय यांची गळाभेट घेतली. पण, त्याच चीनने भारतास धोका दिला आणि भारतावर आक्रमण केले. त्या युद्धात भारताची अपरिमित हानी झाली. आपले असंख्य सैनिक धारातीर्थी पडले. या भारत-चीन युद्धाच्या दरम्यान शासनाच्या, लष्कराच्या मदतीसाठी अनेक संस्था पुढे सरसावल्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही मोठे योगदान होते. स्वयंसेवकांनी लष्करास आणि सीमेवर लढणार्‍या जवानांना मोठ्या प्रमाणात मदत केली. दिल्लीतील सुव्यवस्था राखण्यामध्ये संघ स्वयंसेवकांचे मोठे योगदान राहिले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या योगदानाची दखल पंतप्रधान नेहरू यांना घ्यावी लागली. त्यांच्या शासन काळातच १९६३ सालच्या प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होण्याचे निमंत्रण संघास देण्यात आले. जे पंतप्रधान नेहरू संसदेमध्ये बोलताना ‘आय वुईल क्रश द आरएसएस’ असे म्हणाले होते, त्या नेहरू यांनाही संघाच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता आले नाही. दि. २६ जानेवारी, १९६३च्या प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होण्यासाठीचे निमंत्रण सरकारकडून संघास देण्यात आले. प्रजासत्ताक दिन संचलनास अगदी थोडा कालावधी राहिलेला असताना हे निमंत्रण मिळाले. या कार्यक्रमात संघाचे स्वयंसेवक घोष पथकासह संपूर्ण गणवेशात सहभागी होतील, अशी अट संघाकडून घालण्यात आली. त्यास अनुमती मिळाल्यानंतर अत्यंत अल्पवेळेत संघाचे तीन हजार स्वयंसेवक घोष पथकासह नियोजित वेळी त्यावेळच्या ‘राजपथा’वर उपस्थित राहिले. २४ तासांचीही सूचना मिळाली नसताना, स्वयंसेवकांनी तातडीने सर्वत्र निरोप पाठवून तीन हजार स्वयंसेवक संचलनात उपस्थित राहतील, अशी व्यवस्था केली. त्यावेळचे संघाचे संभाग प्रचारक सोहनसिंह यांनी सरकारच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. पण, आमचे स्वयंसेवक संपूर्ण गणवेशात दंड घेऊन आणि घोष पथकासह सहभागी होतील, असे सरकारकडून आलेल्या प्रतिनिधीस सांगितले.


सरकारकडून होकार येताच संघाची यंत्रणा कामास लागली. त्यावेळी आजच्यासारखी संपर्काची साधने नव्हती. विविध भागांतील स्वयंसेवकांशी संपर्क साधून त्यांना संचलनासाठी सिद्ध करण्यात आले. प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होण्यासाठी दि. २६ जानेवारी, १९६३ रोजी तीन हजार स्वयंसेवक कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिले. संघाचे पथक संचलनात शेवटी होते. या पथकाचा क्रमांक आल्यावर संघाच्या घोषाच्या तालावर स्वयंसेवकांचे शानदार संचलन सुरू झाले. तेथे उपस्थित लष्करी अधिकार्‍यांनी आणि जनतेने संघाच्या अत्यंत शिस्तबद्ध पथकाचे कौतुक केले. त्या संचलनातील घोष पथकात २०० स्वयंसेवक होते.

सरकारने या संचलनासाठी संघास निमंत्रित का केले असे विचारले असता, त्यावेळी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ गटाच्या सेवेत असलेले विजय कुमार यांनी, संघाने १९६२च्या युद्धात लष्करास जे सक्रिय योगदान दिले, त्या मुख्य कारणामुळे सरकारकडून निमंत्रण देण्यात आले, अशी माहिती दिली. संघाचा सदासर्वकाळ विरोध करणार्‍या पंतप्रधान नेहरू यांनाही संघाच्या या योगदानाची दखल घ्यावी लागली. त्या घटनेला उद्यावर येऊन ठेपलेल्या प्रजासत्ताकदिनी ६० वर्षे होतील. त्या निमित्ताने या अभिमानास्पद घटनेचे हे स्मरण!



Demonstrations at Lal Chowk


राहुल गांधी परत जा! लाल चौकात निदर्शने!


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केला आहे. जम्मूकडे त्यांचा प्रवास सुरू आहे. तेथून ते पुढे श्रीनगरकडे जाणार आहेत. कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या या ‘भारत जोडो’ यात्रेची सांगता श्रीनगरमध्ये होणार आहे. जम्मू - काश्मीर ही आपल्याच बापजाद्यांची मालमत्ता आहे, असे समजणार्‍या नेत्यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. पण, त्याचवेळी दुसरीकडे श्रीनगरच्या लाल चौकात ‘राहुल गांधी परत जा’, अशा आशयाचे फलक झळकावून निदर्शने करण्यात आली.

स्थानिक काश्मिरी जनतेने राहुल गांधी यांची ही ‘भारत जोडो’ यात्रा म्हणजे ढोंगबाजी असल्याची टीका करून या यात्रेविरुद्ध लाल चौकात निदर्शने केली. ‘गो बॅक राहुल गांधी’, ‘राहुल गांधी हाय हाय’ अशा घोषणा निदर्शकांकडून देण्यात येत होत्या. राहुल गांधी यांची ही यात्रा जनतेला जोडण्यासाठी नसून तो एक राजकीय ‘स्टंट’ आहे, अशी टीका करण्यात आली. ही यात्रा लोकांसाठी नसून लयास जात असलेल्या पक्षाला सावरण्यासाठी काढण्यात आली आहे. राहुल गांधी यांची ही यात्रा स्वतःच्या फायद्यासाठी आहे. त्या यात्रेचा लोकांशी काही संबंध नाही, अशी टीकाही करण्यात आली.

काँग्रेस पक्षाने काश्मीरसाठी काहीही केले नाही. भूतकाळात याच काँग्रेसमुळे भारताचे विभाजन झाले. राहुल गांधी हे कोणत्या अधिकारांमध्ये काश्मिरी जनतेला भेटण्यासाठी येत आहेत? त्यांनी काश्मीरसाठी काही केलेले नाही. लाखो काश्मिरी जेव्हा मरत होते तेव्हा ते कोठे होते? ही सर्व ढोंगबाजी, खोटारडेपणा आहे, अशी टीका राहुल गांधी यांच्यावर केली जात आहे. ‘भारत को इन्ही लोगों ने तोडा हैं अब क्यूं आये हैं जोडने,’ असा फलक श्रीनगरमध्ये झळकला आहे.

दरम्यान, “राहुल गांधी यांनी काश्मीरमध्ये प्रवेश केल्यावर, आपणास काश्मिरी जनतेच्या यातनांची कल्पना असून त्यांच्यासमोर खाली मान घालून आपण आलो आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. माझे पूर्वज याच भूमीतील आहेत. मी घरी परतल्याची भावना माझ्या मनात आहे,” असे ते म्हणाले.“राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी गेलेले ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते फारूख अब्दुल्ला यांनी तर राहुल गांधी यांची तुलना शंकराचार्यांशी करून हद्दच केली. “शेकडो वर्षांपूर्वी शंकराचार्य कन्याकुमारीहून काश्मीरला यात्रा करीत आले होते. राहुल गांधी आता तेच करीत आहेत,” असे फारूख अब्दुल्ला म्हणाले.


राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेची सांगता लाल चौकात राष्ट्रध्वज फडकावून होणार नाही, तर पक्ष कार्यालयात सोमवार, दि. ३० जानेवारी रोजी ते राष्ट्रध्वजारोहण करणार आहेत.‘भारत जोडो’ यात्रेवर असलेल्या राहुल गांधी यांचे ‘परत जा’ असे फलक झळकवून ‘स्वागत’ केले जाईल, अशी कल्पना काँग्रेस पक्षांनीही केली नसेल.

आसाम सरकार मदरशांची संख्या कमी करणार!


आसाममध्ये खासगीरित्या चालविण्यात येणार्‍या मदरशांची मोठी संख्या लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने आसाम सरकारने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अलीकडेच “आपले सरकार खासगी मदरशांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने विचार करीत आहे,” असे म्हटले आहे. “पहिल्या टप्प्यात मदरशांची संख्या कमी केली जाणार आहे. मदरशांमध्ये सर्वसाधारण शिक्षण देण्याची व्यवस्था सरकारला करायची आहे. तसेच, मदरशांची नोंद करण्याची व्यवस्था निर्माण करण्यावर सरकार काम करीत आहे. संबंधित समाजासमवेत आमही कार्य करीत आहोत आणि ते आसाम सरकारला मदत करीत आहेत,” असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

अलीकडेच आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंत यांनी कट्टरपंथीयांचा धोका टाळण्यासाठी आसाममधील सर्व खासगी लहान मदरशांचे जवळच्या मोठ्या मदरशामध्ये विलीनीकरण करण्यात येईल, असे म्हटले होते. अनेक खासगी मदरशांमध्ये जिहादी कारवाया चालत असल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. या संदर्भात राज्य सरकारचा शिक्षण विभाग पोलिसांच्या मदतीने सर्वेक्षण करीत आहे.

आसाममध्ये असलेली मुस्लीम लोकसंख्या लक्षात घेता, जिहादी तत्वांचा प्रसार करण्याचे कार्य सर्वसाधारणपणे छोट्या मदरशांमधून होत असते, अशी माहिती मुख्यमंत्री सरमा यांनी दिली. आसाम पोलिसांनी दहशतवादी गटांशी संबंधित नऊ गटांचा बीमोड केला असून, या संदर्भात ५३ संशयित अतिरेक्यांना अटक करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली. बांगलादेशने काही दहशतवादी संघटनांवर बंदी घातल्याने आणि त्यांच्या काही नेत्यांना न्यायालयाच्या आदेशानंतर फासावर लटकविण्यात आल्यानंतर अशा गटांनी उत्तर प्रदेशामध्ये आपले तळ हलविले आहेत. तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना कट्टरपंथी बनवायचे, अशी या दहशतवादी गटांची योजना असल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी दिली.

जिहादी कारवाया चालतात की नाही, हे पाहण्यासाठी मुस्लीम नेत्यांनी सरकारशी स्वतःहून संपर्क साधला होता. त्यानंतर योजण्यात आलेल्या बैठकीस त्या समाजातील ६८ नेते उपस्थित होते. मदरशांमधील शिक्षणात सुधारणा करण्याची तयारी त्या सर्वांनी दर्शविली. आता आसाममधील सर्व मदरशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यामध्ये मदरशांची जमीन, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची संख्या, अभ्यासक्रम आदींचे सर्वेक्षण केले जात आहे. आसाम सरकारने या आधीच सरकारतर्फे चालविल्या जात असलेल्या सुमारे ४०० मदरशांचे नियमित शाळांमध्ये परिवर्तन केले आहे. सरकारच्या निर्णयाला काही मुस्लीम संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले होते. पण, न्यायालयाने सरकारच्या बाजूने निर्णय दिला. निम्न आसाममधील अल्पसंख्याक प्रभावित जिल्हे आणि बराक खोर्‍यातील तीन जिल्ह्यांवर डोळ्यात तेल घालून लक्ष देण्यात यावे, असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. आसाममधील जिहादी तत्वांचा नायनाट करण्यात आसामचे सरकार यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.


सरस्वती पूजेस विरोध केल्याचा निषेध


बिहार सरकारकडून मधेपुरामध्ये बी. पी. मंडल वैद्यकीय महाविद्यालय चालविले जाते. या महाविद्यालयामध्ये सरस्वती पूजा किंवा वसंत पंचमी सण साजरे करता येणार नाहीत, असा आदेश संबंधित प्रशासनाकडून काढण्यात आला. २६ जानेवारी रोजी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पण, या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे कोणी डीजे संगीत लावतील त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी धमकी समष्टीपूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे. महाविद्यालयाच्या आवारात महाविद्यालयाच्या प्रशासनाने सरस्वती पूजा साजरी करण्यावर बंदी घातल्याने विद्यार्थ्यांनी गेल्या २१ जानेवारी रोजी जोरदार निदर्शने केली. विद्यार्थ्यांनी येत्या २६ जानेवारी रोजी पूजा करण्याचा निर्धार केला आहे. पण, लेखी आदेश काढून महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या पूजेस प्रतिबंध केला आहे.

प्राचार्य आणि अन्य एका अध्यापकाने काही विद्यार्थ्यांना खोलीत कोंडून त्यांच्यावर हल्ला केल्याचेही वृत्त आहे. विद्यापीठाचा आदेश न मानल्यास त्यांना महाविद्यालयांमधून काढून टाकण्याची धमकीही त्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. विद्येची देवता असलेल्या सरस्वतीची पूजा विद्येच्या मंदिरात करण्यास विरोध करणार्‍या त्या महाविद्यालयाच्या प्रशासनाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.




Powered By Sangraha 9.0