जगात केवळ अंटार्क्टिका खंडावरच ’एम्परर पेंग्विन’ ही पक्ष्याची प्रजात आढळते. संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत असणारी ही प्रजात अंटार्क्टिका खंडाला प्रदेशनिष्ठ आहे. गेल्या काही वर्षांपासून बर्फातच अधिवास करणार्या या प्रजातीच्या वसाहतींना हवामान बदलाचा फटका बसतो आहे. जगात पेंग्विन या पक्ष्याच्या 18 प्रजाती सापडतात. त्यामधील ’एम्परर पेंग्विन’ ही आकाराने सगळ्यात मोठी प्रजात. जवळपास चार फुटांपर्यंत वाढणारे हे पेंग्विन मोठ्या संख्येने वसाहती करून राहतात. मात्र, वातावरणीय बदलांमुळे अंटार्क्टिका खंडावरील बर्फ वितळण्यास सुरुवात झाली. परिणामी, अधिवास नष्टतेमुळे ’एम्परर पेंग्विन’च्या वसाहतीची संख्या कमी झाली. अमेरिकी सरकारच्या म्हणण्यानुसार, वातावरणातील बदलांमुळे या पक्ष्यांच्या प्रजननाचे प्रयत्न अयशस्वी होत आहेत.
अंटार्क्टिकाच्या पश्चिमेला असणार्या वेडेल समुद्रामध्ये ’एम्परर पेंग्विन’ची हैली बे ही दुसरी मोठी वसाहत आहे. मात्र, 2016 साली येथील बर्फ वितळल्यामुळे त्यावर्षी जन्मलेली ’एम्परर पेंग्विन’ची सर्व पिल्ले पाण्यात बुडाली. त्यापुढील वर्षांमध्ये हे चित्र काही फार संख्येने कायम राहिले. 2019 साली अंटार्क्टिका खंडातील तापमानात झालेली वाढ आणि वादळी वार्यामुळे तेथील मोठा हिमनग खंड पावला. परिणामी, 2017 ते 2019 दरम्यान जन्मलेली जवळपास सर्वच पिल्लांना जलसमाधी मिळाली. परिणामी,गेल्यावर्षी अमेरिका सरकारने ’एम्परर पेंग्विन’ पक्ष्यांना ’अमेरिका लुप्तप्राय प्रजाती अधिनियमा’अंतर्गत संरक्षण दिले.
अशा संकटग्रस्त पक्ष्यांबाबत आता एक आनंदवार्ता समोर आली आहे. अधिवास नष्टतेचा सामना करणार्या या प्रजातीच्या संवर्धनासंदर्भात ही बाब आनंदाची आहे. ‘सॅटेलाईट मॅपिंग’ तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधकांनी अंटार्क्टिका खंडावर ’एम्परर पेंग्विन’ची एक नवीन वसाहत शोधून काढली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘पेंग्विन जनजागृती दिना’च्या दिवशी ’एम्परर पेंग्विन’संदर्भातील ही माहिती उघड झाली. ’ब्रिटिश अंटार्क्टिका सर्वेक्षण’मधील (बीएएस) संशोधकांनी ’एम्परर पेंग्विन’ची ही नवीन वसाहत शोधून काढली आहे. ‘सॅटलाईट मॅपिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून शोधलेल्या ’एम्परर पेंग्विन’च्या प्रजनन स्थळांमधील ही अलीकडची सर्वात मोठी वसाहत आहे. ’युरोपियन युनियन’च्या ’कोपरनिकस सेन्टिनल-2’ या उपग्रह मोहिमांनी अंटार्क्टिका खंडावर टिपलेल्या छायाचित्रांचा संशोधकांनी अभ्यास केला. त्यावरून या वसाहतीमध्ये 500 पक्षी वास्तव्यास असल्याचा अंदाज लावून ही नवीन वसाहत शोधून काढली.
’एम्परर पेंग्विन’च्या वसाहती या अंटार्क्टिका खंडावर फार दुर्गम आणि अत्यंत थंड भागात आढळतात. ’बीएएस’च्या नोंदीनुसार या ठिकाणचे तापमान साधारण उणे 60 अंश सेल्सिअसपर्यंत असते. अशा परिस्थितीत त्याठिकाणी अभ्यास करणे खूप कठीण काम होऊन बसते. त्यामुळेच संशोधक ‘सॅटलाईट मॅपिंग’च्या आधारे सर्वप्रथम पेंग्विनच्या संभाव्य वसाहतींचा अंदाज घेतात. ’बीएएस’च्या संशोधकांचे अलीकडचे अंदाज सूचित करतात की, सध्याच्या तापमानवाढीच्या कलानुसार या शतकाच्या अखेरीस ’एम्परर पेंग्विन’च्या 80 टक्के वसाहती या अर्ध नामशेष होऊ शकतात.
’पीएलओएस बायोलॉजी’ या संशोधन पत्रिकेतील शोधनिबंधानुसार, 21व्या शतकापर्यंत अंटार्क्टिका खंडावर अधिवास करणार्या 97 टक्के प्रजातींना नामशेष होण्याचा धोका आहे. या संशोधनात असेही आढळून आले आहे की, अंटार्क्टिका खंडावर जैवविविधता संवर्धनासाठी दहा प्रमुख धोरणे अंमलात आणावी लागतील. त्यासाठी दरवर्षी 23 दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च करावा लागेल. अंटार्क्टिका खंडावर राहणार्या प्रजाती तेथील थंड वातावरणाला अनुकूलित झाल्या आहेत, अशा परिस्थितीत तापमानात होणारी वाढ आणि त्यामुळे अधिवास होणारे बदल प्रजातींच्या अनुकूलतेच्या आड येत आहेत. अंटार्क्टिका खंड हा केवळ त्यावरील प्रजातींसाठी आवश्यक आहे असे नाही. मानवालादेखील या खंडामुळे अनेक फायदे आहेत. वातावरणातील अभिसरण आणि कार्बनडाय ऑक्साईड शोषून जागतिक हवामानाचे नियमन करण्यास हा खंड महत्त्वाची भूमिका बजावतो. तसेच, महासागरातील अंतर्गत प्रवाहांना कार्यान्वित ठेवण्यात या खंडावरील हवामान कारणीभूत असते. त्यामुळे या खंडावर अधिवास करणार्या प्रजातींचे संवर्धन झाल्यास अप्रत्यक्षरित्या या खंडाचे संरक्षणाचे कवच प्राप्त होईल.