सन १९५० पासून २६ जानेवारी हा ‘प्रजासत्ताक दिवस’ म्हणून साजरा होत असला तरी १९३० ते १९४७ या काळात तो ‘स्वातंत्र्य दिवस’ म्हणून साजरा होत असे. रा. स्व. संघ प्रजासत्ताक दिवस साजरा करत नाही, असाही एक आक्षेप संघावर घेतला जातो. पण, दि. २६ जानेवारी, १९३० हा दिवस ‘स्वातंत्र्य दिवस’ म्हणून सर्वप्रथम साजरा करण्यात आला, तेव्हा शैशवावस्थेत असलेल्या रा. स्व. संघाने तो दिवस कसा साजरा केला, हे यानिमित्ताने पाहणे उद्बोधक आहे. तसेच, दि. २६ जानेवारी, १९५०चा पहिला ‘प्रजासत्ताक दिवस’ संघाने कसा साजरा केला, हेही पाहण्यासारखे आहे.
प्रस्तुत लेख मुख्यत: रा. स्व. संघाच्या अभिलेखागारातील मूळ कागदपत्रांवर आणि ’केसरी’च्या समकालीन अंकांतील सामग्रीवर (सौजन्य : केसरी-मराठा ट्रस्ट, पुणे) आधारित आहे. मुळात २६ जानेवारी हा दिवस ’प्रजासत्ताक दिवस’ म्हणून का निवडण्यात आला हे प्रथम जाणून घेतले पाहिजे.
स्वसत्ताक वसाहती राज्य प्रजासत्ताक झाले
दि. १८ जुलै, १९४७ ला ब्रिटिश बादशहाने संमत केलेल्या ’इंडियन इंडिपेन्डेन्स अॅॅक्ट’ अथवा हिंदी स्वातंत्र्य कायद्यानुसार, अखंड हिंदुस्थानच्या विच्छेदनातून ’डोमिनियन ऑफ इंडिया’ व ’डोमिनियन ऑफ पाकिस्तान’ अशी दोन स्वसत्ताक वसाहती राज्ये दि. १५ ऑगस्ट, १९४७ ला जन्माला आली. स्वतंत्र झालेल्या ’इंडिया’ नामक वसाहतीसाठी ’इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल’ अर्थात ब्रिटिश विधिमंडळाची जागा भारताच्या घटना समितीने घेतली. घटना समितीने दि. २६ नोव्हेंबर, १९४९ ला घटनेची संहिता बहुसंमत केली. घटनेचा आरंभ केव्हापासून करावयाचा, हा प्रश्न ओघाने आलाच. १९५०च्या जानेवारीतील कोणता तरी दिवस धरणे सोयीचे होते. जानेवारीचा पहिला दिनांक धरला, तर इंग्रजांचे अनुकरण झाले असते व शेवटचा दिनांक धरला, तर महात्मा गांधींच्या हत्येचा दिवस म्हणजे राष्ट्रीयदृष्ट्या अनिष्ट कुयोग झाला असता.
मधला कोणता तरी दिनांक धरावयाचा म्हणून काँग्रेसने केलेल्या आवाहनानुसार, संपूर्ण स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञा घेतल्या गेल्या तो दि. २६ जानेवारी, १९३० हा दिवस पुढे आला (‘केसरी’, दि. २७ जानेवारी, १९५०). दि. २६ जानेवारी हा दिवस ’पूर्ण स्वराज दिवस’ म्हणून पाळण्यात यावा, असे आवाहन जवाहरलाल नेहरू अध्यक्ष असताना काँग्रेसच्या कार्यकारी समितीने दि. २ जानेवारी, १९३० ला केले होते. ’स्वातंत्र्य’ हे आपले ध्येय असले पाहिजे, असा साक्षात्कार काँग्रेसला १९२९ झाला असला तरी हेच ध्येय किमान पाच दशके अगोदर उराशी बाळगून क्रांतिकारांनी हालअपेष्टा सहन केल्या होत्या आणि प्रसंगी आत्माहुती दिली होती. ते काहीही असले तरी नवीन राज्यघटनेचा प्रारंभ दि. २६ जानेवारी, १९५० ठरविण्यात येऊन, त्या दिवशी सार्वभौम लोकतांत्रिक भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आले.
नूतन प्रजासत्ताकाचे स्वागत कोणी कसे केले?
आपण अध्यक्ष असताना काँग्रेसच्या इतिहासात ज्या दिवशी एक महत्त्वाची घटना घडली, त्या दिवसाला ’प्रजासत्ताक दिवस’ करण्यात जवाहरलाल नेहरू यशस्वी झाले. भारताने स्वतः सिद्ध केलेल्या घटनेनुसार, स्वतः राज्य चालविण्यास प्रारंभ केला म्हणून २६ व २७ जानेवारी, १९५० हे दोन दिवस आनंदोत्सव आणि सण यांनी युक्त असलेले राष्ट्रीय सण म्हणून ठरविण्यात आले. ज्या हिंदुत्वनिष्ठांना चिरडून टाकण्याचा विडा जवाहरलाल नेहरूंनी उचलला होता (’आय विल क्रश जनसंघ’ हे वाक्य पुढे नेहरूंनी उच्चारले होते), त्या हिंदुत्वनिष्ठांनी नवीन प्रजासत्ताकाचे स्वागत कसे केले?
स्वातंत्र्यलक्ष्मीचा प्रथम जयजयकार करणार्या आणि भावी हिंदुस्थान प्रजासत्ताक असावे, अशी युवावस्थेपासूनच आकांक्षा बाळगणार्या स्वा. सावरकरांनी, २६ जानेवारीला स्वतंत्र भारतीय प्रजासत्ताकाच्या जन्मदिनी आपण आपली प्रांतीय, पक्षीय वा वैयक्तिक स्वरूपाची क्षुल्लक भांडणे विसरून आपल्या मातृभूमीच्या एकाच व्यासपीठावर आपला राष्ट्रीय विजय जगाला घोषित करण्याकरिता एकत्र येऊया, अशा आशयाचे विचार एका पत्रकात व्यक्त करून सर्वांनी या दिनाच्या समारंभात सहभागी होण्याचा उपदेश दिला. (केसरी, २४ जानेवारी १९५०). गांधीहत्येच्या नेहरूनिर्मित अग्निदिव्यातून सुटून सावरकरांना वर्षही झालेले नसताना त्यांनी आपली देशसेवा नूतन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना रूजू केली होती, हे विशेष. स्वातंत्र्यासाठी अंदमानात एकेकाळी यातना सोसलेले हिंदू महासभेचे उपाध्यक्ष आणि पक्षाच्या संसदीय दलाचे अध्यक्ष आशुतोष लाहिरी यांनी दिल्लीहून एक पत्रक काढून सर्व हिंदू सभांना दि. २६ व २७च्या नव्या घटनेच्या महोत्सव समारंभात भाग घेण्याचा व सहकार्य करण्याचा आदेश दिला.
नव्या घटनेत काही दोष असले तरी हा प्रसंग फार मोठा व महत्त्वाचा नि आपल्या देशाच्या भाग्याचा आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले. (केसरी, २४ जानेवारी १९५०). दि. २७ जानेवारी, १९५० ला अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकारिणीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत भारतीय गणराज्याचे स्वागत करणारा ठराव संमत करण्यात आला. (केसरी, ३१ जानेवारी १९५०).
दि. २६ जानेवारीला मुंबईच्या काळाचौकी विभागात काळी निशाणे घेऊन कम्युनिस्टांनी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. नागरिक आणि कम्युनिस्टांची चकमक घडली. पोलिसांनी परत फिरण्याची सूचना करताच कम्युनिस्टांनी पोलिसांवरच अॅसिड बल्ब’फेकले. त्यात दोन पोलीस इन्स्पेक्टर जखमी झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकूण आठ जण जखमी झाले. सुमारे ५५ कम्युनिस्टांना अटक करण्यात आली (केसरी, दि. २७ जानेवारी, १९५०).
मुंबईच्या कुलाबा भागात झालेल्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमात कम्युनिस्ट तेथे आले आणि त्यांनी काळी निशाणे चढविण्यास सांगितले. तेव्हा तेथे मारामारीचा प्रसंग झाला (केसरी, दि. ३१ जानेवारी, १९५०). पुरोगामी गट, शेतकरी कामकरी पक्ष वगैरे संघटनांच्या कार्यालयावर त्या दिवशी (दि. २६ जानेवारी, १९५०) काळी निशाणे लावण्याच्या वार्ता आहेत. मुंबई, कलकत्ता वगैरे शहरांतून अघोरी मार्गांनी या उत्सवाला गालबोट लावण्याचा उपद्व्याप कम्युनिस्टांनीही केला, अशी वार्ता ’केसरी’ने दिली (दि. ३ फेब्रुवारी, १९५०).कामठी (मध्य प्रांत) येथील गणराज्य दिनाची मिरवणूक मशिदीसमोर बॅण्ड वाजविण्यावरून अडविण्यात आली. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेवर दगड फेकण्यात आले. समझोत्याकरिता बॅण्ड थांबवून मिरवणूक पुढे नेण्यात आली. परत येत असता लाठीधारी अहिंदूंनी हल्ला केला. परंतु, सशस्त्र सैनिक आल्याने दंगा टळला (केसरी, दि. ६ फेब्रुवारी, १९५०).
दि. २६ जानेवारीला पहाटे काँग्रेस सेवा दल, बालवीर पथक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी संस्थांतील स्वयंसेवकांच्या प्रभात फेर्या पुणे शहरातून निघतील. संघातील तरुण स्वयंसेवकांची प्रभात फेरी ६.१५ वाजता पुरंदरे बागेतून व बाल स्वयंसेवकांची प्रभात फेरी ६.३० वाजता भिकारदास मारुती मंदिरापासून निघेल. या सर्व प्रभातफेर्या सकाळी शनिवारवाड्यासमोरील पटांगणात येतील. तेथे सूर्योदयास मध्यभाग कमिशनर यांच्या हस्ते शनिवारवाड्यावर राष्ट्रीय निशाण लावले जाईल, अशी पूर्वसूचना ’केसरी’ने दिली (दि. २४ जानेवारी, १९५०). रा. स्व. संघाच्या बाल आणि तरुण स्वयंसेवकांनी दोन दिवस चाललेल्या उत्सवात काँग्रेस सेवा दल आणि राष्ट्र सेवा दल यांच्या बरोबरीने म्हणजे सारख्याच मानाने आणि सारख्याच अभिमानाने भाग घेतला (केसरी, दि. २७ जानेवारी, १९५०). संघाच्या मुंबई येथील कार्यक्रमाचे ’केसरी’ (दि. ३१ जानेवारी, १९५०) ने पुढील वर्णन केले. गुरुवार, (दि. २६ जानेवारी, १९५०) ला सकाळीच चौपाटीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वजवंदनाचा भव्य कार्यक्रम झाला. त्याचा भव्यपणा व शिस्त लष्कराच्या व पोलिसांच्या व्यवस्थेलाही खाली मान घालावयास लावणारी होती.
काँग्रेस ’स्वातंत्र्यवादी’ कशी झाली?
दि. २७ डिसेंबर, १९२७ ला मद्रास येथील काँग्रेसच्या अधिवेशनात अ.भा.काँग्रेस समितीचे सचिव जवाहरलाल नेहरू यांनी पूर्ण राष्ट्रीय स्वातंत्र्य हे भारतीय लोकांचे ध्येय असल्याचे काँग्रेस घोषित करत आहे, असा ठराव मांडला. (मद्रास काँग्रेसचे प्रतिवृत्त, स्वागत समिती, ४२ वी हिंदी राष्ट्रीय सभा, मद्रास, पृ. १५). पूर्ण स्वातंत्र्यासंबंधी जवाहरलाल नेहरूंचा ठराव गांधींना मान्य नव्हता. (डी. जी. तेंडुलकर, महात्मा: लाईफ ऑफ मोहनदास करमचंद गांधी, विठ्ठलभाई के. झवेरी व डी.जी. तेंडुलकर, मुंबई, १९५१, खंड २, पृ. ४०२, ४२९-४३०). तोपर्यंत ’साम्राज्यांतर्गत स्वराज्य’ हेच काँग्रेसचे ध्येय होते. ’शक्य असल्यास साम्राज्यांतर्गत, आवश्यक असल्यास (साम्राज्याच्या) बाहेर’ हे गांधींचे शब्द उद्धृत करत काँग्रेस अध्यक्ष डॉ. मुख्तार अहमद अन्सारी यांनी काँग्रेसचे ध्येय स्पष्ट केले. (मद्रास काँग्रेसचे प्रतिवृत्त, परिशिष्ट १, पृ. ३).
दि. २९ डिसेंबर, १९२८ ते दि. १ जानेवारी, १९२९ ला कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी काँग्रेसचे ध्येय काय असावे, याबाबतचे मतभेद उघड झाले. एकीकडे श्रीनिवास अय्यंगार, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस ही मंडळी पूर्ण स्वातंत्र्यवादी होते. महात्मा गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष पं. मोतीलाल नेहरू साम्राज्यांतर्गत स्वराज्य (वसाहतीचे स्वयंशासन अथवा डोमिनियन स्टेटस) या ध्येयाचे पुरस्कर्ते होते. हेच ध्येय आधारभूत मानून पं. मोतीलाल नेहरूंनी सर्वपक्षीय समितीच्या वतीने भारताच्या भावी संविधानाचा अहवाल तयार केला होता. या अहवालाच्या बाजूने बहुमत न मिळाल्यास आपण काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार नाही, अशी भूमिका कोलकत्ता काँग्रेसचे अध्यक्ष पं. मोतीलाल नेहरू यांनी घेतली. काँग्रेसमध्ये दुफळी टाळण्यासाठी महात्मा गांधींनी त्यातून मध्यम मार्ग काढला. दि. ३१ डिसेंबर, १९२८ ला गांधींनी ब्रिटिश संसदेने दि. ३१ डिसेंबर, १९२९ ला किंवा तोपर्यंत घटना मान्य केल्यास काँग्रेस तिला जशीच्या तशी स्वीकारेल. पण, त्या दिनांकापर्यंत तिचा स्वीकार न झाल्यास अथवा आधीच तिला नाकारल्यास काँग्रेस अहिंसक असहकार संघटित करेल... असा ठराव मांडला. (तेंडुलकर, पृ. ४३९, ४४०).
ही मुदत संपण्यापूर्वी दि. ३१ ऑक्टोबर, १९२९ ला ब्रिटिश सरकारच्यावतीने व्हाइसरॉय लॉर्ड अर्विन यांनी साम्राज्यांतर्गत स्वराज्य साध्य करणे, हे भारताच्या संवैधानिक वाटचालीची स्वाभाविक परिणती असल्याचे विधान केले. तथापि, दि. २३ डिसेंबरला त्याच्या भेटीला गेलेल्या गांधी, मोतीलाल नेहरू, जिना व इतर नेत्यांना व्हाईसरॉयने डोमिनियन स्टेटसविषयी ठाम आश्वासन देण्यास नकार दिला. बहुमतासोबत जात आता गांधीदेखील पूर्ण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते बनले. देशातील जनमत आता पूर्ण स्वातंत्र्याच्या बाजूने झाले होते. पूर्ण स्वातंत्र्यवादी असलेले जवाहरलाल नेहरू दि. २५ ते ३१ डिसेंबर, १९२९च्या लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष होणार असल्यामुळे या भावनेला बळ मिळाले (आर. सी. मजुमदार, हिस्टरी ऑफ द फ्रीडम मुव्हमेंट इन इंडिया, फर्मा के. एल. मुखोपाध्याय, कलकत्ता, खंड ३, पृ. ३२२, ३२५).
काँग्रेसच्या घटनेतील ‘कलम १’ मधील ’स्वराज’ या शब्दाचा अर्थ पूर्ण स्वातंत्र्य असेल, नेहरू अहवालाची सर्व योजना संपुष्टात आली आणि भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याकडे काँग्रेसजन आपले सगळे लक्ष केंद्रित करतील, अशा आशयाचा ठराव स्वतः गांधींनी लाहोर काँग्रेसमध्ये मांडला. केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळांवर तसेच सरकारी समित्यांवर बहिष्कार, कर भरण्यास नकार यासह सविनय निर्बंधभंगाच्या कार्यक्रमाची घोषणाही गांधींनी या ठरावात केली (लाहोर काँग्रेसचे प्रतिवृत्त, पृ.८८). दि. २६ जानेवारी हा दिवस ’पूर्ण स्वराज दिवस’ म्हणून पाळण्यात यावा, असे आवाहन काँग्रेस कार्यकारी समितीने दि. २ जानेवारी, १९३० ला केले.
“भारतातील ब्रिटिश सरकारने भारतीय लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले असून, जनतेच्या शोषणावर ते आधारलेले आहे. त्याने भारताचा आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विनाश केलेला आहे. म्हणूनच भारताने ब्रिटिश नाते तोडून पूर्ण स्वराज मिळवावे,” असे आमचे मत आहे हे गांधींनी तयार केलेले घोषणापत्र काँग्रेस कार्यकारी समितीने संमत केले होते. या घोषणापत्राचे प्रकट वाचन गावागावांत करून लोकांचा पाठिंबा घेण्याचा कार्यक्रमही या प्रसंगी घेण्याचे ठरले. (मजुमदार, पृ. ३३१).’स्वातंत्र्य’ या ध्येयाविषयी देशभरात असे वातावरण ढवळून निघत असताना रा. स्व. संघाची भूमिका काय होती, तिचा परामर्श स्वतंत्र लेखात घ्यावा लागेल. (क्रमश:)