हर्र बोला हर्र..... श्री सिद्धेश्वर महाराज की जय.....
९०० वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली सिद्धेश्वर यात्रा सोलापुरात मोठ्या उत्साहात नुकतीच पार पडली. तीन वर्षांच्या ‘कोविड-१९’च्या दुष्ट सावटातून बाहेर पडत सोलापूरकरांनी गड्ड्याच्या यात्रेचा आनंद लुटला. त्यानिमित्ताने...
सोलापूर शहरात संक्रांतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सोलापुराचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांनी सोलापुरात श्री सिद्धेश्वर मंदिराची स्थापना केली. श्री सिद्धरामेश्वरांना त्यांच्या गुरूंनी सोलापुरात शिवलिंगांच्या स्थापनेचा आदेश दिला. सोलापुरात सिद्धेश्वर मंदिराची स्थापना करून श्री सिद्धरामेश्वरांनी ६८ शिवलिंगांची स्थापना केली. लिंगायत धर्माचे ते एक थोर सिद्धपुरुष होते. सोलापूरकरांची मान्यता आहे की, संत श्री सिद्धरामेश्वरांच्या जन्मामुळे या शहराची समृद्धी, भरभराट झाली आहे.
दरवर्षी सोलापुरात गड्ड्याची यात्रा भरते. त्याची कथा अशी आहे की, सिद्धपुरुष श्री सिद्धेश्वरांच्या कार्याने मोहित होऊन एका कुंभार कन्येने श्री सिद्धेश्वरांना लग्नाची मागणी घातली. श्री सिद्धेश्वरांनी तिला आपल्या ‘योगदंडा’ समवेत विवाहाची अनुमती दिली. हे आगळेवेगळे लग्न दरवर्षी सोलापुरात साजरे होते. सोलापुरात मकरसंक्रांतीच्या भोगी, मकरसंक्रांत, किंक्रांत या तिन्ही दिवशी श्री सिद्धेश्वरांची गड्डा यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. गेल्या ९०० वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. यावर्षीच्या गड्ड्याचं आकर्षण आहे बुर्ज खलिफा!
‘हर्र बोला हर्र’च्या जयघोषात सिद्धेश्वर यात्रेची सुरुवात होते. श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ शिवलिंगांवर तैलाभिषेक (यण्णीमज्जन) करून या यात्रेला सुरुवात होते. पांढरीशुभ्र बाराबंदी घातलेल्या भक्तांच्या उत्साहाला उधाण येते. सगळीकडे पांढरा दूधसागर उसळल्याचा भास होतो. एकदा भक्तलिंग ‘हर्र बोला हर्र.....’,‘श्री सिद्धेश्वर महाराज की जय’च्या जयघोषात मानकरी हिरे हब्बू वाड्यातून मानाच्या सातही काठ्यांची, नंदीध्वजांची मिरवणूक निघते. सातही नंदीध्वज तैलाभिषेकासाठी मिरवणुकीने मार्गस्थ होतात. सोलापुरातील बाळी वेस, दत्त चौक, लक्ष्मी मार्केट, पंचकट्टा मार्गे ही मिरवणूक सिद्धेश्वर मंदिरात पोहोचते. तेथून दुपारी पुन्हा मिरवणूक सुरू होऊन ६८ लिंगांना तैलाभिषेक करून मिरवणूक हिरेहब्बू मठात रात्री परत येते. संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा होतो.
दुसर्या दिवशी संध्याकाळी होमप्रदीपन सोहळ्यासाठी हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वजांची मिरवणूक सुरू होते. नंदीध्वजांना विद्युत रोषणाई करण्यात येते. हे नंदीध्वज रात्री १०च्या सुमारास होम मैदानावरील होमकुंडाजवळ पोहोचतात. होम हवनाचा आणि कुंभार कन्येच्या अग्नीप्रवेशाचा कार्यक्रम होतो. होमहवनानंतर भाकणुकीचा कार्यक्रम होतो. नंतरच्या दिवशी होम मैदानावर रात्री ८नंतर शोभेचे दारूकाम होते. सिद्धरामेश्वर मंदिराभोवती प्रदक्षिणा करून धार्मिक विधी संपन्न होतात. दुसर्या दिवशी नंदीध्वजाचे वस्त्रविसर्जन (कप्पडकळी) आणि प्रसादवाटप होऊन धार्मिक कार्यक्रमांची सांगता होते.मकरसंक्रांत आणि त्यासोबत येणारी गड्ड्याची यात्रा हा सर्व सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे!! पूर्वीच्या उत्साहात आणि जल्लोषात हा सण साजरा करण्याची संधी सोलापूरकरांना तीन वर्षांच्या प्रदीर्घ अंतराने मिळाली आहे.
आम्ही सोलापुरात चौपाडात दाते गणपतीजवळ राहायचो. गड्ड्याच्या दिवसात रोज संध्याकाळी गड्ड्यावर चक्कर ठरलेली असायची तेव्हा धुळीचा त्रास आजिबात व्हायचा नाही. धूळ असायची पण प्रदूषण नसायचे आता गड्ड्यावर जावेसे वाटत नाही. धुळीचा त्रास होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाल्यावस्था आणि तारुण्य दोन्ही इतिहासजमा झाल्याचा हा परिणाम आहे. बाराबंदी घातलेल्या भक्तांची काठ्यांची मिरवणूक मात्र आजही तशीच आहे. पांढ़र्या रंगाचा विशाल समुद्र उसळल्यासारखा दिसतो. सिद्धेश्वर मंदिरही तसेच दिमाखात उभे आहे. सोलापूरकरांची सिद्धेश्वर महाराजांवरची श्रद्धाही तशीच आहे. गड्ड्याच्या यात्रेबद्दलचा लोकांचा उत्साहही तसाच आहे, तरीही काहीतरी निसटल्याची जाणीव होत आहे. प्रत्येक सोलापूरकराच्या आठवणी गड्ड्याच्या यात्रेशी निगडित आहेत. तेव्हा वसंत पैलवान यांचा ऊसाचा रस, भाग्यश्रीचा बटाटेवडा ही प्रमुख आकर्षणे असायची. ‘बुढ्ढीके बाल’ गुलाबी रंगाचा जिभेवर तत्काळ विरघळणारा जणू कापूसच.
‘मेरी गो राउंड’ तसेच वेगवेगळ्या आकारांच्या आरशासमोर आपली छबी न्याहाळणे, पन्नालाल गाढव अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आनंद देऊन जायच्या. त्या काळात सोलापूरकर हा प्रचंड चित्रपटवेडा होता. आम्हीही त्याला अपवाद नव्हतो. यात्रेत गाजलेल्या चित्रपटातील काही दृश्ये तिकीट लावून दाखवायचे. तेही आम्ही आवडीने बघायचो. तसंच दुसरं एक मोठं आकर्षण म्हणजे मौतका कुआँ फटफटी’, म्हणजे मोटार सायकल, बाईक. भाग्यश्री वडा ऊसाच्या रसाबरोबरच कालांतराने रामप्रसाद, लक्ष्मणप्रसाद असा चटकदार चिवडाही गड्ड्यावर मिळायला लागला. पण, राजवाडे चौकातला आमचा नामदेव चिवडाच मस्त असायचा. तिखट कचोरी हा प्रकारही सोलापुरात मस्त मिळायचा. तेव्हा ताणतणाव आजिबात नव्हते. पण, मध्यमवर्गाची आर्थिक स्थितीही बेताचीच असे. या सगळ्या चैनी गड्ड्याच्या यात्रेत एखाद्या दिवशीच मिळायच्या. इतर दिवशी नुसतीच भटकंती. दात होते तेव्हा चण्यांची चणचण होती, आता चणे आहेत, पण दात मजबूत नाहीयेत! आज ६०च्या आसपास असणार्या समस्त सोलापूरकरांना खयालोंकी दुनियामे, गतस्मृतींच्या अद्भुत प्रदेशात घेऊन जाणार्या या आठवणी नक्कीच कुठेतरी अपिल होईल! Down memory lane !!
-मुकुंद कुलकर्णी