हिंदूनी १०० टक्के मतदान करा : कालिचरण महाराज

21 Jan 2023 17:02:13
कालिचरण महाराज


यवतमाळ
: कालिचरण महाराजांच्या नेतृत्वात दि.२१ जानेवारी रोजी यवतमाळमध्ये हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. यावेळी राजकारणाचं 'हिंदूकरण' करण्याचा प्रयत्न करा आणि हिंदूनी १०० टक्के मतदान करा, असे आवाहन कालिचरण महाराजांनी केले आहे. तसेच जर देश चालवणारा राजा हिंदूत्तववादी असेल तरच हिंदूचं रक्षण होईल. त्यामुळे रामराज्यासाठी राजा राम आणि धर्म राज्यासाठी राजा धर्म असायला हवा, असे ही कालिचरण महाराज म्हणाले. त्याचबरोबर हिंदूनी १०० टक्के मतदान करून 'वोट बँक' बना ,असा सल्ला ही कालिचरण महाराजांनी दिला आहे.

लव्ह जिहाद, गो हत्या बंदी, धर्मांतर कायद्याच्या मागणीसाठी हा हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. पुसद येथील शिवाजी चौक परिसरातून हा मोर्चा निघाला. आमदार निलेश नाईक ,बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज आणि कालिचरण महाराज यांनीही मोर्चात सहभाग नोंदवला.तसेच हिंदूवरील नियोजित पद्धतीने सुरू असलेले आघात रोखण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, असे ही कालिचरण महाराजांनी सांगितले.

कालिचरण महाराज हे विदर्भातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. ते मूळचे अकोला जिल्ह्यातील आहेत. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची गोडी कमी होती. पण काही काळानंतर त्यांना अध्यात्माची आवड लागली. नंतर ते इंदूरमध्ये भय्यूजी महाराजांच्या संपर्कात आले. २०१७ मध्ये ते अकोल्यात परतले आणि त्यांनी महानगर पालिकेची निवडणूक लढवली. यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.




Powered By Sangraha 9.0