जळगाव : फडणवीस-शिंदे सरकार आल्यापासून महाविकास आघाडीकडून सातत्याने टीका केली जात आहे. अशातच शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. सत्तारांनी कारस्थानी नेत्याचं नाव सागांवे , असे आवाहन ही खडसेंनी यावेळी केले आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीका केली जातेय. मात्र अब्दुल सत्तार यांनी थेट शिंदे गटावरच याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याच नाराजीतून शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे म्हटले जात असून त्यातून हे सरकार कोसळू शकते,असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
जमीन घोटाळा, कृषी महोत्सवासाठी वसूली, महिला खासदाराबाबत अपशब्द यावरुन विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत बोलताना आपल्या विरोधात कट रचला असून यामध्ये पक्षातील नेत्यांचा हात आहे का?, असा संशय सत्तार यांनी व्यक्त करत शिंदे गटावरच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनीही सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचे म्हटले होते. तसेच आता खडसे यांनी शिंदे गटातील प्रत्येक आमदार गुडघ्याला बाशिंग बाधून मंत्रीपदासाठी तयार आहे,असे विधान ही खडसेंनी केले.