सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथे रविवारी एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना एवढी भीषण होती की, कामगारांचा जागेवरच कोळसा झाला. या स्फोटात पाच जण जखमी झाले आहेत.
बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ असलेलया फटाक्यांचा कारखान्यात ही घटना घडली. सुमारे चार एकर परिसरात असलेल्या या कारखान्यात ४० जण काम करीत होते.
या स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. साधारण पाच लोक जखमी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. या दुर्घटनेत वेळेत मदत न मिळाल्याने काहींचा तडफडून मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मृत्यूच्या आकड्यांबाबत प्रशासनाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
मदतकार्यामध्ये सहभागी एका गावकर्याने सांगितले की, स्फोट झाला त्यावेळी आम्ही मदतीसाठी धावून आलो. उसाच्या शेतात दोन महिलांचे मृतदेह उडून पडले होते. काही तडफडत पडले होते. आम्ही पोलिसांना आणि अॅम्ब्युलन्सला फोन केला. तब्बल तासभर १०८ रुग्णवाहिका, पोलीस किंवा दुसरी रुग्णवाहिका आली नाही. तेथे उपस्थित असलेले लोक तासभर फोन करत होते. परंतु, कुणीही फिरकले नसल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे. बार्शीच्या या फटाका कारखान्यात बांगरवाडी, वालवाड, उकडगाव येथील लोक काम करायचे. या स्फोटात जखमी झालेल्या पाच जणांपैकी काही गंभीर आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाडा सीमेवर पांगरी हे गाव असून तेथे स्वतंत्र पोलीस ठाणेही कार्यरत आहे. तेथून जवळच शिराळा गावच्या शिवारात माळरानावर शोभेच्या दारूनिर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यात नेहमीप्रमाणे कामगार काम करीत असताना अचानकपणे शोभेच्या दारूचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की आसपासच्या काही किलोमीटर अंतरावरचा परिसर हादरला.