धर्मद्रोह!

19 Jan 2023 11:52:13
 
छत्रपती संभाजी महाराज
 
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विधानावरुन उठलेला वादंग अद्याप शमलेला नसून आता त्यांच्याच पक्षातील इतर नेत्यांनीही अजित पवारांचीच री ओढल्याचे दिसते. त्यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराज हे ‘स्वराज्यरक्षक’ तर होतेच, पण ‘धर्मवीर’ही होते, याचे धर्मद्रोहींच्या डोळ्यात ऐतिहासिक पुराव्यांसह अंजन घालणारा हा लेख...
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधीचा हा इतिहास आहे. रामायणामध्ये उल्लेख असलेले ’जंवद्वीप’ हे ’मजापहित’ नावाच्या हिंदू साम्राज्याचा भाग होते. जगातील सगळ्यात मोठ्या हिंदू साम्राज्यांपैकी हे साम्राज्य. विक्रमवर्धन, गिरींद्रवर्धन प्रविजय अशी त्या सम्राटांची नावे होती. भारताच्या पूर्वेकडे हा भाग येतो. जवळ जवळ 13 हजार लहान-मोठ्या बेटांचा थायलंडपासून फिलिपिन्सपर्यंत त्याचा विस्तार होता. त्या क्षेत्रात सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, ब्रुनेई, तिमूर, फिलिपिन्स इ. राष्ट्रे येतात!
 
 
आज हे आठवण्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’ होते, ते कधीच ‘धर्मवीर’ नव्हते, अशा अर्थाचं अतिशय संतापजनक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. ते पुढे म्हणाले की, ‘’कधीच छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठं पुरस्कार केला नाही!”
 
 
खरे म्हणजे, एकतर अजित पवार साहेबांचे ’धर्मवीर’ उपाधीबद्दलचे निकष चुकले आहेत किंवा त्यांचे ते अज्ञान असावे. एव्हाना त्यांची अनेक भाषणं जनता फारशा गांभीर्याने घेतही नाही. काही वेळा विनोद म्हणून घेते. मग ते धरणांमध्ये पाणी नसल्यावर त्यांनी सुचविलेला उपाय(?) असो, की स्वतःला ’टग्या’ म्हणवून घेत आपली ’दादागिरी’ अधोरेखित करणे असो. ’दादागिरीने निवडणुका कशा जिंकल्या जातात व सरळ माणसे राजकारणात का हरतात’ याविषयी ते मार्गदर्शन करत होते म्हणे! हे ’राष्ट्रवादी’ वागणं आहे का? अशांच्या राजकीय पक्षाला सामान्य मतदार मत देणार का? असे कुणाला प्रश्न पडले, तर चुकीचे ठरेल का?
 
 
दुसरे म्हणजे, अजित पवार हे काही इतिहासतज्ज्ञ नाहीत. असे असताना त्यांनी खर्‍या इतिहासाचा अभ्यास न करता असे विधान करणे चुकीचेच. अनेक वेळा, काही जिहादी पर्यावरणाने भारित तथाकथित पिवळी पुस्तके लिहिणार्‍यांचा खोटा इतिहासच त्यांना मतपेटीच्या राजकीय लाभासाठी सोयीचा वाटत असावा, म्हणून त्यांनी असे विधान केले असावे.
 
 
पण, त्यांचे वाक्य ’कधीच छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठं पुरस्कार केला नाही!’ हे ’हिंदू धर्मवीर’ पदवीसाठी आवश्यक निकष म्हणून गृहीत धरलं, तर छत्रपती संभाजी महाराजांनी सनातन हिंदू धर्माचा जेवढा पुरस्कार केला, त्याच्या एक कोट्यांश तरी कुणी राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्याने पुरस्कार केला आहे का?
 
 
जवळ जवळ सारा हिंदुस्थान आक्रमक मुस्लीम राज्यांनी व्याप्त होता. हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत होते. आता हिंदू धर्मच पूर्ण नष्ट होईल की काय अशी भीती सामान्य जनतेमध्ये निर्माण झाली होती! अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सतत लढा देऊन अनेक आक्रमक मुस्लीम व ख्रिस्ती (पोर्तुगीज इ.) सत्तांना समर्थपणे तोंड दिले, आक्रमणे परतवून लावली. हिंदवी स्वराज्य राखले. एवढेच नव्हे, तर विस्तार ही केला.
 
 
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि॥
 
 
ही संस्कृत भाषेतील छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा हिंदू धर्माचाच पुरस्कार दर्शवत नाही का?
 
तसेच, छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत ’बुधभूषणम्’ नावाचा राजनीतीवर प्रख्यात ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथच मुळात सनातन हिंदू धर्माचा पुरस्कार करणारा ग्रंथ आहे. त्यातील नीती-वचने ही सनातन हिंदू धर्मानुसारच आहेत. या ग्रंथात सुरुवातीला आई भवानी, भगवान शिव, पार्वती, गणपती इ. हिंदू देव देवतांना व गुरूंना वंदन करण्यात आले आहे. स्वतःच्या घराण्याचा गौरवाने उल्लेख केलेला आहे. छत्रपती शहाजी राजांना ’इंद्र’ म्हणून गौरविले आहे.
 
 
वडील छ. शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिले आहे ते वाचा -
 
कलिकालभुजंगमावलिढं निखिलं
धर्मवेक्ष्य विक्लवं य:।
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवच्छत्रपतिर्जयत्यजेय: ॥9॥
येन क्षोणितले कलावविकले बुद्धावतारं गते
गोपालेखिल वर्णधर्मनिश्चये म्लैच्छै: समासादिते ।
भूयस्तत्परिपालनाय सक्लाञ्जित्व सुरद्वेषिण:
स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता
विप्रादिवर्णा: क्रमात् ॥10॥
 
 
अर्थ - जगाचा पालनकर्ता असणार्‍या श्री विष्णूंचे अंशावतार असलेल्या अजिंक्य शिवछत्रपतींनी आपला धर्म (हिंदू धर्म) कली काळ रुपी विषारी सर्पाच्या (इस्लामच्या) विळख्यात सापडलाय हे पाहिले. (9)
 
 
श्री विष्णूंच्या बुद्धावताराच्या वेळी, कली काळ (इस्लाम) प्रबळ असताना, मुसलमानांनी लयाला नेलेल्या हिंदू धर्माचे पुनरुत्थान करण्याच्या उद्देशाने शिवछत्रपतींनी हिंदू धर्माची भक्कम पुनःस्थापना केली. (10)
 
 
(साभार: वरील श्लोक 9, 10 चा अर्थ, श्री. सत्येन वेलणकर- इतिहासाच्या पाऊलखुणा)
याव्यतिरिक्त, वडील छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन ’म्लेंच्छक्षयदीक्षित’ असा देखील छत्रपती संभाजी महाराज करतात. ’म्लेंच्छक्षयदीक्षित’ म्हणजे म्लेंच्छांचा नाश करण्याची ज्यांनी दीक्षा घेतली आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज! ’म्लेंच्छ’ म्हणजे, हिंदूंना शत्रू मानून त्यांच्यावर आक्रमण करणार्‍या मुस्लीम किंवा ख्रिस्ती पंथीय सत्ता!
पुढे ‘बुधभूषणम्’च्या अध्याय 2, श्लोक 611 मध्ये त्यांनी लिहिले आहे की,
 
जिवितम् मृतकं मन्ये देहानाम् धर्मवर्जितं।
मृतो धर्मेन संयुक्त दीर्घ जीवी भविष्यति॥
 
 
म्हणजे, ‘जी व्यक्ती जीवंतपणे धर्मविरहीत आचरण करते, ती व्यक्ती जीवंत असूनही मेल्यासारखी असते आणि धर्मासाठी मरते ती व्यक्ती चिरंजीव, दीर्घ जीवी असते. यापेक्षा श्रेष्ठ धर्माचा पुरस्कार कोणता बरे असू शकतो?
 
तसेच, छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यातील फोंडा येथील किल्ल्यावर एक शिलालेख कोरून ठेवला आहे, त्यात त्यांनी ’आता हे हिंदूराज्य झाले आहे!’ असे स्पष्टपणे लिहिले आहे. असे इतर कुणी लिहून ठेवले आहे का? हे एवढे अलौकिक कृत्य आहे की, हिंदूंच्या येणार्‍या सगळ्या पिढ्या यापासून स्फूर्ती घेऊन जगभर हिंदू साम्राज्य फैलावण्यास प्रवृत्त होतील.
 
 
त्याहीपुढे जाऊन, धर्मांतर करण्यात आलेल्या लोकांना छत्रपती संभाजी राजांनी परत सनातन हिंदू धर्मात घेतले. ’घरवापसी’चे हे कार्य तर सगळ्या हिंदूंसाठी एवढे प्रेरक कार्य आहे की, याचा स्वीकार हिंदूंनी केला असता, तर हिंदुस्थानातील मुसलमानांना मुल्ला मौलवींच्या कचाट्यातून सोडवून परत हिंदू केले गेले असते व पुढे पाकिस्तान, बांगलादेश हे देश निर्माण झालेच नसते. तसेच ख्रिस्ती मतांतरग्रस्त राज्यांची दहशतवादाची व फुटीरतेची समस्यादेखील उद्भवली नसती. पण, अजूनही वेळ गेलेली नाही.विश्वातील सगळ्या हिंदूंनी छत्रपती संभाजी महाराजांच्या या कृतीचे अनुकरण करावे. त्यामुळे हिंदूंवरील संकटांचे निराकरण होईल.
 
 
एकीकडे छत्रपती संभाजी महाराज मराठी व संस्कृतचा पुरस्कार करतात व दुसरीकडे अजित पवार हे महाराष्ट्राच्या सत्तेत असताना त्यांच्या सरकारने हज हाऊस, उर्दू भाषेसाठी भरघोस मदत केली म्हणजे कुणाला मदत केली, हे सांगायची आवश्यकता आहे का?
 
 
यावरून छत्रपती संभाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य रक्षक, विस्तारक तर होतेच, पण सनातन हिंदू धर्मवीर असल्याचेच स्पष्ट होते.
 
 
आता पुन्हा या लेखाच्या सुरुवातीस लिहिलेल्या ’मजापहित’ नावाच्या हिंदू साम्राज्याकडे जाऊ. तेथील हिंदू सम्राटाला मुसलमान करण्यात आले. ’यथा राजा तथा प्रजा’ या उक्तीप्रमाणे बहुतेक सगळी हिंदू जनतादेखील मुस्लीम झाली. त्यातील इंडोनेशिया, मलेशिया, ब्रुनेई ही इस्लामी राष्ट्रे आहेत. त्यापैकी एकटे इंडोनेशिया हेच आज जगातील सगळ्यात मोठे इस्लामी राष्ट्र आहे. लोकसंख्येच्या हिशेबात बोलायचे झाले, तर जिथे इस्लामचा उगम झाला, त्या सौदी अरेबियाच्या सातपट मोठा इंडोनेशिया आहे. तेथील राजाला मुसलमान केल्यावर बहुतेक जनता मुस्लीम होऊन आज जगातील सगळ्यात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियासारख्या देशाला पाहिल्यावर आपण सनातन हिंदू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाकडे बघू. मुस्लीम पंथीय प्रेरणांनी क्रूरकर्मा जिहादी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना, ’मुसलमान होत नाही’ म्हणून अत्यंत हालहाल करून छळ केला!
 
 
’कुराण व सुन्ना’ जे मुसलमानांचे अनिवार्य संदर्भ आहेत, त्यानुसार अनेक दिवस मरणयातना दिल्या. शेवटी, छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणत्याग केला, पण सनातन हिंदू धर्म सोडला नाही. विचार करा, जर क्रूरकर्मा जिहादी औरंगजेबाच्या इस्लामी छळांपासून सुटका करून, जीव व राज्य वाचविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज मुसलमान झाले असते तर? आपल्या देशाचा ’पाकिस्तान’ त्याच काळी झाला नसता का? आज जो काही भारत व भारतातील हिंदू आहेत त्यामागे बरेचसे श्रेय छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे आहे. म्हणून ‘छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते!’ असे म्हणणे हे, ते बलिदान, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व सगळ्या हिंदूंसह हिंदू धर्माचादेखील द्रोह आहे.
सनातन हिंदू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय!
 
-राजेश पाटील
 
 
Powered By Sangraha 9.0