नवी दिल्ली: देशाच्या वाटचालीतील सुवर्णकाळास आता प्रारंभ झाला आहे. त्यासाठी अमृतकाळाचे रूपांतर कर्तव्यकाळात करण्यासाठी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने सज्ज व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १७ जानेवारी रोजी केले. भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. त्याविषयी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन हे प्रेरक, दिशादर्शक आणि भविष्यवेधी असे होते. देशाच्या सुवर्णकाळास आता प्रारंभ झाला असून त्याचे रूपांतर कर्तव्यकाळात करण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा संदेश पंतप्रधानांनी दिला आहे. त्याचप्रमाणे भाजप आता केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आंदोलन झाले असल्याचे सांगून समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत रहावे, असाही संदेश पंतप्रधानांनी दिला. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीस आता ४०० दिवस बाकी आहेत. या कालावधीत समाजाच्या प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहोण्याचे विशेष अभियानदेखील पंतप्रधान मोदी यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.
आगामी काळासाठी भाजप कार्यकर्त्यांना विविध कार्यक्रम पंतप्रधानांनी दिल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. त्यामध्ये भाजपच्या विविध मोर्चांचे कार्यक्रम सीमावर्ती भागात आयोजित करून या भागास विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आकांक्षी जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीत भाजप कार्यकर्त्यांनी सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. 'एक भारत - श्रेष्ठ भारत'चे ध्येय साध्य करण्यासाठी राज्ये, भाषा आणि संस्कृतीमध्ये समन्वय साधणे आणि त्यासाठी 'काशी - तमिळ संगम'सारखे कार्यक्रम आयोजित करणे, नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन देणे, समाजातील शेवटच्या घटकास भाजपसोबत जोडण्यासाठी 'भाजप जोडो अभियान राबविणे, जिल्हावार प्राथमिक सदस्यांचे संमेलन घेणे आदी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज होण्याचेही आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
तरुणांना जुन्या सरकारचे कुशासन सांगणार
देशात सध्या १८ ते २५ वयोगटातील तरुणांनी यापूर्वीच्या सरकारचा अनाचार, दुराचार आणि कुशासन बघितले नाही. त्यामुळे गेल्या आठ वर्षात देशाने कशाप्रकारे प्रतिकूल वातावरणातून सुशासन साध्य केले आहे, याची माहिती या वर्गास होणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांमध्ये राजकीय जागृती करण्यासाठी कार्यक्रम राबविण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
राजकीय नेता नव्हे तर 'स्टेट्समन मोदी'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीमधील संबोधन हे नव्या भारताचा संकल्प दर्शविणारे होते. पंतप्रधानांनी पक्ष नव्हे तर देशहित सर्वोपरी ठेवण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे संबोधन हे राजकिय नेत्याचे नव्हे तर 'स्टेट्समन'चे होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.