सेना दिवस

14 Jan 2023 11:46:37
 
army day
 
 
 
 
दि. 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी ‘सेना दिवस’ म्हणून साजरा केला जातो. 1949 साली 15 जानेवारी या दिवशी जनरल करिअप्पा यांनी अखेरच्या इंग्रज सेनापतीकडून सूत्र हाती घेतली. स्वतंत्र भारताचे ते पहिले भारतीय सरसेनापती. त्या घटनेची आठवण म्हणून 15 जानेवारीला ‘सेना दिवस’ साजरा होतो. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...
 
 
स्थलसेना म्हणजेच भूदल किंवा लष्कर हे कोणत्याही सैन्याचे सगळ्यात महत्त्वाचे अंग असते. आधुनिक काळात नौदल आणि हवाईदल हीसुद्धा महत्त्वाचीच आहेत. पण, भूदलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण, आपल्या देशाची भूमी प्रत्यक्षात ताब्यात ठेवणे, संरक्षण करणे हे काम भूदलच करीत असते. हवाईदल शत्रूची भूमी बॉम्ब वर्षावाने भाजून काढेल, शत्रूची ठाणी उद्ध्वस्त करेल; नौदल शत्रूच्या व्यापाराची नाकेबंदी करून त्याला गलितगात्र करेल. पण, यानंतरचा टप्पा म्हणजे शत्रूची भूमी ताब्यात घेणे. ते काम भूदलच करते.
 
 
प्राचीन परंपरा
 
भारताची लष्करी परंपरा फार प्राचीन आहे. आमचे सगळे देव हे शस्त्रधारी आहेत. भगवान विष्णू हा शारंग धनुष्याने किंवा सुदर्शन चक्राने, भगवान शिव हा पिनाक धनुष्याने किंवा त्रिशूलाने, माता जगदंबा ही खड्गाने किंवा भात्याने युद्ध करतात. रामायण-महाभारत काळातले रथी, अतिरथी, महारथी हे महान योद्धे चतुरंग दळासमवेत युद्ध करीत होते. सम्राट चंद्रगुप्त, सम्राट विक्रमादित्य, सम्राट शांतिवाहन या दिग्विजयी राजांनी ग्रीक-शक-हूण-कुशाण आदी परकीय आक्रमक पराभूत करून पचवून टाकले. छत्रपती शिवरायांनी आपल्या भवानी तलवारीच्या तेजाने पाचही पातशाह्या थरथरा कापविल्या, तर बाजीराव पेशव्याने आपल्या तुफानी घोडदौडीने मुघल पातशाही खिळखिळी करून टाकली.
 
 
आधुनिक लष्कर
 
स्वतंत्र्य भारताच्या आजच्या अत्याधुनिक लष्कराचा पाया मात्र इंग्रजी राजवटीत घातला गेला. इंग्रजी ‘ईस्ट इंडिया’ कंपनीने पगारी सैनिक म्हणून मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक आपल्या सैन्यात भरती केले. इंग्रजी सेनापतींच्या तालमीत या जवानांनी युरोपातले अत्याधुनिक युद्धतंत्र आत्मसात केले.
 
 
मूळचाच शूर असलेला भारतीय सैनिक आधुनिक युद्धतंत्रात पारंगत झाल्यावर युरोपियानांनाही भारी ठरतो. याचा प्रत्यय 1914 ते 1918च्या पहिल्या महायुद्धात आला. इंग्रजी पलटणीने मार खाल्लेल्या रणक्षेत्रात भारतीय पलटण उतरवण्यात आली. या पलटणीने संयम, चिकाटी आणि योग्य वेळी जबरदस्त आक्रमण यांचा मिलाफ करून समोरच्या कडव्या जर्मन सैन्याला माघार घ्यायला लावली. ही घटना फ्रान्समध्ये घडली. फ्रेंच जनता भारतीय सैनिकांच्या या पराक्रमावर एवढी खूश झाली की, यानंतर कुठेही भारतीय सैनिक दिसले की, ‘हिंदू आले, हिंदू आले’ या शब्दांनी त्यांचे स्वागत केले जात असे.
 
 
भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे जाणते नेतृत्व इंग्रजांची नोकरी करणार्‍या भारतीय सैनिकांकडे कोणत्या दृष्टीने पाहात होते, त्याचा एक फार सुंदर किस्सा लेफ्टनंट जनरल शंकरराव पाटील-थोरात यांनी आपल्या आत्मचरित्रात दिला आहे. इंग्लंडच्या ‘सँडहर्स्ट मिलिटरी अकॅडमी’तून आपले प्रशिक्षण पूर्ण करून थोरात भारतात परत येत होते. त्यांच्याच जहाजात योगायोगाने लाला लजपतरायही होते. दोघांची खूप मैत्री झाली. लालाजींच्या व्यक्तिमत्त्वाने तरुण थोरात अगदी भारावून गेले. ते लालाजींना म्हणाले, “भारतात पोहोचल्यावर मी ही इंग्रजांची नोकरी सोडून देतो आणि तुमच्या सोबत स्वातंत्र्य आंदोलनात येतो.” त्यावर लालाजी उतरले, “छे: छे:! अहो, हा इंग्रज आज ना उद्या भारतातून जाणारच आहे. त्यानंतर स्वतंत्र भारताला तुमच्यासारख्या कुशल, तरबेज सेनानायकांची अत्यंत गरज आहे. तेव्हा, त्या क्षणावर दृष्टी ठेवून तुमची गुणवत्ता सतत वाढवीत राहा.”
 
 
1947ची कसोटी
 
गुणवत्ता वाढवीत राहण्याचा लालाजींचा हा आदेश थोरातांसह सगळ्याच भारतीय सेनापतींनी पाळला, याचा प्रत्यय स्वातंत्र्यानंतर लगेचच आला. कारण, काश्मीर हिसकून घेण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने टोळीवाल्यांच्या वेशात काश्मीरवर आक्रमण केले.
दुसर्‍या महायुद्धात गाजलेले ब्रिटिश सेनानी जनरल क्लॉड ऑकिनलेक हे यावेळी भारताचे सरसेनापती होते. पण, ते निवृत्तीच्या वाटेवर होते. त्यामुळे अतिशय त्वरेने लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांना लष्कराच्या पश्चिम विभागात प्रमुख पदावर आणण्यात आले. करिअप्पा वेगाने कामाला लागले. परिस्थिती कमालीची प्रतिकूल होती. फाळणीमुळे सैन्याची रचना विस्कळीत झाली होती. साधनसामग्री अपुरी होती. निसर्ग प्रतिकूल होता. सगळ्यात मुख्य म्हणजे राजकीय नेतृत्त्वाला सैनिकी पराक्रम म्हणजे ‘युद्धखोरपणा’ असे वाटत होते.
 
 
पण, अशा अत्यंत प्रतिकूल स्थितीतून पुढे सरसावतो तोच खरा सैनिक, हे जनरल करिअप्पा आणि साहाय्यक अधिकार्‍यांनी दाखून दिले. पाकिस्तानी मगराने जवळजवळ पूर्ण गिळलेले काश्मीरचे माणिक त्यांनी पराक्रमाची शर्थ करून खेचून आणले. करिअप्पांचे साहाय्यक सेनानी मेजर जनरल थिमय्या यांनी तर जगातल्या सर्वोच्च उंचीवरच्या (11,575 फूट) झोजिला खिंडीत ‘सातवी लाईट कव्हेलरी’ ही रणगाडा तुकडी नेऊन उभी केली. जगभरचे सर्व सेनापती आश्चर्याने थक्क झाले. कारण कोणत्याही सेनापती इतक्या उंचीवरच्या ठिकाणी रणगाडा नेण्याचे धाडस केलेलेे नव्हते आणि हे रणगाडे तरी कोणते, तर दुसर्‍या महायुद्धाअखेर ब्रिटनने जुनाट म्हणून काढून टाकले.
 
 
लष्कराचे मुख्य विभाग
 
भूदलाचे मुख्यतः दोन विभाग असतात. पहिला झुंजी विभाग म्हणजे ‘कॉम्बॅट आर्म्स.’ यात इन्फन्ट्री, एअरबोर्न इन्फन्ट्री, मॅकेनाईल्ड इन्फन्ट्री, पॅराशूट रेजिमेंट, आर्मर्ड कोअर, एव्हिएशन कोअर, आर्टिलरी एअर, डिफेन्स आर्टिलरी, इंजिनिअर्स कोअर, सिग्नल कोअर असे उपविभाग असतात.
 
 
दुसरा विभाग म्हणजे मदतगार विभाग किंवा ‘सपोर्टिंग सर्व्हिसेस’ यात आर्मी कोअर मेडिकल, कोअर ऑर्डनन्स कोअर, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड मेकॅनिकल कोअर मिलिटरी पोलीस हे उपविभाग असतात. झुंजी विभागइतकाच मदतगार विभागही महत्त्वाचा असतो.
 
 
1947-48च्या युद्धात हे दोनही विभाग समन्वयाने उभे ठाकले किंवा जनरल करिअप्पांच्या उत्कृष्ट नेतृत्त्वाने त्यांचा उत्तम समन्वय घडवून आणला. म्हणून सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करीत भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला खडे चारले. राजकीय नेतृत्त्वाने कचखाऊपणा केला नसता, तर भारतीय सेनानी काश्मीर पूर्ण मुक्त करूनच थांबले असते.
 
 
1962च्या भारती-चीन युद्धात मदतगार विभागाला आपले काम नीटपणे करता आले नाही. त्याचा दोष राजकीय नेतृत्त्वाकडे जातो. पण, त्याचा परिणाम असा झाला की, नेफा सरहद्दीवरच्या आपल्या सैनिकांना गरम कपडे, अन्नधान्य, दारूगोळा याचा नीट पुरवठाच झाला नाही. असो.
 
 
1947-48च्या या भारत -पाक युद्धादरम्यान भारताच्या सरसेनापतीपदी तीन इंग्रज सेनापती येऊन गेले. जनरल क्लॉड ऑकिनलेक जाऊन त्यांच्या जागी रॉब लॉकहार्ट आणि मग जनरल रॉय बुचर हे आले. खरे म्हणजे हे तिघेही उत्तम सेनापती होते. दुसर्‍या महायुद्धात पराक्रम गाजवलेले होते. पण, अखेर ते इंग्रज होते. ते भारत सरकारच्या हुकूमाप्रमाणे नव्हे, तर लॉर्ड लुई माउंटबॅटन यांच्या हुकूमाप्रमाणे वागत होते आणि माउंटबॅटन यांचे धोरण उघडउघड भारतविरोधी व पाकिस्तानी पक्षापाती होते.
अखेर तो पक्षपात सहन करणे सर्वोच्च राजकीय नेतृत्त्वालाही अशक्य झाले. जनरल रॉय बुचर यांना नारळ देण्यात आला आणि जनरल कोदंडेरा मदाप्पा करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनापती बनले. तो दिवस होता. दि. 15 जानेवारी, 1949.
 
 
Powered By Sangraha 9.0