कोरोना काळातील १०० कोटींच्या घोटाळ्यासाठी पालिका अधिकाऱ्याला नोटीस

13 Jan 2023 19:06:23

BMC

मुंबई : कोरोना काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला असून याच प्रकरणी मुंबई महापालिकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला ईडी कडून नोटीस बजवण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्यांकडून करण्यात आला आहे. तब्बल १०० कोटींचा हा घोटाळा असून यामध्ये बेनामी कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.


कोरोना काळात बीएमसीकडून कोव्हीड सेंटर मध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्यासाठी बाहेरील कंपन्यांना कंत्राट देण्यात आले होते. यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट प्राप्त झाले होते. मात्र ही कंपनीच बोगस असल्याचा आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्रात अनुभव नसल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच १०० कोटी रुपयांचा घोटाळा यामध्ये झाल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले होते.


या कंपनीने जून २०२० ते मार्च २०२२ पर्यंत कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून काम असून ही कंपनी नवीन असल्याचे आणि या कंपनीला पुरेसा अनुभव नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीएमआरडीए चे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे निर्देश दिले होते. मात्र तरीही पालिकेने या कंपनी कंत्राट काम सुरू ठेवले होते. त्यामुळे या कंपनी आणि कंपनीच्या भागीदाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये तक्रार दाखल केली होती आणि यासंदर्भात ऑगस्ट २०२२ मध्ये गुन्हा दाखल झाला होता.


दरम्यान आआता मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा,आयकर विभाग आणि ईडीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून या संदर्भात पालिकेकडे काही माहिती आणि कागदपत्र मागवण्यात आले आहेत. मात्र पालिकेकडून या संदर्भात कुठल्याही प्रतिसाद मिळत नसल्याने आणि टाळाटाळ होत असल्याने आता पालिकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला चौकशीसाठी ईडी ने नोटीस पाठवल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

 
Powered By Sangraha 9.0