ठाणे : राज्यात झालेले सत्ता परिवर्तन मविआतील घटक पक्षांच्या अद्याप पचनी पडलेले दिसत नाही.मविआतील ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडुन शिंदे गट आणि भाजपवर तोंडसुख घेण्याचा शिरस्ता सुरुच आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याला दोन मुख्यमंत्री हवेत असे विधान केल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले. त्यावर राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनीही प्रतिवार करीत प्रत्युत्तर दिल्याने शिंदे गट आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज असल्याचे विधान केले होते. या विधानाचा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी समाचार घेतला आहे. म्हस्के यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत त्यांनी सुळे यांना जशास तसे उत्तर दिले. या ट्विट मध्ये त्यांनी, सुप्रिया ताई तुम्हाला त्रास होणारच, आधीचे मुख्यमंत्री घरात बसत होते त्यामुळे तुमचंच राज्य होतं, उड्या मारायला फुल्ल स्कोप होता, आताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही जनतेची कामे करतात लोकांमध्ये मिसळतात, पूर्वी कसं "नामधारी राजा, दुसऱ्यांचा गाजावाजा आणि बेजार प्रजा" असा प्रकार होता.
आता सगळं बदलले आहे. सुप्रियाताई आतापर्यंत आमच्या सरकारने १३४८ फाईल्स क्लिअर केल्या आहेत.दररोज जनहिताचे ३ ते ४ निर्णय घेतले जात आहेत. जमल्यास मोजणी करून घ्या. असा टोला लगावत म्हस्के यांनी खा. सुळे यांचा समाचार घेतला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. नरेश म्हस्के हे शिवसेनेचे प्रवक्ते नसून गेली काही दिवस पवार यांच्या कुटूंबियांवर म्हस्के यांच्याकडून सातत्याने वैयक्तिक टीका केली जाते.
नरेश म्हस्के हे फुटीर शिंदे गटाचे प्रवक्ते असून त्याच्या वयापेक्षा जास्त प्रवास पवार कुटूंबियांचा राजकारणात झाला आहे. नरेश म्हस्के यांच्या प्रभागात मनोरुग्णालय आहे, त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तेथे व्हीआयपी रूमची सोय करून म्हस्के यांच्या मेंदूची तपासणी करावी. अशी टीप्पण्णी करत परांजपे यांनी म्हस्के यांच्यावर प्रतिहल्ला चढवला आहे.
दरम्यान,ठाण्यात म्हस्के आणि परांजपे यांच्यात एकमेकांवर चिखलफेक करणे, हे काही नवीन नाही, मात्र या सत्तासंघर्षात सुरु असलेली टीका आणि आरोप भविष्यात देखील पाहायला मिळाल्यास नवल वाटायला नको. अशी भावना नागरीक व्यक्त करीत आहेत.