मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यामुळे राजकीय घडामोडिंना प्रचंड वेग आला आहे. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला पराभूत करण्याची व्यहरचना भाजपकडून रचलेली असताना राज ठाकरे वर्षावर दाखल झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. गृहमंत्री अमित शाहंनी "धोका देणाऱ्यांना शिक्षा केलीच पाहिजे, उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आलेली आहे" , असे वक्तव्य करून एकप्रकारे मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले आहे. त्यात राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने मुंबई महापालिकेत नव्या समीकरणांची नांदी होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यंदा शिवतीर्थावर दसरा मेळाव्या निमित्त कोणाचे भाषण होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. शिवतीर्थावर आम्हीच दसरा मेळावा घेणार असा दावा ठाकरे गटाकडून केला जात असताना, दुसरीकडे शिंदे गटाकडून शिवाजीपार्क येथे दसरा मेळावा साजरा करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यात शिंदे गटातर्फे राज ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रण दिले जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे तर्कवितर्क लढावे जात आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या १७ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात विदर्भापासून होणार आहे. १७ सप्टेंबरपासून ते २ दिवसीय नागपूर दौरा करतील. त्यानंतर चंद्रपूर, अमरावतीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. राज ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त विदर्भात मनसे पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रयत्न होणार आहे. राज ठाकरेंच्या या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे नागपूरला जाणार आहेत.
जहाल हिंदुत्वाच्या मुद्याला हात घातल्यापासून राज ठाकरे आणि मनसे चांगलीच ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे. काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. अमित शहांनी भाजप कार्यकर्त्यांपुढे मिशन १५० चे टार्गेट दिलेले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे.