पाकिस्तानात महापुराने हाहाकार माजवला. 1300 हून अधिक नागरिकांचा या पुराने बळी घेतला, तर लाखो लोक बेघर झाले. पाकिस्तानची आर्थिक स्थिती बघता, तेथील सरकारने विदेशी मदतीचीही याचना केली. कॅनडा, तुर्की, अझरबैजान यांसारख्या काही देशांकडून तसेच ‘संयुक्त राष्ट्र संघटनेने’ही पाकिस्तानला मदतीचा हात देऊ केला. इतकेच काय, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करून पाकिस्तानातील महापुराविषयी, तेथील पूरग्रस्तांसाठी आपल्या संवेदना व्यक्त केल्या होत्या. खरंतर फक्त पंतप्रधान मोदीच नाही, तर अनेक भारतीयांनी समाजमाध्यमांद्वारे पाकमधील महापुराबाबत चिंता व्यक्त केली होती. परंतु, पाकिस्तानी अभिनेत्री मेहवीश हयात हिला मात्र बॉलीवूडने पाकिस्तानी पुराविषयी तोंडाला लावलेले कुलूप मात्र भलतेच खटकले आणि तिने तिचा रोष ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला.
मेहवीश आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, “पाकिस्तानमधील पुराबाबत बॉलीवूडमधील शांतता ही बधीर करणारी आहे. अशा वेदनांना राष्ट्रीयता, वर्ण आणि कुठलाही धर्म नसतो. राष्ट्रवादाच्या राजकारणापलीकडे जाऊन पाकिस्तानमधील चाहत्यांची त्यांना काळजी आहे, हे दाखवून देण्यासाठी बॉलीवूडच्या मंडळींसाठी हीच योग्य वेळ आहे. आम्ही दु:खात आहोत आणि संवेदनेने त्यांनी (बॉलीवूडने) व्यक्त केलेले दोन शब्द व्यर्थ जाणार नाहीत.” आता मेहवीशची कळकळ आपण समजू शकतोच की. कारण, पाकिस्तानातील कलाकार असो वा क्रिकेटपटू असो, त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर काय प्रतिमा, ते वेगळे सांगायला नको. म्हणूनच मग बॉलीवूडच्या देशविदेशात गाजलेल्या भारतीय कलाकारांनी पाकिस्तानबद्दल दोन चांगले शब्द बोलावे, जगाने पाकिस्तानला मदत करावी म्हणून आवाहन करावे, असे यामागील स्पष्ट अर्थकारण.
दुसरी बाब म्हणजे, मेहवीशच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादाच्या राजकारणाच्या दबावाखाली बॉलीवूडची मंडळी पाकिस्तानच्या पुराबाबत एक चक्कार शब्दही काढायला तयार नाहीत. मेहवीशचे म्हणणे अगदी बरोबरच म्हणायला हवे. कारण, राष्ट्रविरोधी शक्तींप्रती आपण मदतीचा हात दिला, तर आधीच भारतात उसळलेल्या ‘बॉयकॉट’ मोहिमेचा फटका आपल्या चित्रपटांनाही बसू शकतो, याची आज बॉलीवूडच्या मंडळींना पूर्ण कल्पना आहे. आता ही ‘बॉयकॉट’ मोहीम म्हणजे कुठल्याही सरकारच्या सांगण्यावरून, आदेशावरून नव्हे, तर बॉलीवूडमधील काही धर्मांध, राष्ट्रद्वेषी शक्तींना अद्दल घडविण्यासाठी जनतेनेच स्वयंस्फूर्तीने उपसलेले हत्यार आहे. त्याचा अलीकडेच आमीर खानपासून ते विजय देवरकोंडासारख्या अभिनेत्यांच्या चित्रपटांना जोरदार दणकाही बसला. त्यामुळे आता उगाच पाकिस्तानच्या महापुराबाबत काही आवाहनपर वक्तव्य करून भारतीयांचा रोष ओढवण्यापेक्षा गप्प बसणेच बॉलीवूडकरांनी पसंत केलेले दिसते.
खरंतर मेहवीशसारख्या पाकिस्तानी कलाकारांनी बॉलीवूडच्या मंडळींकडून मुळात काही अपेक्षा करणेच व्यर्थ. कारण, शेवटी बॉलीवूड हा धंदाच! त्यातच पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांवर अघोषित बहिष्कार टाकला, तर तिथे पाकिस्तान सरकारनेही बॉलीवूडच्या चित्रपटांवर बंदी लादल्याने तेथील चित्रपटगृहे एकाएकी ओस पडली. त्यामुळे अर्थोअर्थी जो देश बॉलीवूडच्या उत्पन्नात कवडीचीही भर घालत नाही, त्या देशाबाबत बॉलीवूडकरांना उमाळा फुटणे हेही आता दुर्लभच. पण, मेहवीशसारखी मंडळी जेव्हा ‘बॉलीवूड’ असा उल्लेख करतात, तेव्हा त्यांची अपेक्षा मुळात धर्माने मुसलमान असलेल्या खान बंधूंकडूनच अधिक असते, हे वेगळे सांगायला नकोच. पण, आज देशाचे वातावरण राष्ट्रवादाने नक्कीच भारावले आहे. त्यामुळे भारतविरोधी शक्तींना, विचारांना बॉलीवूडचे समर्थन मिळालेच, तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते, याची पुरेपूर जाणीव बॉलीवूडकरांना आहे. म्हणूनच आज पाकिस्तानच्या पुराबाबत यांच्या तोंडून साधा ‘ब्र’ही निघालेला नाही. पूर्वी असेच काही घडले असते, तर ‘पाकिस्तानला मदत करा’ म्हणून बॉलीवूडनेही मोठमोठ्या ‘फंड रेझिंग’ मोहिमा राबविल्या असत्या. पण, देश बदलला आहे, देशवासीय जागृत झाले आहेत आणि म्हणूनच पाकी कलाकारांचा पुळका असलेले बॉलीवूड पाकिस्तानच्या महापुरानंतरही अजूनही शांत आहे!