अमित शाहांचं मिशन मुंबई @150 हे ठाकरेंना धडा शिकवण्यासाठीच!

05 Sep 2022 17:48:51
 
 
amit
 
 
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा चांगलाच गाजला. निमित्त होते मुंबईतल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाचं. गृहमंत्री अमित शहांनी या दौऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेची रणनिती दिली. केंद्र सरकारच्या सत्तेतील आणि पक्षातील क्रमांक दोनचे नेते म्हणजे अमित शाह... कधी नव्हे ते अमित शाह मुंबई महापालिकेसाठी आग्रही आहेत तितके ते यापूर्वी कधीच नव्हते. एखाद्या जखमी सिंहाप्रमाणे त्यांचा आजचा आवेश दिसला... अमित शाह म्हणाले, "शिवसेना फुटीला फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच कारणीभूत आहेत. २०१४मध्ये केवळ २ जागांसाठी ठाकरेंनी धोका दिला. राजकारणात धोका देणाऱ्यांना शिक्षा ही व्हायलाच हवी. धोका देणारे कधीही सामर्थ्यवान होऊ शकणार नाहीत. भाजपचा एक एक कार्यकर्ता रस्त्यावर उतरुन ही लढाई लढेल याची हीच ती वेळ आहे. भाजपच्या सन्मानासाठी एकत्र येण्याची आत्ताच गरज आहे.", असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंकडून वारंवार २०१४च्या निवडणूकांचे दाखले दिले जातात.... २०१४मध्ये भाजपनं युती तोडली.
 
 
 
 
 
 
अमित शाहंनी आठ वर्षांपूर्वीचा तो हिशेबही चुकता करुन टाकला. "केवळ दोनच जागांसाठी उद्धव ठाकरेंनीच युती तोडली", असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला. यानंतर अमित शाहंनी थेट उद्धव ठाकरेंनाच खुलं आव्हान दिलं. मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा आता फडकवला पाहिजे, महाराष्ट्रातील हिंदूविरोधी राजकारण संपुष्टातच आणायला हवं. असाही निर्धार त्यांनी केला आहे. याचा अर्थ त्यांनी शिवसेनेसोबत सोबत विशिष्ट धर्मीयांचं लांगूलचालन करणाऱ्यानाही इशारा दिलायं. उद्धव ठाकरेंना जमीनीवर आणण्याची हीच वेळ आहे. एखाद्याला कानाखाली मारली तर फक्त शरीराला लागते. मात्र, घरासमोर कानाखाली लगावली तर तिचा आवाज अंतर्मनापर्यंत जातो. आज ती वेळ आलीयं. धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असं म्हणत त्यांनी भाजपच्या मिशन मुंबई 150 ची रणनिती आखलीयं. शहांच्या या वाक्याचा अर्थ बऱ्याच गोष्टी सांगून जातो.
 
 
 
 
 
 
 
मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या प्रतिष्ठेची करण्यापूर्वीच शाहंनी या मुद्द्याला हात घातला आहे. मुंबई महापालिका ज्यावर २५ वर्षे फक्त शिवसेनेचीच सत्ता राहिली. महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची पोलखोल भाजप नेते वेळोवेळी करत आले आहेत. पण अमित शाहांनी तर थेट उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचण्याचा जणू निर्धारच केला आहे. भाजपचं मिशन 150 म्हणजे फक्त मुंबईवर महापौर बसवणं नाही तर उद्धव ठाकरेंसाठी आणि शिवसेनेसाठी महत्वाची असेलेल्या या निवडणूकीत जागा दाखवून द्यायची आहे. अमित शाह मुरब्बी राजकारणी आहेत. अवमानांचा सूड ते उगवत नाहीत. पण योग्यवेळी बरोबर दाखवून देतात.
 
 
 
 
 
 
 
युतीच्या काळात शिवसेना-भाजप सत्तेत होती. तरीही सातत्याने संजय राऊत आणि त्यांचे नेते केंद्रात आणि राज्यातील सरकारविरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते. २०१९ उजाडलं आणि संजय राऊतांना भाजपविरोधात बोलण्यासाठी मोकळं रान मिळालं. दररोज उठून पत्रकार परिषदा घेणाऱ्या राऊतांनी सगळीच मर्यादा तोडली. उद्धव ठाकरेंनीही राऊतांच्या वाचाळपणाला कधी आवर घातला नाही. राऊत कमी की काय म्हणून स्वतः उद्धव आणि त्यांची अन्य नेतेमंडळीही भाजपविरोधात गरळ ओकण्यासाठी उभी राहिली. प्रामुख्याने विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात.
 
 
 
 
 
 
 
महाविकास आघाडीत मात्र, परिस्थिती उलटी होती. स्वतः मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी माजी महापौर किशोरी पेडणेकरांपर्यंत भाजप विरोधात बोलण्य़ासाठी स्पर्धाच लागली होती. इतकचं काय तर हाणामारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मातोश्रीवर बोलावून बोलावून सन्मान केला जात होता. असं म्हणतात राजकारणात प्रत्येकजण एक डाव राखून ठेवत असतो. अमित शाहांनी आपला पुढचा डाव मुंबई महापालिका निवडणूकांसाठीच राखून ठेवलायं. ठाकरेंना २०-२५ नव्हे तर शक्य झाल्यास दोन अंकी आकडाही पार करू द्यायचा नाही, असा निर्धार आता भाजपनं केलायं. राज्यातील सत्ता गेल्याचं शिवसेनेला दुःख तितकसं होणार नाही. मात्र, हातातून ४४ हजार कोटींचं बजेट असणारी मुंबई महापालिका निसटली तर उद्धव ठाकरेंना उरली सुरला ठाकरेगटही विचारणार नाही. हे स्वतः उद्धव ठाकरेही ओळखून आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मुंबई महापालिका ही अटीतटीची लढत असेल. पण अमित शाहांनी ही लढाई सुद्धा प्रतिष्ठेची करुन ठेवली. ठाकरे गटाकडे आता बोलायला संजय राऊतही नाहीत.
 
 
 
 
 
 
 
ते सध्या पत्रा चाळ प्रकरणात ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांची कोठडी शाह यांच्या मुंबई दौऱ्यादिवशीच आणखी वाढलीयं. शाहंच्या टीकेनंतर ठाकरे गटाकडून प्रत्युत्तरासाठीही प्रवक्ते शिल्लक नाहीयेत. किशोरी ताई आणि मनिषा कायंदे फक्त खिंड लढवतायतं. ठाकरे गट राजकारणातील ही लढाई मनानेच हरलेला दिसतोयं. हिंदुत्वाशी फारकत समविचारी पक्षांशी तोडलेली युती उद्धव ठाकरेंना चांगलीच महागात पडलीयं. संभाजी ब्रिगेड आणि सुषमा अंधारेंसारख्यांना जवळ करुन त्यांना ही लढाई जिंकण निव्वळ अशक्यच आहे. विकासाच्या आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भाजप आणि नेत्यांचा वाट्टेल तितक्या खालच्या भाषेत उद्धार करण्याची जुनी खोड आता मोडून काढण्याची संधी अमित शाह जाऊ देणार नाहीत. सोबतच उद्धव ठाकरेंच्या अहंकाराचं आणि गर्वाचं घर खाली करण्याचीही शपथ त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0