पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
"मुली, अहिल्या मेली आणि खंडू जिवंत आहे असे मी समजेन, पण तूं सती जाऊं नकोस. माझं ऐक. " हृदयाचे पाणी करणाऱ्या ह्या शब्दांनी मल्हारराव पुत्रनिधनानंतर आपल्या सुनेची समजूत घालीत होते. ही गोष्ट इ. स. १७५४ मध्ये घडली. पेशव्यांचा भाऊ राघोबा (रघुनाथ) याने कुंभेरीचा किल्ला घेतला. या मोहिमेंत मल्हारराव त्यांच्या मदतीला गेले होते. लढाईत मल्हाररावांचा मुख्या मारला गेला. या वेळीं अहिल्याबाईही त्यांच्याबरोबर होत्या. खंडूजी हे मल्हाररावाचे एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांना पुत्रनिधनाचा फार मोठा धक्का बसला. या वेळीं अहिल्याबाईचें वय अवघें वीस वर्षांचे होते. त्या काळच्या परिपाठानुसार पतीमागोमाग सती जाण्याची त्यांनी तयारी केली. मल्हारराव यांना दुसरा कोणाचाच आधार नसल्यानें त्यांनी अहिल्याबाईंना सती न जाण्याची विनंती केली कारण आपल्या पराक्रमाने मल्हारराव जाणून होते की, इंदूर संस्थानच्या आधारवेल म्हणून अहिल्याबाईच योग्य आहे.
अहिल्याबाई मराठवाडा भागातील चोंडी-चापडगाव या गांवच्या रहिवासी होत्या. पाटील माणकोजी शिंद्यांची ही मुलगी. इ. स. १७४३ मध्ये एकदां पेशव्यांच्या सैन्याचा तळ या खेड्यांत पडला होता. मल्हाररावही सैन्यासहित या वेळीं पेशव्यांबरोबर होते. पेशव्यांनी आठ वर्षांच्या चिमुरड्या अहिल्येस सहज पाहिले आणि त्यांच्या बद्दल त्यांचे मत अतिशय अनुकूल झालें. अहिल्याबाई सुस्थळी पडाव्या असे वाटून त्यांनी आपले सरदार मल्हारराव होळकर यांना खंडूजींशी त्यांचा विवाह करावा अशी सूचना केली. लग्न ठरले. विवाहसमारंभ मोठ्या थाटात झाला.
दुर्दैवानें खंडुजी अतिशय आळशी, सुखासीन आणि बेजबाबदार वृत्तीचे निघाले. त्यांनी अहिल्याबाईस छळले नाहीं पण त्यांच्या गुणांचीही कदर केली नाही. उलट वयोमानानें अहिल्याबाई अतिशय कर्तृत्ववान आणि कर्तव्यदक्ष बनल्या. मल्हारराव सुद्धा अहिल्याबाईंवर राज्याची कामे निर्वेधपणे सोपवत असत. सारी वसुली, पत्रव्यवहार आणि सैन्याच्या व्यवस्थेची सर्व कामे मल्हाररावांनी त्यांना शिकवली. कित्येक वेळां ते अहिल्याबाईंना युद्धावरहही आपल्याबरोबर नेत असत. अहिल्याबाईना दोन मुले झाली- मालेराव आणि मुक्ताबाई. ह्यांच्या सहवासांत त्यांची वैवाहिक जीवनांतील उदासीनता बरीच कमी झाली पण त्यांच्या शेवटच्या आयुष्यात मुलांनीही त्यांना दुःखच दिले.
सती न जाण्याचा विचार पक्का केल्यानंतर त्यांनी आपले सर्वस्व राज्यकारभारांतच खर्च करण्याचें ठरविलें. त्यांची जन्मतः असलेली धार्मिक वृत्ती आयुष्यांतील दु:खामुळे वाढतच गेली. दिवसाचा बराच वेळ त्या पूजा-अर्चा, ध्यान, चिंतन आणि पुराणश्रवण यांत घालवत असत. मल्हारराव स्वर्गवासी झाल्यानंतर मालेरावांकडे औपचारिकरीत्या सुभेदारी आली. परंतु त्याच्या अंगांत कुवत नसल्यानें प्रत्यक्षांत सर्व राज्यकारभार अहिल्याबाईच पाहत होत्या. पेशव्यांना त्यांच्या वकुबाची पूर्ण कल्पना असल्यामुळे मालेरावांच्या निधनानंतर त्यांनी संस्थानची प्रमुख म्हणून अहिल्याबाई यांनाच मान्यता दिली. त्यांचा दत्तकपुत्र तुकोजीराव हा फक्त सेनापति म्हणून काम करत होता.
उत्तम प्रशासक न्याय म्हणून अहिल्याबाईंची ख्याति सर्वदूर होती. तडजोड आणि मार्दव हे गुण त्यांच्यात भरपूर असले तरी जिथे गरज असेल तेथें त्या वज्रापेक्षांहि कठोर होत असत. त्यांच्या आमदनीच्या सुरुवातीस चंद्रावत नांवाच्या रजपूत जमातीनें बंडाळी सुरू केली. त्यांच्या पुढाऱ्यानें आपले राज्य इंदूरच्या राज्यास जोडण्यासाठी मल्हाररावाकडे सुपूर्त केलें होतें. परंतु मल्हारराव स्वर्गवासी झाल्याबरोबर आपले स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा या लोकांनी प्रयत्न केला. या वेळी तुकोजी उत्तर हिंदुस्थानांत एका मोहिमेवर गुंतला होता परंतु त्यांच्यासाठी अहिल्याबाई वाट बघत बसल्या नाहीं. असलेल्या काही अधिकाऱ्यांसह स्वत: जाऊन त्यांनी या बंडाचा बीमोड केला. ह्या घटनेचा राज्यांतील लोकांवर इतका परिणाम झाला की, परत त्यांनी त्रास देण्याचा कधीही प्रयत्न केला नाहीं. अनंत फंदी हा प्रसिद्ध मराठी शाहीर एकदां सातपुड्यांतून प्रवास करत असतांना भिल्लांनी त्याला अडविले. परंतु आपण अहिल्याबाईकडे जात आहोत असे सांगतांच भिल्लांनी त्याला रक्षण देऊन सुखरूप पोचविले.
स्वतःच्या मुलांबाबत अहिल्याबाई अतिशय दुर्देवी ठरल्या. मालेराव मनानें फार कमकुवत होते. पुढे त्यांचे डोके फिरले आणि त्यांतच त्यांचा अंत झाला. या दुःखात अहिल्याबाई असतांनाच राघोबा (पेशव्यांचे चुलते ) इंदूरजवळ आले होते. राज्यांत पुरुष वारस नाहींत असे दिसतांच स्वारी करण्याचा त्यांनी बेत केला. अहिल्याबाईस ही गोष्ट समजतांच त्यांनी स्त्रियांचा एक सैन्य विभाग तयार केला आणि राघोबास असें कळविलें कीं, " माझी व आपली रणांगणांतच भेट व्हावी अशी आपली इच्छा दिसते. या गोष्टीस माझी मुळींच हरकत नाहीं. माझा पराभव झाला तरी मी स्त्रीच आहे. पण जर का उलट झाले तर मात्र आपली काय अवस्था होईल याचा विचार करून मग युद्धास सज्ज व्हावे." या संदेशातील मर्म ओळखून राघोबा यांनी आपला बेत बदलला आणि " आपल्या सांत्वनार्थ मी आपणांस भेटू इच्छितों ”असा त्यांनी अहिल्याबाईस निरोप पाठविला.
पुढचा काळ शांततेत गेला. म्हातारपणामुळे जावई स्वर्गवासी झाले आणि त्यांची एकुलती एक मुलगी मुक्ताबाई सती गेल्या. ह्या प्रसंगानें त्यांना इतका जबर धक्का बसला कीं, तीन दिवस त्या अन्नास शिवल्या देखील नाहीं आणि त्यांच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाहीं. पुढें शेवटपर्यंत त्यांनी अतिशय खडतर प्रकारें जीवन व्यतीत केले. १३ ऑगस्ट १७९५ साली अहिल्याबाई स्वर्गवासी झाल्या. स्वतःच्या सूक्ष्म निरीक्षणानें मराठी राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या सर जॉन माल्कमनें अहिल्याबाईसंबंधीं असें म्हटलें आहे कीं, " त्यांची अंतर्गत राज्यव्यवस्था आश्चर्य वाटावी इतकी नमुनेदार होती. त्यांच्या मर्यादा लक्षांत घेऊन असें म्हणावेसें वाटतें कीं ती एका विशुद्ध मनाची आणि आदर्श राज्यकर्ती होती."
अहिल्याबाईंचे स्मारक, त्यांनी बांधलेल्या अनेक विहिरी, धर्मशाळा, पूल, रस्ते, घाट आणि देवळें या रूपांत त्यांनी केलेले कार्य आजही सुस्थितीत बघायला मिळते. कलकत्ता ते बनारस रस्ता तयार करून सौराष्ट्रांत सोमनाथाचे, गयेला विष्णूचे आणि काशीला विश्वनाथाचे, नेपाळ येथील पशुपतीनाथ अशी विविध देवालये त्यांच्या धार्मिक वृत्तीची आणि दातृत्वाची आजही साक्ष देत आहेत. अहिल्याबाईंनी त्यांच्या जीवनकाळात केलेल्या पुण्यकर्मामुळेच त्या "पुण्यश्लोक" झाल्या. इंदूर संस्थानचा कारभार त्यांनी अत्यंत कर्तबदारीने जवळजवळ तीस वर्षे सांभाळला. मल्हाररावानंतर इंदूर संस्थानची आधारवेल आणि स्त्री पराक्रमाचे एक सुवर्णपान मराठी इतिहासात अहिल्याबाईंच्या पराक्रमाने जुळले. पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या चरणी नमन आहे.