माळ दुसरी : आधारवेल : राजमाता जिजाबाई

27 Sep 2022 11:47:25

news 1

राजमाता जिजाबाई (छायाचित्र साहाय्य - राजा श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी यांनी काढलेले राजमाता जिजाबाईंचे काल्पनिक चित्र.)

भारतीय इतिहासातील ते असे काही तेज:पुंज नाव आहे की, ज्याची तुलना क्वचितच इतर कोणाशी होऊ शकते. राजमाता जिजाबाईंचे संपूर्ण आयुष्यच फार धामधुमीत गेलेले आहे. नियतीने त्यांची पदोपदी परीक्षा पाहिली आहे. परंतु आपले सत्त्व, आपला स्वाभिमान या लोकविलक्षण स्त्रीने कदापिही सोडला नाहीच, उलट तत्कालीन गलितगात्र समाजाला स्फूर्ती देण्याचे, त्याच्यामध्ये चैतन्य उत्पन्न करण्याचे लोकविलक्षण काम या राजमातेने केले.

सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा तो काळ होता. मुस्लीम राजसत्ता साऱ्या भारतभर धुमाकूळ घालत होती. सर्व भारतीय जनता अन्यायाच्या आणि अमानुषतेच्या घोड्यांच्या टापांखाली तुडवली जात होती. विशेषत: महाराष्ट्रात हे क्रौर्य फार प्रकर्षाने दिसत होते. कारण तेराव्या शतकापर्यंत येथे देवगिरीच्या रामदेवराव यादवांची सुखी, समृद्ध सत्ता नांदत होती. त्यांच्या छायेखाली मराठी माणूस कलास्वाद घेत, दानधर्म करीत, शांत समृद्ध जीवन जगत होता. धान्य, कापड यांचा परदेशी व्यापार चालत होता आणि अचानक अल्लाउद्दीन खिलजी आपल्या अफाट आणि दमदार सेनेसह महाराष्ट्रात घुसला. कोणाला कल्पनासुद्धा आली नाही. सुखी जीवनाचा असा क्षणात विध्वंस झाला.

शत्रुला प्रतिकार झालाच नाही, त्यामुळे तो आला आणि आपली फौज आणि अंमल येथे ठेवून गेला. खऱ्या अर्थाने अराजकाला सुरूवात झाली. अल्लाउद्दीनने जाताना प्रचंड लूट बरोबर नेली होती. त्यामुळे मराठी माणूस दरिद्री झालेला होता. त्यातच तो मनानेही खचला होता. घरदार, बायका- मुलं, गुरं-ढोर कशाची शाश्वती राहिली नव्हती. गोठ्यातली गाय किंवा घरातील स्त्री केव्हा नाहीशी होईल याचा नेम राहिला नव्हता. जुनी मंदिरे फोडून तेथे मशिदी उभ्या राहत होत्या. सक्तीने धर्मांतरे होऊ लागली. कारण मोगलांचे मराठी भाषेवर, धर्मावर, देवावर, शास्त्रांवर, इतिहास -परंपरा कशाकशावर प्रेम नव्हते, उलट कट्टर वैरच होते. येथे जे जे आहे ते आपल्यासाठीच आहे असे समजून हे यवन वागत होते, राहत होते. सर्वावर सत्ता गाजवीत होते पण हे होत असतांना जिजाबाईंचे मन उद्विग्न होत होते.

मालोजी नावाच्या दुसऱ्या एका सरदारास निजामशहाने पुणे व सुपे आणि शिवनेरी व चाकण हे किल्ले जहागीर म्हणून दिले होते आणि या मालोजी राजांचा मुलगा शहाजी याच्याशीं जिजाबाईंचा इ. स. १६०५ मध्ये विवाह झाला. विवाहा नंतर या उभयतांचीं कांहीं वर्षे सुखाचीं गेलीं, पण नंतर शहाजी आणि लखुजी जाधव यांचे कांहीं कारणानें वैमनस्य आलें. लखुजी जाधव दिल्लीच्या औरंगजेबास मिळाले. शहाजी मात्र निजामशहाशीं एकनिष्ठ राहिले. निजाम शहाने शहाजीस आपला प्रमुख सल्लागार व सेनापति नेमले. 'पति कीं पिता ' असा यक्षप्रश्न जिजाबाईपुढे उभा राहिला. कर्तव्यबुद्धीनें भावनेवर मात करून जिजाबाईंनी माहेराचे पाश कायमचे तोडून टाकले. या कौटुंबिक विरोधांत जिजाबाईच्या धैर्याचा, निश्चयाचा आणि बाणेदारपणाचा चांगलाच कस लागला. हेच गुण पुढें शिवाजी महाराज यांच्यातही पुरेपूर उतरले. शहाजी राजांनी जिजाबाईना राजकारणाचे धडे दिले, घडवले आणि त्यातूनच राजमाता जिजाबाई शहाजी राजे गेल्यावर मराठ्यांच्या साम्राज्याच्या आधारवेलीवर बहरल्या आणि जिजाबाईनी पुत्र शिवाजी घडवला.

जिजाबाईंचा जन्म गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर १२ जानेवारी १५९८ रोजी सूर्योदयावेळी झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे जिजाबाईंचे जन्मगाव होते. लखोजीराव जाधव हे जिजाबाई यांचे वडील, तर माळसाबाई या त्यांच्या आई होत्या. आई आणि वडील या दोघांचीही घराणी अत्यंत कर्तृत्ववान आणि संस्कारसंपन्न अशी होती. जिजाबाईंच्या बाबतीत विलक्षण आश्चर्य घडले होते. आजही मुलासाठी नवस बोलल्याचे आपण ऐकतो, परंतु जिजाबाईंच्या आईने अर्थात माळसाबाईंनी कर्तृत्वसंपन्न मुलगी जन्माला यावी म्हणून नवस बोलला होता.

जिजाबाई यांचे कर्तृत्व, त्यांचा स्वाभिमान, त्यांची निष्ठा, त्यांचा पराक्रम मराठी मुलुखासाठी समर्पित होता. मराठी मुलुखातील शूरवीर पुरुष आपले रक्त सांडत होते, झुंजत झुंजत मरत होते, परंतु सारे काही परकीयांसाठी होते. आजवर दास्यत्वाचे क्रूर फटके सहन केलेल्या जिजाबाईंना आता दास्यत्वाची कल्पनाच सहन होत नव्हती, त्यांना स्वतःचे राज्य हवे होते, स्वतंत्र तक्त हवे होते, स्वतःचा झेंडा हवा होता, आपली फौज हवी होती, आपला तोफखाना हवा होता, आपला सेनापती हवा होता, आपला प्रधान हवा होता, आपले स्वतःचे सार्वभौम राष्ट्र हवे होते. आपले हे विलक्षण स्वप्न लहानग्या शिवबाकडून पूर्ण करण्याचा निश्चय त्यांनी शिवजन्माच्या पूर्वीपासूनच घेतला होता.

खरंतर गरोदर असताना घोड्यावरून शिवनेरीच्या दिशेने घौडदोड करणाऱ्या जिजाबाईंनी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढच रोवली, असे म्हणावे लागेल. अस्मानी-सुलतानी संकटांची बिकट वाट सगळीकडे असताना ही धुरंधर माता किल्ले शिवनेरीवर इ.स. १६३० मध्ये विसावली आणि ह्या सद्गुणी पुत्राला जन्म देऊन 'शिवाई' देवीचा कृपाप्रसाद म्हणून शिवाजी नामकरण करून इतिहासाचे बाळकडू त्यांनी त्याला जन्माला आल्यापासून पाजले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील पन्नासपैकी पंचेचाळीस वर्षे त्यांच्यावर मायेची नजर ठेवणारी राजमाता जिजाबाई होत्या. आई तुळजाभवानीला त्यांनी प्रार्थना केली होती की कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे.

ज्यावेळी पुण्याची जहागीर मिळाली, तेव्हा राजे अवघे १४ वर्षांचे होते. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. शिवाजीराजेंना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. राष्ट्र आणि धर्म हे संस्कार करण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना महाभारत आणि रामायणातील कथा सांगितल्या. न्यायनिवाडा करण्याचे धडे महाराजांना त्यांच्या कडूनच प्राप्त झाले. जिजाबाई शिवाजीमहाराजांच्या आद्यगुरू होत्या.

जिजाबाई यांचे सारे आयुष्य म्हणजे स्वराष्ट्रभक्तीने पेटलेला एक उत्स्फूर्त आविष्कार आहे. भारतीय इतिहासातील ते असे काही तेज:पुंज नाव आहे की, ज्याची तुलना क्वचितच इतर कोणाशी होऊ शकते. राजमाता जिजाबाईंचे संपूर्ण आयुष्यच फार धामधुमीत गेलेले आहे. नियतीने त्यांची पदोपदी परीक्षा पाहिली आहे. परंतु आपले सत्त्व, आपला स्वाभिमान या लोकविलक्षण स्त्रीने कदापिही सोडला नाहीच, उलट तत्कालीन गलितगात्र समाजाला स्फूर्ती देण्याचे, त्याच्यामध्ये चैतन्य उत्पन्न करण्याचे लोकविलक्षण काम या राजमातेने केले. राजमाता जिजाबाई लोकमाता होत्या. ही उपाधीसुद्धा त्यांना आपल्या प्रजेविषयी जो कळवळा वाटत होता त्यामुळे प्राप्त झालेली होती.

पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत राजमाता जिजाबाई लढत राहिल्या. राजमाता जिजाबाई ऐंशी वर्षे जगल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सुवर्णक्षण पाहिल्यानंतर अवघ्या तेरा दिवसांतच रायगड लगतच्या पाचाड गावी इ.स.१६७४ मध्ये त्यांनी देह ठेवला. एका कर्तृत्ववान, तडफदार, अभिमानी स्त्रीचे अस्तित्व संपल्यावर मागे राहिल्या होत्या फक्त सुगंधी स्मृती ज्या कस्तुरीप्रमाणे आसमंत भरून टाकणाऱ्या; तर पुढची कित्येक शतके प्रेरणा देणाऱ्या त्या स्मृतीतून आणि स्वतःच्या जीवनातून त्यांनी खूप काही शिकवले. पुढील पिढ्याही त्यातून बरेचसे शिकतील. कारण स्वदेशाभिमान जागविणाऱ्या अशा आधारवेलींची आजही गरज आहे. राजमाता जिजाबाईंच्या पवित्र,स्फुर्तिदायी स्मृतींना शतशः प्रणाम.

Powered By Sangraha 9.0