रंगूनी रंगात सार्‍या, श्रीहरी तो वेगळा!

24 Sep 2022 09:40:12
shree hari povale
 
 
 
 
सुलेखन, फलकलेखन, कथाकथन, रांगोळी, चित्रकला, शिल्पकला, रंगभूषा, नेपथ्य, नाट्य, अभिनय अशा विविध कला आत्मसात करून ज्ञानदान करणार्‍या कलाशिक्षक श्रीहरी पवळे यांच्याविषयी...  
 
 
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण या गावी जन्मलेल्या श्रीहरी आप्पाजी पवळे यांचे बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले. वडील कीर्तनकार असल्याने वारकरी संप्रदायाचे बाळकडूही घरातूनच मिळाले. वडील कीर्तनासह शेती आणि आई रोजगार हमीची कामे करून घर चालवत. पवळे यांचे शिक्षणही काही वर्षं मुंबईत आणि की वर्ष गावाकडेच झाले. वडील मुंबईत ड्रायव्हर असल्याने काही वर्षे त्यांनी मुंबईत शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत पवळे यांनी अनेक कलागुण विकसित केले. शालेय वयात त्यांना नृत्य, चित्रकला, मूर्तिकाम अशा अनेक कलांची आवड लागली. ‘दुसरी कोणतीही नोकरी करू नको, तू शिक्षक हो’ अशी त्यांच्या आईची इच्छा होती.
 
 
 
त्यामुळे त्यांनी शिक्षक होण्याचा निश्चय केला आणि प्रगत कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. दोन वर्षाचा ‘एटीडी’ कोर्स पूर्ण करून त्यांनी पुढे ’जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये शिल्पकलेसाठी प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्याच्या दोन वर्षांतच त्यांना गिरगावच्या सरदार हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून नोकरी लागली. गावी हलाखीची परिस्थिती आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव यामुळे आई-वडिलांनी त्यांना मुंबईत पाठवले होते. शिक्षण अपूर्ण सोडूनच त्यांनी नोकरीचा मार्ग स्वीकारला. कारण, तेव्हा त्यांच्यासाठी नोकरी अतिशय गरजेची होती. परिस्थिती सावरत असताना त्यांचा कल नव्या गोष्टी शिकण्याकडे अधिक होता. सकाळी शाळेच्या ७ ते १२ वेळेनंतर त्यांच्याकडे बराच फावला वेळ होता.
 
 
 
 
त्या वेळेचा उपयोग त्यांनी नव्या कला शिकण्यासाठी केला. हळूहळू पवळेंनी नाट्यकलेचे धडे घेतले. शाळेत मुलांचे बालनाट्य बसवून घेऊन ते स्पर्धांनाही जायचे. यानिमित्ताने श्रीराम लागू, निळू फुले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, राजा गोसावी, अरविंद वैद्य, अरूण नलावडे यांचा सहवास लाभला. नलावडे यांनी पवळेंना ‘नाथ माझा काशिनाथ’ या नाटकात काम करण्याची संधी दिली. राहुल सोलापूरकर यांच्यासोबतही त्यांनी काम केले. शिक्षकाची नोकरी सांभाळून त्यांनी नाटकाची तालीम, सराव आणि प्रयोग सुरू ठेवले. ‘जुईली’ मालिकेत त्यांना रमेश भाटकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. बालनाट्य लिखाणासह त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली.
 
 
 
नाट्यक्षेत्रात मिळणारी बक्षिसे आणि कौतुकामुळे त्यांचा हुरूप आणखी वाढला. गेल्या २५ वर्षांपासून ते वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांना मोफत बालनाट्याचे धडे देत आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी टीव्ही मालिका आणि कार्यक्रमांमध्ये काम करत आहेत. या नाट्य शिबिरात ते व्यक्तिमत्त्व विकासासह मुलांच्या अनेक पैलूंवर लक्ष देऊन धडे देतात. दहा नाटकेही त्यांनी दिग्दर्शित केली आहेत.
 
 
 
त्यानंतर त्यांनी रांगोळी काढण्याचा सराव सुरू केला. आता त्यांना नवी मुंबईतील अनेक ठिकाणी तसेच सरकारी कार्यालयात रांगोळी काढण्यासाठी बोलवले जाते. नेपथ्य शिकण्याचा निश्चय केल्यानंतर त्यांनी तब्बल सहा महिने आपली शिक्षक ही ओळख लपवत प्रसाद वालावलकर यांच्याकडून नेपथ्य क्षेत्राचे ज्ञान घेतले. सहनशील होऊन त्यांनी नेपथ्यकला जाणून घेतली आणि अगदी शेवटी त्यांनी ते शिक्षक असल्याचे सांगितले. कारण, ओळख सांगितली असती तर नेपथ्य कला शिकणे अवघड गेले असते. पुढे पवळेंना नेपथ्यासाठी अनेक राज्यस्तरीय पुरस्कारदेखील मिळाले. सुलेखनानंतर ग्रुप ’पेंटिंग’चाही प्रयत्न केला. लग्नानंतर ते नवी मुंबईत वास्तव्यास आले आणि रा. भ. नाईक शाळेत १९९३ साली रूजू झाले.
 
 
 
 
१९९२च्या मुंबई दंगलीत ते तब्बल तीन दिवस शाळेतच अडकून पडले. शाळेच्या खिडकीतून त्यांनी तलवारी आणि रक्तपात होताना पाहिला. त्यानंतर त्यांनी नवी मुंबईत राहणे पसंत केले. १९९५ साली त्यांनी ‘डन्स हायस्कूल’मध्ये ३ ते ७ अशी ‘पार्टटाईम’ शिक्षकाची नोकरी करत ‘एएम’चा कोर्सही पूर्ण केला. पुढे १९९६ साली सानपाड्यातील ‘विवेकानंद विद्यालया’त ते रुजू झाले. २००७साली कल्याणच्या ‘नूतन विद्यालया’त नोकरी कलाशिक्षक म्हणून नोकरी सुरू केली आणि सध्या ते याच शाळेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, पवळेंचे फलकलेखन विशेष प्रसिद्ध आहे. प्रत्येक कार्यक्रमाचे फलक, दिनविशेषही तेच लिहितात. गेल्या २७ वर्षांपासून ते नाटकांचे फलकलेखन करत आहेत.
 
 
 
“रोज नव्या गोष्टी कलेतून शिकता येतात. कलेने मी कधी दुःखी होत नाही. तपश्चर्येशिवाय कला अवगत होत नाही. जो तपश्चर्या करतो तोच यशस्वी होतो. मुलांना प्रयोगात्मकरित्या शिकवले तर लवकर समजते. कलाकारांनी व्यसनापासून लांब राहण्याचा प्रयत्न करावा. कलाकाराला समाज प्रोत्साहन देत असतो. त्याच्याकडे समाज चांगल्या नजरेनेच बघत असतो. त्यामुळे समाजाला ठेच पोहोचेल किंवा त्याचा दृष्टिकोन बदलेल, असे कृत्य कलाकाराने करू नये,” असे पवळे सांगतात. तसेच, भविष्यात तबलावादन शिकण्याचीही त्यांना इच्छा आहे. हलाखीच्या परिस्थितीवर मात करून अनेक कला आत्मसात करत ज्ञानदानाचे कार्य करणार्या श्रीहरी पवळे यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...!
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0