'मुंबई तरुण भारत'च्या 'मातंग युवती पदवीधर परिषदे'त आत्मोद्धाराचा जागर

कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक असलेल्या मुंबई तरुण भारतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "मातंग समाज पदवीधर युवती परिषद नुकतीच पार पडली. शनिवार, दि. २४ सप्टेंबर रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात "मातंग समाज पदवीधर युवती परिषदे"चे आयोजन करण्यात आले होते.

    24-Sep-2022
Total Views |
 
समाजातील दिग्गजांची परिषदेला उपस्थिती ; पदवीधर युवतींचा उदंड प्रतिसाद


मुंबई : कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक असलेल्या मुंबई तरुण भारतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'मातंग समाज पदवीधर युवती परिषद नुकतीच पार पडली. शनिवार, दि. २४ सप्टेंबर रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात 'मातंग समाज पदवीधर युवती परिषदे'चे आयोजन करण्यात आले होते.
 
 
सामाजिक, राजकीय, प्रशासकीयसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींची या परिषदेला उपस्थिती लाभली. संघर्ष करून समाजातील विविध क्षेत्रांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या दिग्गजांचे मार्गदर्शनामुळे आणि संकटांशी लढाई करत धडपडणाऱ्या युवतींच्या उपस्थितीमुळे मुंबई तरुण भारतचा हा कार्यक्रम मातंग समाजातील व्यक्तींच्या आत्मोद्धाराचा गौरव करणारच ठरला.
 
 
मातंग समाजातील युवतींचे प्रश्न, शिक्षण आणि इतर मूलभूत हक्कांसाठी त्यांना करावा लागणारा संघर्ष, दैनंदिन आयुष्यात जगताना समाजाकडून मिळणारी वागणूक आणि समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन यासह विविध मुद्द्द्यांवर या परिषदेत मार्गदर्शनपर चर्चा झाली. सातत्याने समाजातील विविध घटकांच्या हक्कांसाठी अग्रक्रमाने सत्याची बाजू उचलून धरणाऱ्या 'मुंबई तरुण भारत'चे उपस्थितांकडून अभिनंदन देखील करण्यात आले.
 
  
शनिवारी पार पडलेल्या या 'मातंग समाज पदवीधर युवती परिषदे'ला दिग्गजांची उपस्थिती लाभली. परिषदेच्या अध्यक्ष म्हणून पुणे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी ठाणे महानगर पालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सुनील वारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे'च्या प्रकल्प अधिकारी मेघा पवार, गायक संदेश उमप, दिशा ज्योत फाऊंडेशनच्या ज्योती साठे, मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार, मुंबई तरुण भारतचे बिझनेस हेड रविराज बावडेकर, मुंबई तरुण भारतच्या उपसंपादिका योगिता साळवी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 
समाजाचा विकास झाला तरच देशाचा विकास
 
मातंग पदवीधर युवती परिषदेच्या अध्यक्षस्थानी असलेले भाजप आमदार सुनील कांबळे यांनी यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. 'माझ्या अनेक वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आणि विचार मोठी भूमिका निभावतो आहे. मातंग समाज सातत्याने संघर्ष करत समाजात आपले स्थान टिकवून आहे. या समाजाने अनेक क्रांतिकारक आणि देशाला दिशा देणाऱ्या नेतृत्वाची जडणघडण केलेली आहे. समाजातील प्रत्येकानेच आपली इतरांशी असलेली सामाजिक बांधिलकी कायम लक्षात ठेवली पाहिजे. मी सातत्याने समाजातील घटकांसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे. राज्यात एकूण ३ ठिकाणी मातंग समाजातील किमान १००० मुलांचे वसतिगृह चालवण्याचा प्रयत्न मागील अनेक वर्षांपासून मी करत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या एक हजार मुलांपैकी ६५० पेक्षा अधिक मुले अनाथ आहेत.
बार्टीने देखील समाजासाठी नोंदणीय कामे केलेली आहेत. मात्र, बार्टीच्या यंत्रणेत काही बदल करणे आणि समाजासाठी बार्टीबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. 'ज्योती फाऊंडेशन' सारख्या सामाजिक संस्थांच्या मागे आम्ही कायमच मदतीसाठी उभे असून त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबई तरुण भारतने मातंग समाजातील केलेला हा उपक्रम नोंदणीय असून त्यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. सर्वांनी मिळून सर्वानी समाज आणि देशासाठी काम करणे आवश्यक आहे. सरतेशेवटी समाजाचा विकास झाला तरच देशाचा विकास होणार हे निश्चित आहे.'
- आ. सुनील कांबळे, आमदार, भाजप, पुणे 
 
 
जातीभेदाच्या भिंती भेदाव्याच लागतील
 
'मुंबई तरुण भारतने मातंग समाजातील पदवीधर युवती परिषदेच्या माध्यमातून आयोजित केलेला हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे. समाजातील कुठल्याही घटकाला जर स्वतःचा विकास आणि उन्नती साधायची असेल तर त्यासाठी स्वयंशिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वयंशिस्त अंगी बाळगलेला व्यक्ती यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. संघर्ष जितना बडा जीत उतनीही शानदार होती हैं हे कायम लक्षात ठेऊन संघर्षाचा सामना केला पाहिजे. आयुष्यात सुवर्ण संधी खूप कमी वेळा मिळतात, मात्र प्रत्येकालाच त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलता येतो असे नाही. त्यामुळे संधी आणि समाजातील दुर्लक्षित घटक यातील दरी मिटविण्यासाठी मुंबई तरुण भारताने चांगला प्रयत्न केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे यांच्यासह सर्वच महापुरुषांना जातिभेदाचा मोठा त्रास झाला. मात्र, त्यांनी त्यावर मात केली आणि म्हणूनच ते महापुरुष म्हणून आज जगासमोर आदर्श आहेत. जातीच्या भिंती पार करूनच आपल्याला पुढे जावे लागणार असल्यामुळे जातीभेदाच्या भिंती भेदाव्याच लागतील.'
- सुनील वारे, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पश्चिम रेल्वे
 
 
परिषदेत बार्टीच्या कार्याचा लेखाजोखा सादर !
 
मातंग युवती परिषदेस उपस्थितांना 'बार्टी'च्या प्रकल्प संचालिका मेघा पवार यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच बार्टी संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती देखील दिली. मेघा पवार म्हणाल्या की, 'महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमधील युवक युवतींना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने बार्टी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात सक्रियपणे कार्यरत आहे. अनुसूचित जातींमधील ५९ घटकांसाठी अविरतपणे काम करणारी संघटना म्हणून बार्टीकडे पाहिले जाते. समाजातील प्रत्येक घटकांमधील प्रत्येक युवक आणि युवतींच्या उद्धारासाठी आम्ही कार्य करत आहोत. समाजातील मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे, स्वयंसहाय्यता गट स्थापन करून समाजातील अल्पशिक्षित युवक आणि  युवतींना सक्षम होण्यासाठी मदत करणे, नोकरीसोबतच उद्योग करणाऱ्यांना लघु उद्योगांसाठी सहकार्य करणे यासह विविध कामे मातंग समाजातील युवक - युवतींना सक्षम बनवण्यासाठी केली जातात असल्याचे पवार यांनी यावेळी म्हटले.
तसेच समतादूतांच्या माध्यमातून प्रत्यक्षात जमिनीवरील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यात मूलभूत सुधारणा करण्यासाठी बार्टीकडून समतादूतांची पथके देखील कार्यरत असल्याचे मेघा पवार यांनी यावेळी विशेषत्वाने नमूद केले. यावेळी उपस्थित युवक युवतींनी विचारलेल्या प्रश्नांना पवार यांनी समर्पक आणि यथोचित उत्तरे देत त्यांच्या शंकांचे समाधान केले.
 
 
परिषदेमुळे पिढी घडण्यास मदत होणार !
 
'कोरोना काळामध्ये संपूर्ण जग ठप्प पडलेले होते, मात्र शासकीय कर्मचारी अविरतपणे सेवेत होते. कोरोनाकाळात रुग्ण आणि बाधितांना रुग्णालयात दाखल करणे, इतरांना रोगापासून वाचवणे आणि यासह अन्य कामे पार पाडण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येत असतात, मात्र त्यांना तोंड देऊन त्यावर मात करणे हाच एकमेव पर्याय आहे. मातंग समाजातील युवतींची मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती नक्कीच समाजासाठी चांगली गोष्ट आहे. या परिषदेमुळे भविष्यात मातंग समाजातील एक यशस्वी पिढी होण्यासाठी मोठी मदत होईल यात दुमत नाही. समाजात सकारात्मकता शोधण्यासाठी आपल्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर आपण सकारात्मक असू तरच आपल्याला जग सकारात्मक दिसेल
- शंकर पाटोळे, उपायुक्त, ठाणे महापालिका
 
 
सुधारणेची दिशा देणारा समाज
 
'संघर्ष, अन्याय आणि संधी न मिळणे हा संघर्ष जगभरात आहे. मात्र, त्यामुळे दोन समाजामध्ये जर कायम दुही राहिली तर देशाचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे देशाच्या आणि पर्यायाने आपल्या उद्धारासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. आपल्या आत्म्याच्या प्रकाशातूनच आपल्याला आपल्या प्रवासाची सुरुवात करावी लागणार आहे. मातंग समाज आपली एक वेगळी ओळख कायम ठेवून आहे. अनेक सामाजिक सुधारणांमध्ये मातंग समाज अग्रणी राहिलेला आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारक देणारा, नव्या दिशेने वाटचाल करणारा आणि सुधारणेची नवी दिशा देणारा समाज म्हणून मातंग समाजाने आपली निराळी ओळख जपलेली आहे.
- किरण शेलार, संपादक, दै. मुंबई तरुण भारत
 
 
भविष्यात आणखी काम करत राहू !
 
दिशा ज्योत फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गेली ६ वर्षे समाजात काम करत आहोत. या कामाची यशस्विता सांगायची तर मानखुर्द आणि लगतच्या भागातील अनेक मुलींचे किमान दहावीपर्यंत शिक्षण होण्यात आमची महत्त्वाची भूमिका आहे. समाजातील अशिक्षित युवक युवतींना शिक्षित करण्याचे आणि समाजात त्यांच्या प्रश्नांविषयी जनजागृती करण्याचे काम आम्ही करत आहोत. अर्थात झालेलं काम खूप कमी असून भविष्यात आणखी काम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, हा विश्वास आहे.'
- ज्योती साठे, दिशा ज्योत फाऊंडेशन
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.