इराणच्या महिलावर्गाचे खरंतर स्वागत करायला हवे. कारण, त्यांनी इस्लामिक सत्तेविरोधात बोलण्याची किमान हिंमत दाखविली. आपल्या देशासारखी ‘हिजाब गर्ल’ तयार करण्यापेक्षा प्रस्थापित सत्तेविरोधात क्रांती करण्याचे धाडस तरी त्यांनी केले.
मुद्दा असा की, इराणमध्ये मसहा अमिनीला पोलीस कोठडीत मरेपर्यंत मारहाण झाली. कोठडीत तिचा मृत्यू झाला. अमिनीच्या मृत्यूनंतर तेहरान शहरात पोलिसांविरोधात आक्रोश उफाळून आला. महिलांनी चक्क आपले केस कापून अमिनीला पाठिंबा दिला. एका इराणी पत्रकार महिलेने सोशल मीडियावर अमिनीला पाठिंबा जारी केला. एवढेच नाही तर या व्हिडिओमध्ये तिने चक्क ‘हिजाब’ जाळून टाकला. दि. 16 सप्टेंबर रोजी महसा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्यानंतर आठवडाभर या विषयावर निर्दशने सुरू आहेत. ‘हिजाब’सक्तीमुळे इराणमध्ये महिलांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. इराण पूर्वीपासूनच महिलांविरोधातील कठोर नियमांमुळे चर्चेत आहे. जर वयाच्या सात वर्षांनंतर मुली ‘हिजाब’ने आपला चेहरा झाकत नसतील,तर त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यांना शाळेत प्रवेश नाकारला जातो. नोकरीच्या ठिकाणीही ‘हिजाब’सक्ती आहेच. ‘हिजाब’ नाकारला तर नोकरीवरूनही बडतर्फ केले जाते. या भेदभावामुळ्े महिला त्रस्त आहेत.
अमिनीच्या मृत्यूनंतर या विषयाला पुन्हा वाचा फुटली. हजारो महिलांनी रस्त्यावर येऊन सरकारला धारेवर धरले. इराण हा आखातामधील इस्लामिक देश. अंदाजे तीन कोटींहून अधिक लोकसंख्येच्या या देशात शिया हा अधिकृत धर्म. त्याला ‘इश्ना अशरिया’ या नावानेही ओळखले जाते. ‘हिजाब’ची प्रथा 1979 मध्ये या देशात सक्तीची करण्यात आली. मात्र, 15 ऑगस्ट रोजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी अध्यादेश लागू करत ‘हिजाब’ला देशात एक पोशाख म्हणून अधिकृत मान्यता दिली.
असो. इराणमध्ये पोलीस अमिनीला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओ ‘व्हायरल’ होऊ लागले. अमिनीचा गुन्हा काय तर तिने ‘हिजाब’ परिधान करण्यास विरोध केला. त्यावरून पोलिसांनी तिला कायदे-नियम धाब्यावर बसवून जबरदस्ती अटक केली.
तिच्या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून मारहाणही केली. यामुळे देशात पोलिसांच्या या कृत्याविरोधात संतापाची लाट उसळली. नागरिक विशेषतः महिलावर्ग या प्रकाराचा सरकारला जाब विचारत आहे, निषेध नोंदवित आहेत. देशभरात बहुतेक ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. पोलिसांनीही परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून आटोकाट प्रयत्न केले. मात्र, महिलांच्या जनशक्तीपुढे ते फोल ठरले. अखेर पोलिसांना बंदुकीच्या धाकावर तणाव निवळण्याचा प्रयत्न करावा लागला. यामुळे महिलांच्या आंदोलनाला आणखी बळ मिळाले. दि. 13 सप्टेंबरला अमिनीला अटक झाली होती. ‘हिजाब’ न वापरल्याने तिच्यावर कारवाई झाली.
स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, अवघ्या काही वेळातच ती कोमामध्ये गेली. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू झाले. अटक झाल्यानंतर रुग्णालयात नेईपर्यंत नेमके काय घडले, याची कल्पना कुणालाही नाही. डोक्यावर दुखापत झाल्याने अमिनीचा मृत्यू झाल्याचे मानवाधिकार संघटनांचे म्हणणे. म्हणजे अटकेनंतर तीन दिवसांत तिचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलीस ठाण्यातच ती बेशुद्ध पडल्याचे ते सांगत आहेत. या प्रकरणात चौकशीचे आदेशही देण्यात आले.
एवढेच नाही तर 28 वर्षांच्या सेपदेह रोश्नो या अभिनेत्रीने ‘हिजाब’ न परिधान केल्याने तिला टीव्हीवर माफी मागण्यास भाग पाडण्यात आले होते. पुढे तिलाही अटक झाली. अटकेनंतरही त्या अभिनेत्रीला प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. ज्यावेळी तिने टीव्हीवर माफी मागितली, तेव्हा तिच्या डोळ्यांवरही मारहाणीच्या जखमा स्पष्ट दिसत होत्या. अमिनी प्रकरणाच्या महिनाभरापूर्वीच ही घटना घडली. रोश्नोला देशविरोधीही ठरविण्यात आले. एव्हाना इराणमध्ये ‘हिजाब’सक्तीचे बॅनर लावण्यात आले आहेत. तुम्ही तिथे सार्वजनिक ठिकाणी नृत्यही करू शकत नाही. कारण, तसे केल्यास तुमची अटक निश्चित. इस्लामिक देशातील महिलांच्या मूलभूत अधिकारांवर असलेल्या बंधनांविरोधात आता स्वतः महिलाच आवाज उठवत असल्याची ही सुरुवात तरी किमान चांगली आहे. भारतात मात्र या विषयांवरुन सोयीस्कर भूमिका घेणार्या कथित पुरोगाम्यांना तसे जमणार नाही.