मंत्रिपद स्वीकारल्यानंतर अवघ्या 15 महिन्यांमध्ये मुलाच्या लग्नासाठी या मंत्र्याने 300 कोटींहून अधिक रक्कम आणली तरी कुठून? सर्वसामान्य जनतेला, प्रामाणिकपणे व्यवहार करणार्या नागरिकांना असे प्रश्न पडतात. पण, राजकारणात निर्ढावलेल्या अशा मंत्र्यांना पैसा कसा उभा करायचा, असे प्रश्न कधीच पडत नाहीत, असे या लग्न समारंभावर जी कोट्यवधींची उधळण करण्यात आली, त्यावरून दिसून येते.
पी. मूर्ती द्रमुक सरकारमध्ये मंतामिळनाडूच्या मंत्रिमंडळातील द्रमुकचे मंत्री पी. मूर्ती यांचा मुलगा पी. एम. ज्ञानेश याचा त्रिची येथील एस. स्मितवर्षीणी हिच्याशी दि. 9 सप्टेंबरला विवाह संपन्न झाला. एखाद्या राजघराण्याला लाजवेल अशा प्रचंड डामडौलात संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यावर कोट्यवधींची उधळण करण्यात आली. मंत्री पी. मूर्ती हे पिढीजात श्रीमंत नसताना किंवा कोणत्याही राजघराण्याचे वारस नसतानाही या विवाह सोहळ्यासाठी त्यांनी इतका पैसा कुठून आणला, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्री म्हणून 2021 मध्ये सहभागी झाले. आपल्या निवडणूकविषयक प्रतिज्ञापत्रामध्ये आपली आणि आपल्या कुटुंबाची जंगम मालमत्ता 4.66 कोटी रुपये आणि स्थावर मालमत्ता 6.4 कोटी रुपये असल्याचे नमूद केले होते.
तसेच, आपल्यावर 1.96 कोटींचे कर्ज असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. मग मंत्रिपद स्वीकारल्यानंतर अवघ्या 15 महिन्यांमध्ये मुलाच्या लग्नासाठी या मंत्र्याने 300 कोटींहून अधिक रक्कम आणली तरी कुठून? सर्वसामान्य जनतेला, प्रामाणिकपणे व्यवहार करणार्या नागरिकांना असे प्रश्न पडतात. पण, राजकारणात निर्ढावलेल्या अशा मंत्र्यांना पैसा कसा उभा करायचा, असे प्रश्न कधीच पडत नाहीत, असे या लग्न समारंभावर जी कोट्यवधींची उधळण करण्यात आली, त्यावरून दिसून येते. या विवाह समारंभास तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, त्यांचे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, खासदार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी आदी मंडळांची उपस्थिती होती.
या विवाह समारंभासाठी मदुराईजवळ पाँडी कोईल येथे 30 एकर परिसरात एखाद्या किल्ल्यासारखी उभारणी करण्यात आली होती. दोन महिन्यांपासून त्याची तयारी सुरू होती. या सोहळ्यासाठी जी भव्य वास्तू उभारण्यात आली होती, ती पाहून ‘बाहुबली’ चित्रपटासाठी जे भव्य सेट्स उभारण्यात आले होते, त्याची आठवण कोणालाही व्हावी. एखाद्या राजप्रासादासारखी उभारणी या सोहळ्यासाठी करण्यात आली होती. विवाहासाठी येणार्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी उंची सोफा सेट्सची व्यवस्था करण्यात आली होती. विवाह मंडपात भव्य झुंबरे लटकविण्यात आली होती. विवाहास येणार्या पाहुण्यांसाठी मदुराईमधील सर्व तारांकित हॉटेल्सच्या रूम्स आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. सर्व पाहुण्यांना अक्षता घालून एक धातूची पेटी देण्यात आली होती. पाहुण्यांच्या स्वागतासाठी केरळहून खास मागविले सुशोभीत हत्ती प्रवेशद्वारी झुलत होते.
विवाहस्थानाची क्षमता एक लाख लोकांना सामावून घेण्याइतकी होती. तसेच एका वेळी 15 हजार लोकांना जेवण करता येईल इतका भव्य भोजन मंडप उभारण्यात आला होता. विवाह समारंभासाठी येणार्यांकडून रोख स्वरूपात आहेर स्वीकारण्यासाठी अत्याधुनिक 50 काऊंटर उघडण्यात आले होते. लग्न समारंभ आणि स्वागत समारंभास आलेल्या पाहुण्यांना विविध किमती वस्तूंचा समावेश असलेल्या ‘रिटर्न गिफ्ट’ देण्यात आल्या. पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीमध्ये अनेक पदार्थांची रेलचेल होती. बिर्याणी बनविण्यासाठी 4 हजार, 500 बोकड आणि 24 हजार कोंबड्या मारण्यात आल्या. शाकाहारी पाहुण्यांसाठी भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
आता या सोहळ्यासाठी कोट्यवधींची उधळण करण्यासाठी हा एवढा पैसा आणला तरी कुठून? असे म्हणतात की, या नेत्यातर्फे प्रत्येक उपनिबंधक कार्यालयास 25 हजार रुपये गोळा करण्यास सांगण्यात आले होते. तसेच, प्रत्येक जिल्ह्याच्या महसूल प्रशासनास प्रत्येकी 25 लाख गोळा करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. खास व्यक्तींसाठी विवाहाची जी निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली होती, त्या पत्रिकेसोबत सिल्कची साडी, धोती आणि सोन्याचे वा चांदीचे ताट यांचा समावेश होता. नातेवाईक आणि मित्र परिवारास लग्नाआधी नोटांच्या थप्प्या देण्यात आल्या होत्या. ती रक्कम त्यांनी आहेर स्वरूपात द्यावी, हा त्यामागील हेतू होता. काळा पैसा पांढरा करणे हा त्यामागील हेतू होता.
या विवाह समारंभास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या भव्य सोहळ्याबद्दल मंत्री मूर्ती यांचे चक्क कौतुकही केले. मूर्ती यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. पक्षाच्या एखाद्या क्षेत्रीय परिषदेसारखा भव्य असा विवाहसोहळा होता, असेही स्टॅलिन यांनी म्हटले आहे. पण, या कोट्यवधी रुपयांच्या कमाईचा स्रोत काय, एवढा खर्च कसा केला, याची चौकशी करण्याचे सोडून मुख्यमंत्रीच जर या समारंभाचे कौतुक करीत असेल, तर काही बोलायलाच नको!
‘एनआयए’ची तेलंगण, आंध्र प्रदेशात छापेमारी
‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने म्हणजे ‘एनआयए’ने रविवारी तेलंगण आणि आंध्र प्रदेशात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जहाल मुस्लीम संघटनेशी संबंधित अशा सुमारे 40 ठिकाणी छापे टाकले. ‘पीएफआय’ संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणांवर छापे टाकून पोलिसांनी विविध प्रकारचे आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. तसेच या छाप्यात 8 लाख, 31 हजार, 500 रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली. या संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने तेलंगणमध्ये 38 ठिकाणी छापे टाकले. त्यापैकी एकट्या निजामाबाद जिल्ह्यामध्ये 23 ठिकाणी, हैदराबादमध्ये चार ठिकाणी, जगित्यालमध्ये सात ठिकाणी, निर्मल येथे दोन ठिकाणी आणि आदिलाबाद आणि करीमनगरमध्ये प्रत्येकी एक ठिकाणी छापे टाकले.
आंध्र प्रदेशात कुर्नूल आणि नेल्लोर जिल्ह्यामध्ये एकेक ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. निजामाबादचा राहणारा अब्दुल खादर आणि त्याच्यासमवेतच्या 26 जणांविरूद्ध भारत सरकारविरूद्ध युद्ध पुकारण्यासाठी कटकारस्थान केल्याचा आरोप ‘एफआयआर’मध्ये करण्यात आला आहे. आपले कटकारस्थान पार पाडण्यासाठी त्यांनी ‘पीएफआय’च्या सदस्यांना भरती केले होते आणि त्यांना दहशतवादी कारवाया करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरांचे आयोजन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. देशाच्या विविध भागात ‘पीएफआय’ची पाळेमुळे किती खोलवर रुजत चालली आहेत, त्याची कल्पना ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने केवळ दोन राज्यांमध्ये 40 ठिकाणी टाकलेल्या छाप्यांवरून यावी.
वाराणसीस सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानीचा दर्जा!
उझबेकिस्तानमधील समरकंद येथे नुकतीच ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ या संघटनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आदी नेते उपस्थित होते. त्या बैठकीत पर्यटन, सांस्कृतिक आणि मानवताविषयक देवाणघेवाण यास प्रोत्साहन देण्यासाठी वाराणसी या शहराची 2022-2023 या वर्षांसाठी निवड करण्यात आली. या संघटनेने सर्वप्रथम वाराणसी या भारतातील तीर्थक्षेत्राची निवड केली, ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.
वाराणसी शहरास सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानीचा दर्जा बहाल केल्याने या संघटनेच्या सदस्य देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण होईल, तसेच पर्यटनाला गती मिळेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने काढलेल्या एका पत्रकात नमूद करण्यात आले आहे. भारताला 2017 मध्ये या संघटनेचे पूर्ण सदस्यत्व देण्यात आले. त्यानंतर लगेचच वाराणसी शहराची सांस्कृतिक राजधानी म्हणून निवड करण्यात आली. ही निवड झाल्याचे पाहता, या संघटनेमध्ये भारताचा दबदबा वाढला असल्याचे दिसून येते.